टॉप न्यूज

काँग्रेसही होशीय्यार!

रणधीर कांबळे

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं होणाऱ्या रोजच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या तयारीला काँग्रेस पक्ष लागलाय. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसनं बुधवारी (९ जानेवारी) प्रमुख नेते, केंद्रीय निरीक्षक, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी यांची खास मुंबईत बैठक घेऊन राज्यातल्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला. त्याच वेळी राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करण्याचे आदेश दिलेत. यातून हेच स्पष्ट होतंय की, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची १९९९ पासूनची आघाडी जर तुटलीच तर पक्षानं त्यासाठी तयार राहायचं आहे.

गेल्या काही दिवसात आघाडीतील कुरबुरी नेहमीच्या तुलनेत जरा जास्तच वाढल्यात. अजित पवार यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन झाल्यानंतर तर राष्ट्रवादीचा सारा रोख काँग्रेसच्याच विरोधात राहिलाय. त्यात काँग्रेसनं आणलेल्या औद्योगिक धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी ज्या पध्दतीनं विरोधाची हवा निर्माण केलीय, त्यातून तर राष्ट्रवादीबरोबरचा संसार सुरळीत चालण्याची चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळंच काँग्रेसनं घेतलेले लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर टाकण्याचंही आता काँग्रेसनं ठरवल्याचं दिसतंय. त्यामुळंच वारंवार इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यासाठी सोनिया गांधी आणि पंतप्रधानांनी कसा पुढाकार घेतला हेच ठसवण्यासाठी मुंबईतल्या सोमय्या मैदानावर २८ डिंसेबरला जो वचनपूर्ती मेळावा झाला होता, त्यावेळीदेखील इंदू मिलचाच विषय अग्रभागी होता. आताही सोनिया गांधींसह पंतप्रधान, राहुल गांधी यांच्याही अभिनंदनाचा ठराव ९ जानेवारीच्या बैठकीत घेतल्याचं हेच स्पष्टपणानं दिसतंय.

आता हा सिलसिला पुढंही कायम ठेवण्यासाठी आता वचनपूर्ती मेळावे प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचंही या बैठकीत ठरवण्यात आलंय. शिवाय दुष्काळी भागात पक्षाच्या मंत्र्यांचे, नेत्यांचे दौरे अधिक वाढवण्यावर जोर देण्यावरही एकमुखानं शिक्कामोर्तब करण्यात आलंय. जेणेकरून राष्ट्रवादी ज्या पध्दतीनं आक्रमकपणानं काम करण्याचं ठरवतंय. खुद्द शरद पवारांनी त्यासाठी रोड मॅप तयार करून दिलाय. त्यामुळंच दुष्काळाचा सामना करण्यासाठी पैशाची कमतरता पडू दिली जाणार नाही, हेही मुख्यमंत्री वारंवार ठसवताना दिसताहेत. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी सत्ता स्वबळावर मिळण्यासाठी कामाला लागा, असाच आदेश देताना कुबड्या फेकून देण्याचंही आवाहन केलंय.

आघाडीच्या वाटपात ज्या जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यात त्या मतदारसंघातही काँग्रेस आक्रमकपणं संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे. १९९९ पासून अस्तित्वात आलेली आघाडी ठेवायची की मोडायची, याबाबतचा निर्णय पक्ष श्रेष्ठीच घेणार आहेत, असं सांगायलाही काँग्रेसची  नेतेमंडळी विसरत नाहीत. एकट्याच्या जीवावर सत्ता आणण्याचं स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही, असंच मुख्यमंत्री आणि माणिकराव सांगत आहेत. परंतु राष्ट्रवादीला थेट अंगावर घेण्याची तयारीही काँग्रेसची दिसत नाही. त्यामुळंच आता राष्ट्रवादीच्या आक्रमक टिकेला उत्तर तर द्यायचं आहेच. पण समोरासमोर उत्तर देण्याचं टाळताना काँग्रेस दिसतेय. याचं कारण म्हणजे पक्ष श्रेष्ठींना हे कितपत रुचेल, याचा अंदाज राज्यातल्या नेत्यांना आलेला सध्या तरी दिसत नाही. राष्ट्रवादीबरोबरची सोयरीक केंद्रातल्या सरकारमध्येही आहे. त्याचाही विचार त्यामागं दिसतोय.

अशा एकूणच परिस्थितीत मेळाव्यात ठरल्याप्रमाणं काँग्रेस आक्रमक होण्याची कसरत कशी पार पाडतेय, याचीच सर्वांना उत्सुकता आहे.
 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.