टॉप न्यूज

माळेगावच्या खंडोबाला साकडं

ब्युरो रिपोर्ट

नांदेड – मराठवाड्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झालीय. भंडाऱ्याची उधळण करत 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष करताना प्रत्येक भक्तगण ''खंडोबाराया... जीवघेण्या दुष्काळात जगण्याचं बळ दे आणि दुष्काळ लवकर हटू दे'' असंच साकडं मल्हारी मार्तंडाला घालतोय.   

देवस्वारीनं प्रारंभ, यात्रा सोमवारपर्यंत

हजारो भक्तांच्या साक्षीनं खंडोबाच्या देवस्वारीनं यात्रेस प्रारंभ झाला. सोमवारपर्यंत चालणाऱ्या यात्रेसाठी विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. खंडोबा देवस्थानातून देवांची पालखी काढण्यात आली. या पालखीच्या पुढं परंपरेनुसार रिसनगावच्या नाईकांची पालखी वाजत-गाजत काढण्यात आली. बेलभंडारा आणि खोबऱ्याची उधळण करताना तोंडी खंडोबारायाचं चांगभलं, असं भक्तिभावानं हर्षभरित झालेलं वातावरण यावेळी होतं. वाजंत्री आणि स्वत:च्या शरीरावर आसुडांचे फटके ओढणाऱ्या वारुंचीही मिरवणुकीत हजर होते. देवस्वारी आणि पालखीची नगर प्रदक्षिणा मुख्य रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोर आली. यावेळी यात्रेचं नियोजन करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं पारंपरिक पध्दतीनं देवाच्या पालखीचं पूजन आणि मानपान करण्यात आलं. 

जनावरं बाजार

यात्रेत दरवर्षीप्रमाणं उंट, घोडे, गाढव यांच्या खरेदी-विक्रीस प्रांरभ झाला असून उच्च प्रतीची जनावरं मिळण्याचं दक्षिण भारतातील महत्त्वाचं ठिकाण म्हणून यात्रेचा लौकिक आहे. याशिवाय यात्रेत जीवनोपयोगी वस्तू तसंच खाद्यपदार्थांच्या विक्रीची दुकानं थाटलीत. याशिवाय बालगोपालांच्या मुख्य आकर्षणाचा विषय असलेल्या आकाशपाळणा आणि इतर मनोरंजनाच्या गोष्टींनी ही यात्रा सजलीय. तमाशा, नाटक आदी लोककला सादरीकरणाचे तंबूही ठिकठिकाणी उभे राहिले असून तिथं ढोलकीचा ताल आणि हालगीवरची थाप ऐकायला मिळतेय. 

लावणी महोत्सव

जिल्हा परिषदेनं यात्रेचं नेटकं आयोजन केल्याचं प्रत्यंतर यावेळीही दिसतंय. शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक स्पर्धा, पशुपालकांसाठी स्पर्धा, पशू प्रदर्शन, कुस्त्यांचे फड यांसारख्या कार्यक्रमांची रेलचेल यात्रेत आहे. शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देणारं भव्य प्रदर्शनही सर्वांचं आकर्षण ठरलंय.  यावर्षी प्रथमच स्वतंत्र लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यात अनेक नामांकित लावणी सम्राज्ञी आपली कला सादर करणार आहेत. यामुळं यावेळच्या यात्रेची मजा आणखी वाढलीय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.