
चिपळूण – अध्यक्षीय निवडणुकीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सकाळी इथं ग्रंथदिंड्यांनी सुरुवात झाली. आयोजकांनी मोठ्या दिमाखात एक ग्रंथदिंडी काढली. तर दुसरीकडं 'इंधन'कार हमीद दलवाई यांच्या मिरझोळी या गावापासून निघणारी, पण साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केलेली ग्रंथदिंडी दलवाईंच्या चाहत्यांनी काढली.
'जब तक सूरज-चांद रहेगा, हमीद तेरा नाम रहेगा' आणि 'हमीद दलवाई जिंदाबाद' अशा घोषणा देत दलवाई यांचे चाहते, अभ्यासक आणि पत्रकारांनी ग्रंथदिंडी काढली. चिपळूणचेच भूमिपुत्र आणि परिवर्तनवादी लेखक हमीद दलवाई यांच्या घरापासून ग्रंथदिंडी निघेल, असं संयोजकांनी जाहीर केलं होतं. पण त्याला कोकण सिरत कमिटीचे शाहनवाज शहा आणि अन्य सहकाऱ्यांनी विरोध केला. म्हणून लोटीसमाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी ग्रंथदिंडी तडकाफडकी रद्द केली. या कृत्याचा निषेध करीत त्यांच्या चाहत्यांनी विरोध करून ही आज दुसरी दिंडी काढली. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी या दिंडीत सहभागी होऊन दलवाई यांच्या चाहत्यांचं अभिनंदन केलं.
व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं म्हणून, तर साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाचं चित्र छापलं म्हणून समाजातून जोरदार विरोध झाला. पण संयोजकांनी अशा मागण्या धुडकावून लावल्या. परंतु केवळ शाहनवाज शहा यांनी मागणी केली म्हणून दलवाईंच्या घरापासून निघणारी ग्रंथदिंडी रद्द करण्यात काहीच अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली. अन्वर राजन, मेहरुन्नीसा दलवाई, अब्दुल कादीर मुकादम, युवराज मोहिते, विलास वाघ, अभिजीत हेगशेट्ये, राजन इंदूलकर, सुनीता गांधी, शैलेश वरवाटकर, प्रकाश डाकवे, खालिद दलवाई, अजमल दलवाई आदींनी पुढाकार घेऊन ही ग्रंथदिंडी काढली.
आयोजकांची ग्रंथदिंडी
आयोजकांनी काढलेली ग्रंथदिंडी दणक्यात निघाली. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले, मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्यासह अन्य साहित्यिक, रसिक आणि चिपळूणकर नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कोकणातले विविध मर्दानी खेळ, लोककलावंत, साहित्यप्रेमी विद्यार्थी या दिंडीत सहभागी होऊन ही रांग जवळपास दीड किलोमीटर लांब होती. या ग्रंथदिंडीचं ठिकठिकाणी चिपळूणकरांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केलं.
राज्यभरातून २५० लोककलावंतांनी दिंडीदरम्यान आपली खास छाप सोडली. लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी अतिशय उत्कृष्टपणं याचं आयोजन केलं. या लोककलावंतांची कला पाहून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरेंनाही ताशा वाजवण्याचा मोह आवरता आला नाही.
'पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा' हा नारा यावेळी देण्यात आला. त्याचबरोबर विद्यार्थांनी विविध वेश परिधान करून समतेचा संदेशही दिला. ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या महिला लेझीम पथकानंही लक्ष वेधून घेतलं. ग्रंथदिंडीनंतर मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन झालं.
Comments
- No comments found