टॉप न्यूज

मराठवाड्याला पाणी द्या - संमेलनाध्यक्षांची मागणी

मुश्ताक खान

चिपळूण – 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही पाण्याचा जागर झाला. संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीलाच मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी द्या, अशी मागणी केली.  यावेळच्या दुष्काळाच्या झळा तीव्र असून सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून प्रत्येकानं खारीचा वाटा उचलायला पाहिजे. 'भारत4इंडिया'नं याच उद्देशानं 'जागर पाण्याचा' सुरू केलाय.

सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या संमेलनाला आज सकाळी ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी चारला यशवंतराव चव्हाण नगरीत उद्घाटन सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्घाटनपर भाषणात, 'साहित्यिकांनो निरर्थक वाद घालू नका आणि समाज जीवनावर बरावाईट परिणाम करणाऱ्या घटना-घडामोडींबद्दल बोला,' असं आवाहन केलं.

साहित्यिक विधिमंडळात सन्मानानं आले. राजकारण्यांनी त्याला कधी विरोध केला नाही. मग राजकारणी व्यासपीठावर आले तर का चालत नाहीत, असा सवालही पवार यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांबद्दल मतभेद असू शकतात. मात्र, त्यांची लेखनशैली आणि व्यंगचित्रकला याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मग त्यांचं नाव व्यासपीठाला दिलं तर बिघडलं कुठं, असा रोखठोक सवालही त्यांनी केला. परिवर्तनवादी लेखक हमीद दलवाई यांच्या मिरझोळी इथल्या जन्म ठिकाणापासून निघणारी ग्रंथदिंडी प्रतिगाम्यांच्या विरोधामुळं रद्द झाली, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळायला हवं, असे कितीतरी दमदार लेखक आहेत. त्यांना सन्मानानं अध्यक्षपद का बहाल केलं जात नाही? निवडणूक का लढवावी लागते? असे सवाल करून याबद्दल फेरविचार करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. समाजात एकीकडं महिला सक्षमीकरणाचा नारा घुमतोय. पण आजपर्यंत चार महिलांचा अपवाद वगळता साहित्य संमेलनाची अध्यक्ष महिला झाली नाही, ही परिस्थिती बदलायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा विशाखा पुरस्कार प्राप्त झालेल्या दौंड तालुक्यातील बोरी भडक (जि. पुणे) येथील शेतीनिष्ठ कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या दोन कवितांचंही पवार यांनी आपल्या भाषणात वाचन केलं. 

संयूक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचं हे शतक जयंती महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्तानं यशवंतरावांच्या पत्नी वेणुताई यांच्या जीवनावरील 'मी वेणूताई बोलतोय...' या सीडीचं प्रकाशन यावेळी शरद पवार यांच्या हस्ते झालं. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.