टॉप न्यूज

राजकीय व्यक्तींना विरोध का?

मुश्ताक खान
चिपळूण -  एखादी राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनात आली तर प्रचंड विरोध होतो, पण जेव्हा साहित्यिक राजकारणात येतात तेव्हा आम्ही तक्रार करत नाही. त्यांचं आम्ही नेहमी स्वागतचं करतो अशी कोपरखळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विरोधकांना मारली. ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला चिपळूणमध्ये थाटात सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. 

अचार्य अत्रे, ना.धो.महानोर, ग. दी. माडगुळकर जेव्हा विधीमंडळात आले तेव्हा आम्ही आनंदच व्यक्त केला. मग साहित्यात राजकारणी आले तर विरोध का होतो असा सवालही पवारांनी उपस्थितांना केला. 

साहित्यिकांनी पिचलेल्यांसाठी, समाजाच्या परिवर्तनासाठी लेखणी झिजवली पाहिजे. राजकारणी जर चुकत असतील तर परखडपणे लिखाण केलं पाहिजे. मराठीच्या हिता संबंधीची भूमिका साहित्यिकांनी घेतली पाहिजे आणि जर कुणी त्यासंदर्भात लिखाण करत असेल तर अशा लिखानाचे आम्ही स्वागतचं करु असं पवार म्हणाले.

११ मे १८७८ मध्ये पहिलं संमेलन पुण्यात भरलं, तेव्हा न्यायमूर्ती रानडे यांची प्रेरणा या संमेलनाला होती. पण तेव्हाही वाद झालेच. संस्कृतीचं अदान-प्रदान होत असतं ते झालचं पाहिजे असं मत पवारांनी व्यक्त केलं.  

बाळासाहेब ठाकरे हे प्रभावी लिखाण करणारे व्यक्तीमत्त्व होते. ठाकरी शैलीची कुऱ्हाड आमच्यावर कायम कोसळत राहिली. त्याच्याशी आमचा कायम राजकिय विरोध राहिला परंतु त्यांच्या लेखणीला कोणीही नाकारु शकत नाही. त्यामळं त्याचं नाव व्यासपीठाला नको हा वाद निर्थक आहे, असं ही पवार म्हणाले. साहित्य क्षेत्रात भरिव योगदान करणाऱ्या बाळासाहेबांची चिपळूणकरांनी दखल घेतली याबाबत आयोजकांचं अभिनंदनही पवारांनी केलं.

परंतु त्याचबरोबर साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या परिवर्तनवादी लेखक हमीद दलवाई यांच्या घरापासून ग्रंथ दिंडी का निघाली नाही हे समजू शकलं नाही असं म्हणत पवारांनी नाराजी व्यक्त केली. 

डॉ. नागनाथ कोतापल्ले, उत्तम कांबळे, डॉ. यू. मं. पठाण सारखे साहित्यिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यामुळे साहित्य संमेलन सर्व समावेशक आहे असं मला वाटतं. स्त्रियांची संख्या साहित्यात वाढली पाहिजे, तर समाजात बदल होऊ शकतो. स्त्रियांना सामाजिक भान असतं, त्यामुळं त्यांनी अधिकाधिक लिखाण केलं पाहिजे. त्यांच्या लिखाने साहित्याची सकस मांडणी होईल असंही यावेळी पवार म्हणाले. 

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, ''दलित, ग्रामीण, स्त्री आणि आदिवासी साहित्य प्रवाह महत्त्वाचे आहेत, कारण ते थेट व्यवस्थेला प्रश्न विचारतात. त्यामुळं असे प्रवाह समाजात असलेच पाहिजेत. त्यामुळं समाजाची प्रगती होते अशी भूमिका मांडली.'' 

ग्रामीण साहित्याबद्दल आपलं मत स्पष्ट करताना ते म्हणाले, ''शेतकरी आणि ग्रामीण माणूस अजूनही मनानं मध्ययुगात आणि सरंजामी परंपरांमध्ये अडकून पडलाय.  यामध्ये ग्रामीण माणसाची परिस्थिती तर अत्यंत गुंतागुंतीची आहे. तो निर्माता असल्यामुळं त्याला निर्मितीचं क्षेत्र सोडताही येत नाही आणि उभंही राहता येत नाही, अशी त्याची अवस्था झालीये. काही साहित्यिक वगळता मोठ्या प्रमाणावर त्यांची ही कुचंबणा मराठी साहित्यात व्यक्त झाली नाही याची मला खंत वाटतेय. त्याचबरोबर प्रस्थापीत व्यवस्थेशी संघर्ष करु पाहणारे साहित्यिक अधिक लक्षात राहतात" 

मराठी भाषेबद्दल बोलताना त्यांनी मराठी शाळांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. मराठी शाळा सुधारल्या पाहिजेत तरच समाजाची प्रगती होईल. त्याबरोबर मराठी माणसांवर अत्याचार, दडपशाही करणाऱ्या कर्नाटक सरकारचाही त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. 

पुढं ते म्हणाले, की ''आतापर्यंत संगीत क्षेत्र हे श्रेष्ठ मानलं जात होतं. परंतु संगीतच नाही तर विविध क्षेत्राला स्पर्श करणारं साहित्य हे क्षेत्रच सर्वश्रेष्ठ आहे, कारण प्रत्येकाचं जगण्यासंबंधीचं एक स्वप्न असतं परंतु त्याच्या भोवतीचं जगणं वेगळं असतं. अशा परिस्थितीमध्ये ताण निर्माण होतात आणि या ताणातूनच साहित्याची निर्मिती होते.''

कौशल इनामदारनं संगीतबद्ध केलेल्या 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या गीतानं साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.