टॉप न्यूज

माळेगाव यात्रेतील विविध रंग

ब्युरो रिपोर्ट

नांदेड - ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात कालपासून सुरू झालेल्या माळेगावच्या यात्रेला  रंग चढू लागलाय. दिवसाकाठी यात्रेतील उलाढाल ५ कोटींच्या आसपास आहे. दीड लाखांपेक्षा अधिक भक्तांची हजेरी आणि पाच रुपयांचा चहा विकणार्‍यापासून ते दोन लाखांचा घोडा विकणाऱ्यापर्यंत कितीतरी हातांना काम मिळालंय. पशुविक्रीपासून ते दैनंदिन जीवनात वापरण्यात येणार्‍या सर्व साधनांचा ऐतिहासिक बाजार म्हणून माळेगावची यात्रा प्रसिद्ध आहे.

ऐन थंडीच्या मोसमात येणारी खंडोबाची माळेगाव यात्रा अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे, तर माळेगावच्या अगदी ५० कि.मी.वर असणार्‍या आंध्र आणि कर्नाटक या दोन राज्यांसाठीही अधिक आकर्षण आहे. पाच दिवस चालणार्‍या या यात्रेविषयी काय सांगावं आणि काय बोलावं असंच होतं.

श्रद्धेचा बाजार कुंकवाचा
माळेगावच्या यात्रेमधील कुंकवाच्या बाजाराला अत्यंत महत्त्व आहे. कुंकवाच्या या बाजारामध्ये कुंकवाचे सहा प्रकार बघायला मिळतात.  आंध्र प्रदेश, कर्नाटक, अमरावती, केज इत्यादी भागांतून मोठमोठ्या व्यापाऱ्यांशिवाय किरकोळ विक्रेते इथं कुंकू विकण्यासाठी येतात. ७० रुपये किलोपासून ते १५० रुपये किलोपर्यंत कुंकवाची किंमत आहे. माळेगावात आल्यावर खंडोबाचं दर्शन घेण्याचं जे महत्त्व आहे तेवढंच महत्त्व इथं आल्यावर कुंकू खरेदी करण्याला आहे. त्यामुळं इथं येणारा प्रत्येक भाविक कुंकू खरेदी केल्याशिवाय राहत नाही.

शेख मेहमूद हे कुंकू व्यापारी म्हणाले, "आम्ही गेल्या ३० वर्षांपासून या यात्रेत कुंकू विकण्यासाठी येतो. प्रथम परराज्यात जाऊन ठोक स्वरूपात कुंकू खरेदी करून ते विक्रीसाठी माळेगावच्या यात्रेत आणायचं ही माझ्या आजोबांपासून चालू असलेली प्रथा आजही कायम आहे. आम्हाला नुकसान सोसावं लागलं किंवा विक्रीसाठी आणलेला माल परत न्यावा लागला, असं एकदाही घडलं नाही.  मुळात कुंकू खरेदी करणं हा श्रद्धेचा भाग आहे. कुंकवाचा वेगवेगळा दर्जा, विविध प्रकारचे रंग केवळ माळेगावलाच बघायला मिळतात. त्यामुळं माळेगावचं कुंकू खरेदी करण्यासाठी ग्राहकांसह लहानमोठे व्यापारीही उत्सुक असतात.”

गेल्या दहा वर्षांपासून या यात्रेत सहभागी होणार्‍या इंदुबाई जाधव म्हणाल्या, "सौभाग्याचं लेणं म्हणून
कुंकवाकडं बघितलं जातं. हे कुंकू कपाळी असलं तर स्त्री परिपूर्ण वाटते. हेच कुंकू जर खंडोबाच्या दरबारातून नेलेलं असेल तर ते सौभाग्य अखंड टिकून राहतं, असं आम्हाला वाटतं. त्यामुळंच माळेगावमध्ये येणारा पुरुष असो की, स्त्री कुंकू खरेदी करतातच.”

वाघ्या-मुरळीची तिसरी पिढी
या यात्रेमध्ये सर्वात जास्त आकर्षण कशाचं असेल तर लोककलावंतांचं. या लोककलावंतांमध्ये सर्वात आघाडीवर आहेत ते वाघ्या-मुरळी. वाघ्या-मुरळीचे या यात्रेत एक-दोन नव्हे तर शेकडो ग्रुपच्या ग्रुप श्रद्धेपोटी पाच दिवस भक्तिभावानं पूजा करतात.  गेल्या ३० वर्षांपासून आपले आजोबा, वडील आणि आता खुद्द येणारे बाबू करेवाड हे या यात्रेविषयीच्या आठवणी सांगताना म्हणतात,  "या यात्रेला मोठं स्वरूप आलंय, पण वाघ्या-मुरळीचं महत्त्व पूर्वी जसं होतं तसं आजही कायम आहे.” त्यांच्यासोबत असलेल्या निशिकांत गजभारे या तरुणाला एक-दोन नव्हे तर तब्बल ४०पेक्षा अधिक गाणी तोंडपाठ आहेत.  गाणी डफावर न चुकता अगदी सुरात म्हणताना डफ वाजवणं आणि नाचणं यामध्ये तो अगदी मग्न झालेला असतो.

उधळायला खोबरं २ कोटींचं
माळेगावला येणारा प्रत्येक भाविक बेलभंडार्‍यासोबत खोबर्‍यांची उधळण करतो आणि नंतर खंडेरायासमोर माथा टेकवतो. मंदिराच्या अगदी समोरच खोबरं विकणार्‍यांची २००पेक्षा अधिक दुकानं आहेत. त्या दुकानात काम करणारी माणसं खोबरं विकण्यात अगदी दंग झालेली असतात. इथं विक्रीला येणारं खोबरं थेट कोकणातूनच येतं. कोकणात १०० रुपये किलोनं मिळणारं खोबरं इथं १५० रुपयांपेक्षा जास्त दरानं विकलं जातं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे खंडोबाच्या दरबारातील खोबरं लाडूसाठी श्रद्धेनं वापरण्याची प्रथाही प्रचलित आहे. ही प्रथा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत आहे. त्यामुळं खंडोबाच्या यात्रेत खोबरं खरेदी करायचंच, असा मानस बाळगणारे अनेक भक्तही या यात्रेत भेटतात.

मौत का कुआँ; जरा दमानं
यात्रेचं आकर्षण आकाश पाळणे, घोड्यावर लहान मुलांना रपेट मारणं यापलीकडं जाऊन यात्रेत असलेला ‘मौत का कुआँ’ हे खास आकर्षण आहे. मौत का कुआँ पाहण्यासाठी ४० रुपये असे दर आकारण्यात आले आहेत. या मौत का कुआँमध्ये एक मोटरसायकल, दोन मारुती कार इकडून तिकडे फिरताना दिसतात. हे पाहून मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. हा मौत का कुआँ पाहण्यासाठी माळेगाव यात्रेत एकच गर्दी उडाली आहे.

गाढवांचाही बाजार
हौशा-गवशांचं लक्ष गाढवांच्या बाजारानंही वेधून घेतलंय. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि जवळच्या कर्नाटकातून गाढवांचे जत्थेच्या जत्थे इथे विक्रीसाठी आले आहेत. विशेष म्हणजे या गाढवांचा उधारी बाजार इथे केला जातो. ५ हजारांपासून ते १५ हजारांपर्यंत एक गाढव विकलं जातं. यंदा दुष्काळाचं सावट आहे. दुष्काळाच्या सावटामुळं गाढवांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत कमीच झाल्याचं बघायला मिळालं.

यात्रेत २८ प्रकारचे घोडे
माळेगावच्या यात्रेत सर्वात आकर्षण घोड्यांचं. हे घोडे खरेदी करणारे अन् विक्री करणारे; तसंच पंजाब, हरियाणा आणि कोकणातील अनेक जण घोड्यांचे अधिक दर्दी असल्याचं बघायला मिळतं. दोन हजारांपासून दोन लाखांपर्यंतचे घोडे इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी घोड्यांचा बाजार अधिक जोरात असल्याचं बघायला मिळालं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.