टॉप न्यूज

संत नामदेवांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्राचं दुर्लक्षच - डॉ कोतापल्ले

मुश्ताक खान

आजी माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते ‘महानामा’चं प्रकाशन 

चिपळूण – 

महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात करून संत नामदेवांनी तर समतेची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. 'महानामा' या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल, असा विश्वास चिपळूण येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केला. संत नामदेवांच्या कामाची सामाजिक सांस्कृतिक अंगाने मांडणी करणा-या पत्रकार सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड संपादित 'महानामा' या पुस्तकाचं कोत्तापल्ले आणि मागील संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक आमदार उल्हास पवार, कवयित्री प्रभा गणोरकर उपस्थित होते.

‘मनोविकास प्रकाशना’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाविषयी कोत्तापल्ले पुढं म्हणाले,  संत नामदेव हे मराठीतील आद्य आत्मचरित्रकार, आद्य प्रवासवर्णनकार. पण त्यांच्याकडं आपलं दुर्लक्ष झालं. या पुस्तकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नामदेवरायांच्या कार्याला उजाळा मिळेल. तर डहाके यांनी नामदेवांच्या उत्तर भारतातील कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, 'महाराष्ट्राबाहेर जाऊन संपूर्ण देशावर प्रभाव टाकणाऱ्या नामदेवांचं कर्तृत्व फार थोर होतं. आजही पंजाबात गेल्यावर नामदेवांच्या राज्यातून आलेले म्हणून महाराष्ट्रीयांना आदर मिळतो.' 

प्रभा गणोरकर यांनी संत नामदेव हे आपले आवडते कवी असल्याचं सांगितलं. एक सर्वसामान्य माणूस ते महान संत असा त्यांच्या काव्यात दिसणारा त्यांचा प्रवास अचंबित करणारा आणि मोहवून टाकणारा आहे, असं त्यांनी सांगितलं. उल्हासदादा पवार म्हणाले, 'नामदेवमहाराजांचा अधिकार फार मोठा आहे. त्यांनी २० वेळा भारतभ्रमण केलं. त्यापैकी १२ वेळा ते उत्तरेत गेले आणि ८ वेळा दक्षिणेत गेले. आजही आपल्याकडं जातीपातींचं राजकारण केलं जातं. अगदी साहित्य संमेलनाच्या मांडवातही त्याचे पडसाद उमटतात. अशा वेळी ८०० वर्षांपूर्वी संत चोखोबांची समाधी पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरासमोर उभारणाऱ्या नामदेवांचं स्मरण करणं आवश्यक आहे. ते स्मरण हे महानामा पुस्तक नक्कीच करून देतं.'

‘दिवाळी अंक असतात तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा असणा-या आषाढीचे अंक का नाहीत, अशी भूमिका घेऊन गेल्या आषाढीत रिंगण या आषाढी अंकाची सुरुवात झाली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या अंकात संपादित केलेले लेख अधिक सविस्तरपणे मांडत तसेच नव्या लेखांची भर टाकून ‘महानामा’ हा ग्रंथ तयार झाला आहे. ‘रिंगण’प्रमाणेच ‘महानामा’चंही महाराष्ट्रभर स्वागत होईल’, अशी खात्री संपादक सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी व्यक्त केली. याप्रसंगी ‘कलमनामा’चे संपादक युवराज मोहिते यांच्यासह अनेक पत्रकार आवर्जून उपस्थित होते. ‘मनोविकास प्रकाशन’चे संचालक आशिश पाटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

‘महानामा’ या अडीचशे पानी ग्रंथाला ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना आहे. तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, गुजरात, नामदेवांचं जन्मगाव नरसी, कर्मभूमी पंढरपूर येथे प्रत्यक्ष जाऊन नामदेवांच्या पाऊलखुणा शोधत केलेले रिपोर्ताज आहेत. तर भालचंद्र नेमाडे, भारतकुमार राऊत, अशोक कामत, कै. म. वा. धोंड, कै. मु. श्री. कानडे, नि. ना. रेळेकर, रामदास डांगे, लंडन येथील खालसा कॉलेजच्या प्राचार्य माधवी आमडेकर, भास्कर हांडे, अभिनेते गोविंद नामदेव, वीणा मनचंदा, शिवाजीराव मोहिते, संजय सोनवणी, ओमश्रीश दत्तोपासक, आप्पासाहेब पुजारी, मंगला सासवडे, अझीझ नदाफ, दिलीप जोशी, सुनील यावलीकर, शामसुंदर सोन्नर, अंजली मालकर यांच्या अभ्यासपूर्ण लेखांमधे नामदेवांच्या कर्तृत्वाचा चहुअंगाने वेध घेण्यात आला आहे. पुस्तकाची किंमत २५० रुपये आहे. हे पुस्तक महाराष्ट्रभर प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.

संपर्कः मनोविकास प्रकाशनः ०२०-६५२६२९५०

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.