टॉप न्यूज

अणू उर्जा प्रकल्पाला विरोध

मुश्ताक खान

चिपळूण - विकासाला आमचा विरोध नाही पण आम्हा सर्वसामान्य माणसांना स्वच्छ श्वास घेवू द्या, अशी आर्जव  करत ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अणू उर्जा प्रकल्पाला एकप्रकारे आपला विरोध जाहीर केला. साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या अध्यक्षीय भाषणावेळी त्यांनी आपली भूमिका जाहिर केली.

 फरक जपला पाहिजे

लेखकाला धमकी देणं सर्वात सोपं होतं असं म्हणत लेखकाने आणि नेत्यांनी एकमेकांमधला फरक जपला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राजकीय नेत्यांकडे कार्यकर्ते असतात पण लेखकाकडे कार्यकर्ते नसण हेच त्याचं बळ आहे. साहित्य संमेलन संपल्यानंतर मी साताऱ्यात जणार आहे, माझ्या तोंडाला काळं पुसा असं म्हणून त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. प्रत्येक गोष्टीला विरोध न करता उदार दृष्टीकोनाने काम केलं पाहिजे, असंही त्यांनी सुनावलं.

लिहिताना भान राखा

साहित्यिकांनी आपल्या लेखणीमधून भूमीका मांडली पाहिजे. समाजाला जवळ आणणारी बंधुता कशी निर्माण होईल, याचं भान राखणं गरजेचं आहे.  साहित्यिक असो किंवा पत्रकार प्रत्येकानं लिहिताना भान राखलं पाहिजे. आपल्या लिखाणानं साध्या माणसांचा अक्षरावरचा विश्वास उडणार नाही, हेही पाहणं अत्यंत गरजेचं आहे, असंही त्यांनी निक्षून सांगितलं. डॉ. कोतापल्ले यांनी एकनाथ महाराजांच्या अभंगाने आपल्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप केला. 

संमेलन यशस्वी झाल्याचे समाधान - तटकरे

साहित्य संमेलनाचं यशस्वितेचं श्रेय रसिकांना देत सहकार्य केलेल्यांचे आणि असहकार पुकारलेल्या सर्वांचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांनी आभार  मानले. साहित्य संमेलन सुरु होण्यापूर्वी थोडेसं दडपण होतं. पण संयोजन समितीनं अतिशय उत्कृष्टपणे काम करुन संमेलन १०० टक्के यशस्वी केलं म्हणून मी समाधानी आहे, असंही ते म्हणाले. साहित्य संमेलनामध्ये आपल्याला संधी मिळावी असं प्रत्येक कविला वाटत असतं, पण तस होत नाही. पण त्यांनी खचून न जातं आपली तयारी आणि पुढच्या साहित्य संमेलनामध्ये कशी संधी मिळेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही सांगितलं.

तावडेंचे चिमटे आणि खसखस

समारोपाला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सुनील तटकरेंना चिमटे काढत सोहळ्यात रंगत आणली. सिंचनाची श्वेतपत्रिका काढत तुम्ही उत्कृष्ट ललिताची निर्मिती केलीय, असं म्हणतात एकच खसखस पिकली.

भावना दुखावू नका

परशुला आणि परशुरामाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचा चिपळूणचे माजी आमदार निशिकांत जोशी यांनी चांगलाच समाचार घेतला. आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका. परशुरामात आमच्या भावना गुंतल्यात. त्या कुणी दुखावण्याचा प्रत्यन करु नका, असंही त्यांनी सुनावलं.

ठराव

राज्याला भेडसावणाऱ्या काही महत्त्वाचे प्रश्न लवकरात लवकर सुटावे यासाठी साहित्य संमेलनात ठराव मांडण्यात आले. सीमावासीयांसंर्दभातही अत्यंत महत्त्वाचा ठराव यावेळी मांडण्यात आला. कोर्टात महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी अभिवक्त्यांना मदत करण्यासाठी भाषिक प्रश्नांचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक राज्य सरकारने त्वरित करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय मराठीमधील उत्तम साहित्य इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनुवादित करण्यासाठी सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाने रीतसर विशेष अनुदान द्यावं, अशी मागणीही पुढे आली. मराठी शाळेचा मुद्दा अजेंड्यावर घेण्यात आला. मराठी शाळा समृद्ध होण्यासाठी सरकारने गांभीर्यानं पावलं उचलावीत, असाही ठराव झाला. मराठवाड्याला त्वरित पाणी मिळावं यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, या ठरावाचाही समावेश आहे.  

साहित्य संमलेनच्या शेवटच्या दिवसाचं समारोप कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आयोजित केलेल्या शंभर नंबरी सोने या कार्यक्रमाने झालं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.