टॉप न्यूज

शहरात पतंग, गावाकडं झुंजी

ब्युरो रिपोर्ट, मुंबई

मुंबई - संक्रांतीच्या दरम्यान भारतात बर्‍याच ठिकाणी पतंग उडवण्याची प्रथा आहे. गुजरातमध्ये तर पतंग महोत्सव साजरा होतो. त्यासाठी देशविदेशातील पर्यटक अहमदाबादला आलेत. राज्यात मुंबई, नागपूर, नाशिक आदी शहरांमध्येही मोठ्या संख्येनं पतंगबाजी सुरू आहे. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कोंबड्यांच्या, रेड्यांच्या झुंजी लावल्या जातायत.

अलीकडं संक्रांतीला पतंग उडवण्याचा प्रकार राज्यातही रुजतोय. मुंबईचे किनारे पतंगबाजांच्या गर्दीनं गजबजून गेलेत. आकाशाला गवसणी घालणारा, उंच उंच पतंग उडवणं, काटाकाटीचा आनंद लुटणं याची मौज काही औरच असते. त्यामुळंच तरुणाई संक्रांती दिवशी पतंग उडवण्यात रस घेऊ लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

नगरमध्येही पतंगबाजी...

आज संक्रांत असली तरी काल (रविवारी) दिवसभर नगरमधील बागडपट्टीत तरुणाईनं पतंग खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. नगरमध्ये संक्रांतीला खास पतंग उडवायची अशी बहारच असते. त्यासाठी बागडपट्टीची ही गल्ली रात्रीपासूनच फुलून गेलीय. अगदी रात्रभर पतंग, मांज्या आणि चकारीची खरेदी सुरू होती. मुंबई स्टाईल, टुक्कल, वावडी, छर्या, डुक्की अशा खास पतंगांबरोबरच, बरेली, काची अशा भन्नाट मांज्यांचीही खरेदी नगरकरांनी केलीय. त्याचबरोबर पतंगांची काटाकाटी अर्थात कई-कापे अशी आरोळी ठोकून लागणाऱ्या स्पर्धेसाठी तितकीच तगडी पाहिजे ती मांज्याची चकरी... त्यामुळंच तिची मजबुती बघून, नीट पारखून मगच त्याची खरेदी केली जात होती. आता तिळगुळानं तोंड गोड करून पतंग उडवायला सुरुवात झाली. बघा तर खरं आकाश पतंगांनी भरून गेलंय. सायंकाळी हा पतंगबाजीचा जल्लोष भरात येईल.

तुम्हाला हे माहितीय...?

 • पतंग उडवणं हा एक आकर्षक आणि मनोरंजक क्रीडा प्रकार आहे.
 • पतंगाचा जन्म साधारणतः दीड हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाला.
 • चीनमध्ये हान सिन शासनकाळात पतंग उडवले जात असल्याचा उल्लेख मिळतो.
 • भारतातदेखील प्राचीन काळापासून पतंग उडवले जातात.
 • संस्कृतमध्ये पतंगासाठी 'बालगडी' असा शब्द आलाय.
 • तुलसीदासांनीही पतंगाला बालगुडी म्हटलंय.
 • पतंगाचा संस्कृत अर्थ आहे, हवेत उडणारी वस्तू.
 • आपल्या देशात विशेषतः मोगलांच्या काळात पतंगाचा छंद विशेष जोपासला गेला.
 • दिवाळीनंतर या खेळाचा हंगाम सुरू होतो आणि तो संक्रांतीनंतर संपतो.
 • अमेरिकी शास्त्रज्ञ मायकल फॅराडे यांनी जून १७५२ मध्ये पतंगाच्या सहाय्यानं आकाशातल्या विजेचा शोध लावला.
 • विमानांचा शोध लागेपर्यंत पूर्वी पतंगाचा सैनिकी आणि इतर उपयुक्त कामांसाठीही उपयोग केला जात होता.
 • अहमदाबाद इथं २ फेब्रुवारी १९८६ मध्ये एक पतंग संग्रहालयदेखील उभारण्यात आलंय.

Comments

 • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.