टॉप न्यूज

राजू शेट्टी यांनी पेटवलं रान

ब्युरो रिपोर्ट, सांगली

मांजर्डे (ता. तासगाव) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिली दुष्काळ निर्मूलन परिषद झाली. वेळ पडली जीवाची बाजी लावू पण दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, अस सांगून दुष्काळग्रस्तांसाठी काय पण करायला आपण तयार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 

राज्यकर्त्यांनी अनेक वर्षे दुष्काळग्रस्तांना पाण्याची स्वप्ने दाखविली. ही स्वप्ने विकून राज्यकर्त्यांनी स्वतःची दुकानदारी चालविली आहे असा आरोप करुन शेतीला आता पाणी मिळाले नाही, तर राज्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.
तर पुन्हा दुष्काळ आला नसता
खा. शेट्टी म्हणाले, 'वेळेवर पाणी योजना पूर्ण झाल्या असत्या तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा दुष्काळ आला नसता. कररूपानं मिळालेला पैसा घोटाळ्यात खर्च झाला. एकेक खासदार चाळीस चाळीस हजार कोटी रुपये पचवत असेल, तर शेतकऱ्याला पाणी कसं मिळणार? चाळीस हजार कोटींचा मेळ घालणं जमतं पण पाणी योजना पूर्ण करण्यासाठी 4 हजार कोटी रुपये देताना मात्र राज्यकर्त्यांच्या तिजोरीत खडखडाट असतो. ज्या शेतकऱ्यांनी एकत्रित लढा देऊन 132 कारखानदारांच्या घशातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 4 हजार 800 कोटी रुपये परत मिळविले. त्यांना 4 हजार कोटींच काय 40 हजार कोटी मिळवणंही सहजशक्‍य आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी एकजूट केली पाहिजे. शेतकऱ्याने मूठ वळवून सामर्थ्य दाखवलं तर सरकारला गुडघे टेकावे लागतील.'
प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांचही घणाघाती भाषण झालं. आता काही जण प्रतिशेतकरी परिषद घेत आहेत; पण माझं त्यांना सांगणं आहे, की परिषद कसली घेता? तुम्हाला ज्यासाठी निवडून दिलं त्या शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवा. द्राक्षबागा तुटल्या. त्यांना नुकसानभरपाई द्या, जनावरांना चारा आणि पाणी द्या आणि मग परिषद भरवा, असं त्यांनी सुनावलं.
आबांना झोडलं
खासदार शेट्टी वगळता बहुतांश वक्‍त्यांनी आर. आर. पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील हे सर्वत्र लोकशाहीच्या गप्पा मारीत आहेत मात्र त्यांच्या तासगावातच हाताच्या बोटावरील शाई इतकीच लोकशाही असून बाकी ठोकशाही आहे, असा आरोप सदाभाऊ पाटील यांनी केला.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.