टॉप न्यूज

फेब्रुवारीपासून राज्याचा दौरा

ब्युरो रिपोर्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दुसरी इनिंग आता खऱ्या अर्थानं सुरू झालीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मनसे अधिक मजबूत करण्यासाठी राज ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. १० फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान त्यांचा हा दौरा असणार आहे.

या दौऱ्यातून राज्य सरकारच्या विरोधात राज्यभर रान उठवण्याची तयारी राज यांनी केलीय. हे सरकार निष्क्रिय आहे, लोकांचे अनेक प्रश्न आहेत, मात्र त्याची सोडवणूक होताना दिसत नाही, अशी टीका त्यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत केली. सोलापूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या महत्त्वाच्या सात शहरांत राज यांच्या जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय. त्याशिवाय पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राज ठाकरे प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेणार आहेत. 

मुंबईतला परप्रांतीयांच्या विरोधातला लढा यापुढंही अधिक आक्रमकपणे सुरूच  राहील, असंही राज ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत बजावलं. याशिवाय मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केल्यानं सहाय्यक पोलीस आयुक्त ढोबळे यांची बदली झालीय. आता फेरीवाल्यांनी त्यासाठी जर मोर्चा काढला तर त्यांना मनसेस्टाईल उत्तर दिलं जाईल, असा इशाराही राज यांनी दिला. अनधिकृत फेरीवाले परप्रांतीय आहेत. त्यांच्यावर महापालिकेनं कारवाई करावी. त्या कारवाईविरोधात ते कशी आरडाओरड करू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भारतीय सैनिकांच्या विटंबना प्रकाराबद्दल राज यांनी मत व्यक्त केलं.  ते दोन जवान सरकारच्या राजकारणाचे बळी ठरलेत असं ते म्हणाले. सरकारला एखाद्या गोष्टीवरून लक्ष हटवायचं असतं तेव्हा सीमेवर अशा घटना घडतात. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळा, हॅाकी खेळा किंवा समझोता बस पाठवा, त्यांच्यात काही सुधारणा होत नाही, हेच या घटनेवरून स्पष्ट होतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.