टॉप न्यूज

आगळीवेगळी विद्यार्थी संसद

सुमित बागुल

पुणे - भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. या देशातील ५० टक्के लोक हे २५ वर्षांखालील तर ६५ टक्के लोक हे ३५ वर्षांखालील आहेत. या तरुण भारतासमोर त्यांच्या भविष्याची स्वप्नं आहेत. दिवसेंदिवस ते स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रात सिद्ध करताना दिसतात. या तरुणाईला अनेक प्रश्नदेखील पडतायत. त्यांची समर्पक उत्तरं मिळावीत आणि तरुणांना स्फूर्ती, दिशा मिळावी, या उद्देशानं पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्थेनं 'भारतीय छात्र संसद' या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
तीन दिवस पार पडलेल्या या संसदेत देशभरातील सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, बी.बी.सी. इंडियाचे माजी ब्युरो चीफ मार्क ट्युली, 'सार्क'चे संचालक महम्मद गफुरी, बिर्ला फाऊंडेशनच्या राजश्री बिर्ला आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. त्यांचे विचार ऐकून आणि त्यांच्याशी थेट संवाद साधून आयुष्यभराची शिदोरी मिळाल्याचं समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
 
संस्कृती जपा
"भारताचा पाया ज्या विचारांवर उभा आहे, त्याला छेद देण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य विचारांकडून केला जात आहे. मात्र, व्यक्तीपेक्षा समाजाला महत्त्व देणाऱ्या भारतीय संस्कृतीची जपणूक आपणच करायला पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञान ही प्रगतीची साधनं आहेत. पण त्यांचा योग्य वेळीच वापर करण्याची गरज आहे," असं मत बी.बी.सी.चे माजी ब्युरो चीफ मार्क ट्युली यांनी व्यक्त केले त्यावेळी तरुणाईनं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून त्यांना साथ दिली.

राजू शेट्टी आणि पाशा पटेलही
या संसदेची सुरुवात प्रख्यात इस्लामिक अभ्यासक मौलाना सय्यद क्ल्बे रुशाहीद रिझवी यांच्या भाषणानं झाली. त्यांनी 'रिसोल्व्ह कॉन्फ्लिक्ट - सिक पीस' या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुसऱ्या सत्रात देशातील अत्यंत गंभीर अशा शेतकऱ्यांच्या जीवनावर चर्चा झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार पाशा पटेल यांनी 'डाईंग फार्मर अॅण्ड ग्रोईंग इकॉनॉमी' या विषयावर संवाद साधला. तरुणाई शेती विषयातही किती रस घेते, याची झलक यावेळी पाहायला मिळाली.

महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला हे 'पॉलिटिक्स-डोण्ट हेट इट, बी पार्ट ऑफ इट' या विषयावर बोलले. विद्यार्थ्यांना त्यांनी मनातील प्रश्न विचारले. हा कार्यक्रमही चांगलाच रंगला. याशिवाय 'पॉलिटिक्स थ्रू द आय ऑफ इंडियन सिनेमा', तसंच 'यंग इंडिया, ओल्ड लीडर्स, व्हायब्रंट कॉर्पोरेट - व्हायब्रंट इंडिया' आणि 'एम्ब्रेस डायव्हर्सिटी - प्रोमोट युनिटी आणि पॉवर्टी : अ ग्रेटर टेरर?' या महत्त्वाच्या विषयांवरही मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

मनोज कुमार यांना जीवन गौरव पुरस्कार
कार्यक्रमाचा सांगता समारंभही थाटात झाला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. "भारतात राहून मी आज भारताचाच शोध घेत आहे," असं सांगून त्यांनी आपल्या थोर भारतभूमीला साजेसे पुत्र व्हा, असा सल्ला दिला.
देशातील प्रमुख २०० महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आलं. त्याचाही लाभ लाखो विद्यार्थ्यांनी घेतला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. राहुल कराड, मंगेश कराड आदी मान्यवरांनी घेतलेले कष्ट पदोपदी दिसत होते. उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी त्याबद्दल वेळोवेळी प्रशंसोद्गार काढले.

'भारत4इंडिया'नं साधला संवाद
अशा प्रकारचे कार्यक्रम जर भारतातील शहरांमध्ये आणि गावागावांत आयोजित केले गेले तर तरुणांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, अशा शब्दात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केला.
 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.