टॉप न्यूज

मराठी बनली उर्दूची बहीण

प्रवीण मनोहर
अमरावती- जातीच्या, धर्माच्या, प्रांतांच्या, भाषेच्या अशा एक ना अनेक भिंती आपण उभ्या केल्यात. मराठी मुलांनी उर्दू शाळेत जायचं नाही किंवा कानडी लोकांनी मराठी शाळा बंद करायच्या, असे नाना प्रकार. हे प्रकार समाज जोडत नाहीत तर तो तोडतात. पण असं समाज जोडण्याचं एक छोटंच पण मोठा धडा घालून देणारं काम केलंय, अमरावतीतल्या एका उर्दू शिक्षिकेनं.
 

ही शिक्षिका आहे, एका मराठमोळ्या घरातली. त्यांचं नाव ज्योती कवाडे. एरवी उर्दू शाळेत मराठी शिक्षक असणं दुर्मिळ. पण नांदगाव इथल्या खांडेश्वर उर्दू प्राथमिक शाळेत ज्योती कवाडे उर्दू शिकवतात. 
कवाडेंच्या घराजवळ लहानपणी उर्दू शाळा होती. त्यांच्या वडिलांचे मित्र असिफ अली त्या शाळेत उर्दू भाषा शिकवायचे. त्यांच्यामुळं ज्योती कवाडेंच्या वडिलांनी त्यांना या उर्दू शाळेत घालायचं ठरवलं. पण त्यांच्या नातेवाईकांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला. कारण ही शाळा मुस्लिम मुलांची! पण वडिलांनी सर्वांचा विरोध पत्करून ज्योतीला त्याच शाळेत घातलं.
बघता बघता लहानग्या ज्योतीला हुरुफे तहेजी अर्थात उर्दूमधल्या बाराखडीचा कधी लळा लागला हे समजलंही नाही. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून ज्योतीनं बारावी आणि मग अगदी डी. एड्.सुद्धा उर्दूतचं पूर्ण केलं. ''आता याच विषयात पी. एचडी. करण्याची माझी इच्छा आहे, '' असं ज्योती सांगतात.
उर्दू शिक्षण घेताना काही अडचणी आल्या का असं विचारलं असता, त्या सांगतात, ''जोपर्यंत शालेय  आणि महाविद्यालयीन शिक्षण चालू होतं तोपर्यंत काही अडचण नव्हती. पण डी. एड्.साठी अकोल्याला गेले तेव्हा तिथल्या वस्तीगृहातल्या मुस्लीम विद्यार्थीनी माझा स्वीकारच करायला तयार होईनात.  हळूहळू त्यांच्यासी मैत्री जमली. डी. एड. संपल्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी सोबतच  लग्नासाठी स्थळं यायला लागली. परंतु उर्दू माध्यमातील शिक्षणामुळं लग्न जुळायला वेळ लागला. लोक वडिलांना म्हणायचे, ही नक्कीच तुमची मुलगी नाही. मुस्लीम मुलगी तुम्ही घरात कशी ठेवली? एवढंच नाही तर एका स्थळानं तर चक्क तुम्ही खोटं बोलता म्हणून पोलिसांत तक्रारही नोंदवण्याची धमकी दिली.''
उर्दू भाषेला जसं ज्योती यांनी आपलसं केलं तसंच शाळेतल्या मुस्लीम शिक्षकांनाही त्यांनी आपलंसं केलं. सहकाऱ्यांनीही त्यांना सांभाळून घेतलं. आता ज्योती उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या  शिक्षिका बनल्यात. एक मराठी मुलगी केवळ उर्दू भाषा शिकतच नाही तर त्या भाषेची सेवा करते आहे. एवढंच नव्हे तर त्या भाषेत नवं संशोधनही करू पाहते आहे, याबद्दल त्या शाळेला आणि गावालाही अभिमान वाटतो आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.