टॉप न्यूज

आता कुत्र्यांच्या शर्यती

शशिकांत कोरे, सातारा

बळीराजाच्या बैलांच्या शर्यतीवर न्यायालयानं बंदी आणल्यानं आता राखणीचा कुत्रा यात्रांमधून धावताना दिसतोय. पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेत बैलांऐवजी कुत्र्यांची शर्यत पार पडली. बैलगाड्यांच्या शर्यतींना असतो अगदी तसाच जोश यावेळी पाहायला मिळाला. 'भिर्रर्र'ची जागा 'है छो...छो...छो' या आरोळ्यांनी घेतली होती.

पहिल्या नंबरात आलेल्या कुत्र्याच्या कौतुकातही कसूर नव्हती. 'व्वा रं माझ्या वाघ्या...' म्हणत अत्यानंदानं मालकाची थाप पाठीवर पडल्यावर कुत्र्याचा रुबाबही विजयी बैलांसारखाच दिसत होता.

शेतीच्या धबडग्यातून जरा उसंत मिळाल्यावर बळीराजाच्या मनोरंजनासाठी यात्रांमधून बैलगाड्यांच्या शर्यती होत होत्या. संपूर्ण राज्यभरात होणाऱ्या या शर्यती मराठी संस्कृतीचा अविभाज्य अंग होत्या. मात्र, शहरात हस्तीदंती मनोऱ्यात राहून प्राणीमित्र म्हणून मिरवणाऱ्यांच्या मनात आलं आणि त्यांनी शर्यतीत बैलांचे हाल होतात, एवढाच मुद्दा काढून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानं आता बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आलीय. पण खेड्यातल्या माणसानं काय घोडं मारलंय वो... मनोरंजन करून घ्यायला? बळीराजानं म्हणूनच हा कुत्र्यांच्या शर्यतीचा पर्याय शोधलाय.

कुत्र्यांच्या शर्यतीचं बेणं रुजतंय
पश्चिम महाराष्ट्र हा बागायती पट्टा. पूर्वी औंध संस्थानात यमाई देवीच्या यात्रेत बैलगाड्यांच्या शर्यतींबरोबरच कुत्र्यांच्याही शर्यती व्हायच्या. कालांतरानं त्या मागं पडल्या आणि बैलगाड्यांच्याच शर्यती  पुढं आल्या. आता न्यायालयाच्या आदेशामुळं 'माती हाय, पण बेणं नाय' अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी कालौघात मागं पडलेलं हे कुत्र्यांच्या शर्यतीचं बेणं बाहेर काढलंय. त्याला पुसेगावच्या यात्रेत मिळालेला लोकांचा प्रतिसाद पाहता ते रुजू लागल्याचं पाहायला मिळतंय.
 
100 जातिवंत कुत्र्यांचा सहभाग  
बैलगाड्यांच्या शर्यतीला असतो तसाच डिक्टो माहोल या कुत्र्यांच्या शर्यतीला होता. डॉग ट्रेनरकडून प्रशिक्षित केलेली विविध जातींची जवळपास 100 जातिवंत कुत्री स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आली होती. भागात आढळणाऱ्या गावठीपासून कारवार जातीपर्यंत आणि पंजाबातील प्युअर पंजाब ग्रेहाऊंडपासून ते परदेशातील नानाविध तऱ्हांची कुत्री इथं होती. एवढ्या प्रकारची कुत्री पहिल्यांदाच बघायला मिळाल्याचं समाधान यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर होतं. विशेष म्हणजे, यातील काही कुत्र्यांच्या किमती लाखाच्या घरात आहेत. तर सध्याच्या महागाईचा विचार करता त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्चही बक्कळ होतो. हे सर्व लक्षात घेता बैल आणि कुत्रा पाळणं सारखंच, असा अनुभव कुत्र्याचे मालक बोलून दाखवत होते.

मास्क वापरण्याचं बंधन
शर्यतीत धावणाऱ्या कुत्र्यांना एकमेकांमुळं इजा होऊ नये म्हणून त्यांना मास्क वापरण्याचं बंधन होतं. स्पर्धेत श्वानांबाबत पक्षपात होऊ नये म्हणून लॉट पद्धतीनं चिठ्ठ्या टाकून त्यांची निवड करण्यात आली होती. तसंच क्रॉसलाईन पार करणाऱ्या कुत्र्यांची निवड बिनचूक व्हावी, म्हणून देवस्थान ट्रस्टनं कॅमेऱ्याचीही व्यवस्था केली होती. सेवागिरी देवस्थान ट्रस्टनं भरवलेल्या या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून ट्रस्टचे पदाधिकारीही भारावून गेले होते.

खेळण्यातील सशामागं कुत्री सुसाट
ही शर्यत घेण्यासाठी खास धावपट्टी बनवण्यात आली होती. कुत्र्यांना धावण्यासाठी इशारा मिळताच खेळण्यातील सॅाफ्ट टॉईजमधील ससा मॅकेनिक पद्धतीनं त्याच्यापुढं पळवला जात होता. त्याच्यामागं स्पर्धक कुत्री चाकोरीतून सुसाट वेगानं पळत होती.
 
तीन गटात स्पर्धा
या श्वान स्पर्धेत तीन गट पाडण्यात आले होते. पहिला गट मूळ ग्रेहाऊंड जातीच्या कुत्र्यांचा होता आणि दुसऱ्या गटात देशी कुत्र्यांपासून संकर केलेले ग्रेहाऊंड जातीचे कुत्रे होते. तर तिसऱ्या गटात कारवान, पश्मी आणि इतर देशी जातीचे कुत्रे होते. तीन गटात झालेल्या या स्पर्धेसाठी प्रत्येक श्वानामागं 100 रुपये प्रवेश फी आकारण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेता कुत्रा आणि त्याच्या मालकाला अनुक्रमे रु, 7000, 5000, 3000 आणि रु. 1000 अशी रोख बक्षिसं आणि सन्मानचिन्हं देऊन गौरवण्यात आलं.

स्पर्धेत 13 जणांना विजेतेपद देण्यात आलं. विशेष म्हणजे सर्व जण सातारा जिल्ह्यातीलच आहेत.
जर्मन शेफर्ड गटात महेश कुलकर्णी, कोरेगाव, अंबादास कदम, पुसेगाव.
ग्रेट डेन गटात - उमेश अडसूळ कुमठे (ता. कोरेगाव), सचिन शेलार एकसळ (ता. कोरेगाव)
ग्रेहाऊंड गट - संतोष जाधव, चिंचनेर (ता. सातारा), अक्षय चव्हाण, महागाव (ता. सातारा)
कारवान हाऊंड - धैर्यशील पवार, लावंघर (ता. सातारा), विजय घोरपडे, डिस्कळ (ता. खटाव),
डॉबरमॅन गट - उत्तम जाधव, पुसेगाव

प्राणीमित्रांचा कळवळा खरा की खोटा...?
बैलांच्या शर्यतींवर टाच आणल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. दावणीच्या बैलांना आमी पोटच्या पोरांसारखं जपतो आणि मोठ्या हौसनं त्येंच्या अंगावर झुली टाकून शर्यतीसाठी आणत व्हतो. सुरुवातीला पळण्यासाठी बैलांना अमानवी पद्धतीनं छळवणूक झाल्याच्या घटना घडल्यात. पण अलीकडच्या काळात पळणाऱ्या बैलांना कसलीच मारहाण होत नव्हती. केवळ चुचकारून बैल पळवले जात होते. शेतकऱ्यांच्या मनोरंजनाचं हे हक्काचं साधन होतं. याचा कुठलाच विचार न करता या स्पर्धा  बंद केल्या. कधीतरी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांपुढं बिस्कुटाचा पुडा टाकून प्राणीमित्र झाल्याचा आव आणून मिरवणं वेगळं. आम्ही त्यांना जलमभर पाळतो वो! मग आता तुमीच सांगा त्यांचा खरा कळवळा त्यास्नी का आम्हास्नी? मग न्यायालयानं त्यांचं ऐकायला पाहिजे हुतं का आमचं, असा रोखठोक सवाल शेतकऱ्यांनी यावेळी 'भारत4इंडिया'शी बोलताना केला.

कुत्र्यांच्या शर्यतींचा उगम बर्फाळ प्रदेशात
कुत्र्यांच्या शर्यतींचा उगम टुंड्रासारख्या बर्फाळ प्रदेशात झाला असावा, असं अभ्यासकांचं मत आहे. पृथ्वीच्या अगदी उत्तर टोकाला कॅनडाच्या युकोन प्रांतात आजही कुत्र्यांच्या शर्यती होतात.
व्हाईटहॉर्सपासून ते अमेरिकेच्या अलास्का राज्यातील फेअरबँक्सपर्यंत सुमारे सोळाशे किलोमीटर होणारी कुत्र्यांची शर्यत जगप्रसिद्ध आहे. शर्यतीत भाग घेणाऱ्या स्पर्धकास 'मुशर' म्हणतात. मुशर कित्येक तास कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यात घालवतात. त्यांच्या सहवासात भरपूर वेळ घालवतात, कुत्र्यांच्या तळव्यांना मसाज करतात, त्यांच्या बरोबरीनं जेवतात. हा सहवास इतका जवळचा असतो की मुशर हा जणू स्वत:च कुत्रा बनतो, असं गमतीनं म्हटलं जातं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.