टॉप न्यूज

आमटी-भाकरीची यात्रा

अविनाश पवार
पुणे - प्रत्येक यात्रेचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. तसंच तिथं वाटप होणाऱ्या प्रसादातही. आणेगावातली श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी यात्राही अशीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथं महाप्रसाद म्हणून देण्यात येणारी आमटी-भाकरी सगळ्या गावकऱ्यांच्या दान पद्धतीनं बनवण्यात येते. ही आमटी बनवणारे पदाधिकारी-गावकरी आपलं लहानमोठेपणा विसरून हा प्रसाद बनवतात. संत रंगदास स्वामींनी समाजातल्या उच्च आणि गरिबांनी भेदभाव विसरून एकत्र यावं, या हेतूनं आमटी आणि भाकरीच्या प्रसादाची प्रथा इथं सुरू केल्याचं म्हटलं जातं.
 

Aamti puneभल्यामोठ्या 30 कढयांमध्ये आमटी
पुणे आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर असणारं आणेगाव हे १५०० लोकसंख्येचं गाव. इथं ही यात्रा सुमारे १२५ वर्षांपासून भरते. या गावात शेकडो वर्षांपूर्वी रंगदास स्वामी नावाचे संत होऊन गेले. ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी समाजातल्या श्रीमंत आणि गरीब घटकांना एकत्र आणण्याकरिता आमटी आणि भाकरीच्या प्रसादाची प्रथा सुरू केली, असं गावकरी सांगतात. या यात्रेतही विविध साहित्यांची आणि खाद्यपदार्थांची दुकानं थाटलेली होती. पण इथली खास बाब म्हणजे पारंपरिक पद्धतीनं या यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आमटी-भाकरीच्या महाप्रसादाचं होणारं वाटप. यंदा या आमटीच्या महाप्रसादासाठी 750 किलो तूरडाळ, 100 किलो मिरची, 250 किलो गूळ, 250 किलो शेंगदाणे, 250 किलो खोबरे, 30 तेलाचे डबे, 100 किलो धणे, 200 किलो बेसनपीठ, 5 गोणी मीठ आणि हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी आदी मिळून इतर 283 किलो मसाल्याचे पदार्थ जमा झाले. अशा एकूण जिन्नसांमधून भल्यामोठ्या 30 कढयांमध्ये ही आमटी बनवण्यात आली.

४० गावांमधून भाकऱ्यांचा ढीग
महत्त्वाचं म्हणजे या महाप्रसादासाठी आमटीबरोबर देण्यात येणाऱ्या भाकऱ्या आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांकडून जमा केल्या जातात. आसपासच्या ४० गावांतील महिला या भाकऱ्या घरी चुलीवर करून इथे आणून देतात. त्यामुळं इथं भाकऱ्यांचा मोठा ढीगच जमा होतो. महाप्रसादासाठी लागणारी ही सर्व साधनसामग्री देण्याकरता लागणारे दातेसुद्धा अनेक आहेत. विशेष म्हणजे २०२४ सालापर्यंतचे या अन्नप्रसादाचे दाते केव्हाच बुक झालेले आहेत.

विद्युत मोटारीचा वापर
ही एवढी मोठ्या प्रमाणात बनवण्यात आलेली आमटी महाप्रसादगृहाच्या वरच्या मजल्यावर घेऊन जाण्यासाठी विद्युत मोटारीचा वापर करण्यात आला होता. या उत्सवाच्या दोन दिवसांत सुमारे दीड लाख भाविकांनी कुठलाही भेदभाव न बाळगता इथल्या पारंपरिक रुचकर आमटी-भाकरीचा महाप्रसाद घेऊन मानसिक तृप्तीचा ढेकर दिला.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.