विद्रोही संमेलनात झाली गर्जनापारंपरिक आदिवासी वाद्यांचा गजर करत आणि समतेच्या मशाली पेटवून विद्रोही संमेलनाचं शनिवारी जोरदार उद्घाटन झालं. कर्नाटकचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांनी मशाल चेतवत संमेलनाचं उद्घाटन केलं. त्याचवेळी मशालींनी प्रेक्षागृहाला फेरी मारुन समतेची ग्वाही दिली. यावेळी विद्रोहींच्या घोषणांनी सगळा सभामंडप दुमदुमला.
संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव, माजी संमेलनाध्यक्ष राजा शिरगुप्पे यांनीही विचार मांडले.कर्नाटकातल्या बसवण्णांनी केलेली १२ व्या शतकातील क्रांती सांगून, आता ही ज्योत देशभर पेटवा आणि सर्वसमावेशकेतचं राज्य आणा, असं आवाहन उद्घाटक डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांनी केलं. तर कष्टकऱ्यांच्या आदिवासींच्या तळहातावर तरलेली ही पृथ्वी आहे, पण त्या कष्टकऱ्यांना या समाजात चेहराच नाही, त्यामुळं त्यांना आवाज आणि चेहरा देण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून करणार असल्याचं अध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव यांनी सांगितलं.
उद्घाटन सत्रानंतर पहिलाच कार्यक्रम गाजवला, तो महिलांनी.... भारतीय स्त्री समतेच्या ऐेतिहासिक संघर्षाचा वारसा सांगतानाच, त्यांच्या भवितव्याबाबत पुरुषांनी प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा, आमच्या पद्धतीनं आम्हाला जगू द्या, असं आवाहनही त्यांनी केलं. स्त्री-पुरुष पूरकतेसाठी पुन्हा स्त्रीनंच त्याग करायचा आणि पुरुषांनी काहीही करायचं नाही, हे आता चालणार असं ठणकावून सांगत लिंगभेदाचा धिक्कार परिसंवादात करण्यात आला. धर्म फक्त स्त्रीच्याच वेशभूषेवरून ओळखता यायला लागला, कारण पुरुषांनी तिच्यावर तशी बंधनंच लादली. त्यामुळं स्त्रीला गौण मानणारा धर्मच नव्हे, असंही मत परिसंवादाच्या अध्यक्षा नूतन माळवी यांनी व्यक्त केलं. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या आदिवासी स्त्रियांनी पारंपरिक गाणी सादर केली. आदिवासींची वेशभूषा आणि त्यांचं खाणं-पिणं एवढीच आदिवासी संस्कृती नाही, शहरी माणसांनी हे जाणून घ्यावं. त्यांच्या सामूहिक गाण्यातून त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या वेदना पाझरत असतात. त्यांचं दुख, आनंद सगळं काही त्या गाण्यातून व्यक्त होतं. ते जाणून घ्या, असं भावनिक आवाहन यावेळी वाहरू सोनवणे यांनी केलं.
सगळ्यांनाच उत्सुकता असलेला 'होय, आम्ही राक्षस आहोत' या विषयावरचा परिसंवाद मात्र उत्तरार्धात उगीचच रेंगाळला. विषय समजून सांगताना जी मांडणी आवश्यक होती, ती नीटशी झाली नाही, पण तरीही ब्राम्हण्यवाद्यांनी कृषीपूजक असूरांचा म्हणजेच राक्षसांना कसं दानव ठरवलं आणि मग समाजातल्या खालच्या वर्गालाही त्यांच्याशीच जोडायचा कसा प्रयत्न केला, याची मांडणी प्रा. गौतम काटकर, प्रा. शामकुमार मिरजकर यांनी केली. सगळी उपभोग्य साधनं वापरणाऱ्या देवांचा उदोउदो, आणि राक्षस- म्हणजे खऱ्या अर्थानं जो रक्षणकर्ता होता, त्याला मात्र शिव्या असं पुराण लिहीलं गेलंय, असंही यावेळी ठणकावण्यात आलं.
त्यानंतर कवींच्या बहारदार कविसंमेलनाचा घाट सजला, तो थेट उत्तररात्रीपर्यंत.....
एकूणातच आदिवासींच्या वाद्यांसह गाजलेली मिरवणूक आणि त्यानंतर वेगवेगळा विचार मांडत केलेला समतेचा संदेश-जागर यामुळे पहिला दिवस राहुरीत चांगलाच गाजला....
संमलनातील आजचे कार्य़क्रम
* मुलाखत
नंदू माधव, राजकुमार तांगडे, संभाजी भगत
* परिसंवाद – जाती अंताचा लढा- ऐतिहासिक आढावा आणि पुढील दिशा
अध्यक्ष – प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे
सहभाग – सचिन गरुड, डॉ. सुहास फडतर, जावेद पाशा, रावसाहेब पाटील, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. प्रकाश शिरसाट
* कथाकथन
प्रसेनजीत गायकवाड, अनिस शेख, देवदत्त हुसळे
* सडक नाटक
* गटचर्चा, मांडणी
मनोरंजन उद्योग – मीडियातील लोकप्रिय संस्कृतीविश्व व विषमता
ब्राह्मणी - भांडवली शिक्षणप्रणाली आणि मुक्तीचा यक्षप्रश्न
अभिजनांची मराठी व मराठी बोलीची बहुविविधता
बहुजनप्रतिकांचे वैदिकीकरण, ब्राह्मणी विकृतीकरण व बहुजन प्रतिकार
* समारोप सायंकाळी 5 वाजता
आयु. एकनाथ गायकवाड
आयु. हणुमंत उपरे
कॉ. धनाजी गुरव
सन्माननिय उपस्थिती - यशवंत मनोहर
आभाराचे भाषण – संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव
Comments
- No comments found