टॉप न्यूज

असण्यावर कधी जाणार?

राहुल विळदकर, राहुरी
राहुरी - विद्रोही साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लेखक राजकुमार तांगडे, अभिनेते नंदू माधव आणि शाहीर संभाजी भगत यांच्या एकत्रित मुलाखतीनं चांगलीच रंगत आणली. या तिघांच्या विविधरंगी अनुभवांनी रसिकांना खिळवून ठेवलं. तर कधी त्यांनी विचारलेल्या रोखठोक प्रश्नांनी अंतर्मुखही केलं. आमच्या असण्यावर कधी जाणार... असा रोकडा सवाल तांगडे यांनी केला.  
 

tangade11तरुणांची संख्या कमी का?
विजय मांडके आणि प्रशांत नाडगावकर यांनी या तिघांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी देऊळ या अत्यंत गाजलेल्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचा धमाल अनुभव राजकुमार तांगडे यांनी सांगितला. त्याचवेळी दिसण्यावर नकोहो, आमच्या असण्यावर कधी जाणार, असा रोकडा सवालही 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'च्या या लेखकानं सांस्कृतिक जातीयवाद्यांना केला. यावेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट लोकांच्या मनातील सल काय आहे, हे सांगून गेला. तरुण संमेलनात का कमी दिसतायत, अशी खंतही यावेळी तांगडे यांनी व्यक्त केली. त्याच वेळी उपेक्षितांचं अंतरंग उलगडून दाखवलं. तर 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'सारखे कित्येक सर्जनशील आणि नवमतवादी कथाविष्कार घडतील, असंही या तिघांनी सांगितलं.

बनगरवाडी ते हरिश्चंद्राची फॅक्टरी
'बनगरवाडी'पासून ते थेट 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'पर्यंतचे अनुभव नंदू माधव यांनी सांगितले. पण उगाच निरीक्षणाचे गोडवे गाण्यापेक्षा, खरं तर प्रत्यक्ष मुळाशी जाऊन अनुभव घेतले, तरच भूमिकेत जिवंतपणा उतरतो, असंही नंदूंनी आवर्जून सांगितलं. 'जन..गण..मन'च्या वेळचा खास अनुभवही त्यांनी सांगितला.

चळवळीमुळं शाहीर झालोय
शाहीर आहे म्हणून चळवळ गाजवायला आलेलो नाही, तर या चळवळीमुळं शाहीर झालोय, अशा शब्दात विद्रोही चळवळीचं ऋण शाहीर संभाजी भगत यांनी मान्य केलं. तथाकथित संस्कृतीच्या संत-तंताची गाणी गाऊन गानकोकिळा म्हणून मिरवणाऱ्या लताबाईंचा आवाज आम्हाला गोड वाटेलच कसा, कारण त्यांनी आमची नाही तरी किमान आमच्या बापाची तरी गाणी कधी म्हटली का, असा दणकावणारा सवाल करत शाहिरांनी घुसमटलेल्या भावनांना वाट करून दिली. माग-पुढं तुमचा मंगेशच उभा, मग आम्ही कुठं आहोत ते तरी सांगा की, असंही या विद्रोही शाहिरानं विचारलं. याच वेळी चार भिंतींच्या आत, कंपूशाहीत गुणगुणल्या जाणाऱ्या कविता आणि त्यांच्या आशयावरही प्रहार करत, ''रानात कानात कशाला सांगायला पाहिजे हो तुमचं नातं, भल्या पहाटेला कशाला जातात, हे माहिती आहे सगळ्यांना,'' असा मार्मिक टोलाही भगतांनी हाणला.
सभामंडपाने या तिघांच्याही विचारांना जबरदस्त प्रतिसाद दिला. यावेळी जाता-जाता शाहिरांनी त्यांच्या पहाडी आवाजात एक समतावादी आणि सडलेल्या समाजव्यवस्थेवर प्रहार करणारं कवनही सादर केलं

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.