टॉप न्यूज

पाणी जपून वापरा

यशवंत यादव, सोलापूर
महाराष्ट्रातील पाणी प्रश्न गंभीर असून, पुढील सहा महिने पाणी जपून वापरावं लागणार आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीनं वापर करावा, तसंच कमीत कमी पाण्यात पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं तंत्र शेतकऱ्यांनी अवगत करावं, असं आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी अकलूज इथं झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीत केलं.
 


Asharad pawar.pngसोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, जलसंपदा मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. विजयसिंह मोहिते-पाटील, तसंच जिल्ह्यातील सर्व आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पवारांनी यावेळी केलेल्या आपल्या भाषणातून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी काही शाश्वत उपाययोजनांची मांडणी केली. यातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणं...


एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम प्रभावीपणं राबवा

यंदाचा दुष्काळ हा 1972च्या दुष्काळापेक्षाही अधिक गंभीर आहे. त्यावेळी अन्नधान्याची टंचाई होती. आता अन्नधान्याचा साठा मुबलक आहे, परंतु पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्यानं पाण्याचं भलंमोठं संकट समोर उभं आहे. मागील काही काळापासून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्यानं भू-गर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेलीय. ही पातळी भरून काढण्यासाठी एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम प्रभावीपणं राबवणं गरजेचं आहे. यासाठी पाणलोट विकास विभागानं पुढाकार घ्यायला हवा.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना अशक्य
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यासाठी उपयुक्त असणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना खर्चिक असून, न परडवडणारी आहे. हा प्रकल्प 24 हजार कोटी रुपयांचा असल्यामुळं ही योजना सध्या तरी आखणं अशक्य आहे. अशा मोठ्या सिंचन प्रकल्पापेक्षा कमी काळात चांगला फायदा करून देणारे प्रकल्प हाती घ्यायला हवेत.

`शिरपूर पॅटर्न` राबवा
पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवण्याचा सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करायला हवा. सोलापूर जिल्ह्यातील एकूण 28 साखर कारखान्यांनी धुळे जिल्ह्यातील `शिरपूर पॅटर्न` राबवण्यासाठी पुढं यावं. यासाठी प्रत्येक कारखान्यानं 5 कोटी रुपये खर्च करावेत. कारखान्याच्या लाभक्षेत्रातील ओढे, नाले दुरुस्त करावेत, गाळ काढावा, नाला सरळीकरण आणि तलावाची दुरुस्ती अशा प्रकारची कामं करावीत. अशा कामासाठी केंद्र सरकारकडून एनसीडीसीतूनही मदत केली जाईल. राज्यामध्ये हा कार्यक्रम सर्व कारखान्यांमार्फत राबवल्यास यासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीच्या खर्चासाठी बँकांमार्फत अर्थसहाय्य मिळवून दिलं जाईल.

ठिबक सिंचन हाच उपाय
येणाऱ्या काळात ऊस, फळबागांना पाटानं पाणी देणं परवडणारं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना या पिकास ठिबक सिंचनद्वारेच पाणी देणं बंधनकारक करावं लागेल.

योग्य उसाच्या जातीची निवड
साखर उद्योगाला लागणारं पाणी हा चिंतेचा विषय झालाय. कमी पाण्यामध्ये भरपूर उत्पादन आणि जास्त साखर उतारा देणाऱ्या उसाच्या जातीची शेतकऱ्यांनी लागवड करावी.

ऊस शिल्लक ठेवा
राज्यातील साखर कारखान्यांनी जनावरांच्या छावण्यासाठी आणि पुढील हंगामात ऊस लागवड करण्यासाठी काही ऊस राखीव ठेवावा.

टॅंकरद्वारं पाणी देऊन फळबागा जगवणाऱ्या शेतकऱ्यांना मदत
यंदाच्या दुष्काळात टॅंकरद्वारं पाणी देऊन फळबागा जगवणाऱ्या कष्टाळू शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्यावतीनं मदत केली जाणार आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा.

कर्नाटकातून पाणी मिळेल
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणातून महाराष्ट्राला 2 टीएमसी पाणी देण्याबाबत विचार करतंय. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील टीम याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यासाठी जाणारही आहे. यापूर्वी महाराष्ट्र संकटाच्या काळात इतर राज्यांच्या मदतीला धावून गेलाय. त्यामुळं यंदाच्या दुष्काळात शेजारच्या राज्याकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण 5 वरून 10 टक्के करण्यात आलंय. त्यामुळं पेट्रोलच्या किमती कमी होण्यास मदत होईल.

रब्बी नुकसान पाहणीसाठी केंद्राचं पथक
रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक येणार आहे. चारा आणि पाण्याची स्थिती, पिकं,  फळबाग याबाबत या पथकाकडून शिफारस येईल त्याप्रमाणं केंद्राकडून मदत केली जाईल.

सोलापूर जिल्हा आकडेवारी

  • जिल्ह्यात सध्या 232 टँकरद्वारं पाणीपुरवठा
  • 09 जनावरांच्या छावण्या सुरू
  • छावण्यांमध्ये सुमारे 1 लाख 17 हजार जनावरं
  • महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 710 कामं सुरू
  • या कामावर 8 हजार 310 मजुरांची उपस्थिती
  • या कामासाठी 53‍.60 कोटी रुपयांचा निधी प्राप्त

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.