टॉप न्यूज

विद्रोही संमेलनाचा समारोप

राहुल विळदकर, राहुरी
राहुरी - आधी आपण एक होऊ, मग जातीवाद्यांना गाडू. सातासमुद्रापार असलेल्या देशांतून आलेल्यांकडून धर्म शिकलात,  तो टिकवलात, पण आजही महारवाड्यातला बुद्ध मांगवाड्यातल्या बुद्धाकडं जात नाही. अरे, ही विषमता आधी उपटून काढा, मग समानतेच्या घोषणा ठोका, असा घणाघाती हल्ला चढवत, विद्रोही चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ आव्हाड यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचा विचारमंच दणाणून सोडला. 
 

dr. baburao guravsamaropदोन दिवस चाललेल्या या ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला.  यावेळी प्रा. हणुमंत उपरे, माजी अध्यक्ष राजा शिरगुप्पे, पार्थ पोळके, एकनाथ आव्हाड आणि अध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव यांनी विचार मांडले.
                                   
त्याआधी संमेलनात वेगवेगळ्या विषयांवरचे ठराव मांडण्यात आले. त्यात सीमा प्रश्न तातडीनं सोडवा, संगमनेरमधल्या चिकनी इथं शाहीर विठ्ठल उमप यांचं स्मारक बनवा, बोधेगाव (ता. शेवगाव, जि. नगर) हे शाहीर अण्णा भाऊ साठेंच्या नावानं ओळखलं जावं, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सरकारी अनुदान बंद करा, आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा आणि महात्मा फुलेंना भारतरत्न द्या, असे महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले.
                                                    
अरे, मी काल-परवाचा बुद्ध नाही, तर या मातीत रुजलेला त्या विशाल तत्त्वाचाच अंश आहे, अशी गर्जना करत एकनाथ आव्हाड यांनी आवाहन केलं- जर आमच्या भाकरीच्या तुकड्यात वाळू टाकणार असाल, तर या ढोंगी संस्कृतिवाद्यांच्याही गुलाबजामुनाच्या ताटात आता वाळू कालवायला शिका...!  तीन तासांच्या खुर्चीसाठी नागनाथ कोतापल्ले, तुम्ही परशुरामाची कुऱ्हाड पायावर मारून घेतलीत, हे काय केलं?  असा सवाल करून असल्या भरकटलेल्या वृत्तीची विद्रोही चळवळीला गरज नसल्याचं गायकवाडांनी ठासून सांगितलं. त्याच वेळी आमच्यामुळं आज हिंदू धर्म उभा असताना, आम्हालाच यातून ढकलून, तळागाळात लोटलं.  त्यामुळंच आता बुद्ध धर्माचा प्रवर्तक झालोय आणि ओबीसींचा मोर्चाही तिकडंच वळवतोय, असं प्रा. हणुमंत उपरे यांनी सांगितलं. तर या माजलेल्या सरंजाम्यांच्या भांडवली गढ्या पडल्याच पाहिजेत, त्याशिवाय आपली घरं नव्यानं निर्माण होणार नाहीत, असं अध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव यांनी ठणकावून सांगितलं. आपल्याच चळवळीत गुपचूप घुसून विरोधक विद्रोहींबद्द्ल गैरसमज पसरवत आहेत. त्यांना वेळीच आवरलं पाहिजे, असंही गुरव यांनी सागितलं. आम्ही एक वेळ गुलालानं न्हाणार नाही, पण गुलाल नक्की कुणाच्या अंगावर टाकायचा हे चांगलंच हेरलंय, असं यावेळी एकनाथ गायकवाडांनीही म्हटलंय.
एकंदरीतच अपेक्षेप्रमाणं वैगुण्यावर बोट ठेवून, तमाम तथाकथिक बुद्धिवाद्यांच्या जातिबद्ध संस्कृतीवर कोरडे ओढत या संमेलनाचा समारोप झाला.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.