टॉप न्यूज

तळेगाव दशासरचा शंकरपट

प्रवीण मनोहर, अमरावती
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर हे गाव वऱ्हाडात ओळखलं जातं ते शंकरपटासाठी. या गावाला पटाचं तळेगावसुद्धा म्हणतात. शेतातील कामं थोडी हातावेगळी झाली की, शेतकरी आपल्या खोंडांचा शंकरपट भरवतात. शंकरपट म्हणजे बैलजोडीची शर्यत. सर्वोच्च न्यायालयानं घातलेल्या बंदीमुळं दीडशे वर्षांपासून सुरू असलेला हा शंकरपट यावर्षी जवळजवळ रद्दच झाला होता. मात्र, शेतकऱ्यांनी केलेल्या जोरदार आग्रहामुळं त्याचं आयोजन होऊन ही दीडशे वर्षांची परंपरा कायम ठेवली गेली.
 

shankarpatबैलांवर मुलांसारखं प्रेम
शेतकरी बैलांवर आपल्या मुलांसारखं प्रेम करतात. शर्यतीत धावणाऱ्या बैलांची काळजीपूर्वक निगा राखतात. त्यांना नियमित खुराक दिला जातो. त्यांचं ऊन-वारा-पावसापासून रक्षण केलं जातं. स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी बैलांच्या पाठीवर रंगीबेरंगी झुला पांघरला जातो, त्यांची शिंगं रंगवली जातात. त्यावर मोरपिसांचा पिसारा आणि कवड्यांचा शृंगार करून सजवून मग त्यांना पटात आणलं जातं. या स्पर्धेची तयारी वर्षभर केली जाते. ही तयारीची खोंडं मग शर्यतीत सुस्साट धावतात. कुस्तीचा फड मारल्यावर जसा एखादा पहिलवान छाती पुढं काढून मिरवतो त्याप्रमाणं या स्पर्धेतील विजेत्या खोंडांचाही रुबाब असतो. या विजेत्या खोंडांसोबतच त्यांचा मालक बळीराजाचीही वट वाढते.

 

खोंडांना खुराक काजू, बदामाचा
"कधी पोटच्या लेकराला दूधदुभतं दिलं जात नाही. मात्र या खोंडांना काजू, बदाम असा खास खुराक  लोण्यासोबत देतो. ऊन-वारा-पावसापासून त्यांची आम्ही काळजी घेतो.” वाशीम जिल्ह्यातून आलेले जाहाँगीर खाँ पठाण सांगत होते. ते आपल्या बैलांसाठी राहुटी करून राहतात. आपल्या बैलांना कुण्या नोकराचाकराच्या भरवशावर ठेवत नाहीत. ते स्वतः बैलांची सेवा करतात.

 

दशासरचा पट म्हणजे एक उत्सवच
वऱ्हाडातील तळेगाव दशासरचा हा पट म्हणजे शेतकऱ्यांचा एक उत्सवच असतो, असं या शंकरपटाचे आयोजक रावसाहेब देशमुख सांगतात. या शंकरपटात सुसाट वेगानं पळणारी रेंगी वजनानं अत्यंत हलकी असते. शर्यतीच्या धावपट्टीच्या बाजूनं विशिष्ट अंतरावर दोन खांब रोवलेले असतात. त्यांना धागा बांधला राहतो जोडीनं. या दोन धाग्यांमधील अंतर साडेचारशे फुटांचं असतं. हा पहिला धागा तोडला की घड्याळ सुरू होतं आणि दुसऱ्या धाग्यातून जोडी गेली की घड्याळ बंद होतं. त्या दोन धाग्यांमधून धावतानाचा नेमका वेग या घड्याळात नोंद होतो. जी जोडी कमीत कमी वेळात हे अंतर कापेल ती विजयी ठरते. हे अंतर प्रत्येक ठिकाणी सारखं नसतं.

 

"देशात फक्त शेतकऱ्यांना दडपण्याचंच काम केलं जातंय. संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारूच्या फँक्टरींवर सरकार बंदी आणत नाही. मात्र, शेतकऱ्यानं थोडा विरंगुळा म्हणून हा शंकरपट भरवला तर बंदी आणली जाते,” ही खंत अय्याज खाँ पठाण या शेतकऱ्यानं व्यक्त करतानाच हे अन्यायकारक आहे असं तो पुढं म्हणतो.

 

लोकप्रतिनिधींचंही समर्थन
इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीही शेतकऱ्यांच्याच बाजूनं समर्थन दिलंय. चांदूर रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी तर न्यायालयाला विनवलंय की, आम्ही मिळेल ती शिक्षा भोगायला तयार आहोत, पण जनभावना नाकारू शकत नाही. आम्हाला तिचा आदर करावाच लागेल.

 

सर्वोच्य न्यायालयानं शंकरपटाच्या संदर्भात बंदीचे आदेश काढल्यानंतरही हा शंकरपट शेतकऱ्यांनी भरवला आहे. शंकरपटाच्या बाबतीत काही नियम करावेत, मात्र शेतकऱ्यांचा पारंपरिक खेळ असलेली शर्यत बंद करण्यात येऊ नये, हाच इथल्या शेतकऱ्यांच्या बोलण्याचा सूर होता. कारण शेतकरीही न्यायालयाचा आदर करतो, मात्र न्यायालयानंही शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करावा हीच बळीराजाची विनंती आहे.

 

दरम्यान, बैलगाड्यांवरील शर्यतीला न्यायालयाची बंदी आहे. न्यायालयाचा आदेश झुगारून राज्यात बैलगाडा शर्यती सुरू असतील तर ते बेकायदा असून आपण याबाबत प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची विनंती करणार असल्याचे प्राणीमित्र संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कांकरिया यांनी सांगितलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.