टॉप न्यूज

हर्णे बंदरातली मासेमारी झाली ठप्प

मुश्ताक खान, हर्णे, रत्नागिरी
समुद्रातील मासळीचं प्रमाण घटल्यानं आधीच मेटाकुटीला आलेल्या मच्छीमारांवर आता डिझेल दरवाढीची कुऱ्हाड कोसळलीय. दरवाढीविरोधात हर्णे बंदरातल्या मच्छीमारांनी मासेमारी बंद आंदोलन सुरू केलंय. डिझेलच्या भावात झालेली वाढ दोन दिवसांत कमी झाली नाही, तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशी तीव्र निराशेची भावनाही मच्छीमार बांधवांनी ‘भारत4इंडिया’कडं व्यक्त केलीय.
 

डिझेल दरवाढीमुळं मच्छीमार बांधवांवर त्सुनामी संकट आलंय. त्यांचं जगणं मुश्कील झालंय. मायबाप सरकारनं आमचं गाऱ्हाणं ऐकलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीत या सरकारला आम्ही नामशेष करून टाकू, असा निर्धार त्यांनी केलाय. त्याचबरोबर हर्णे बंदरात मच्छीमार बांधवांनी आपली एकजूट दाखवत सध्या मच्छीमारी १०० टक्के बंद केलीय.

मच्छीमार ठोक ग्राहक

३५ वर्षांपूर्वी सरकारनं मच्छीमारांना डिझेलवर, तसंच अनुषंगिक अनुदान दिलं होतं. त्यामुळं तेव्हा मच्छीमारांना बाजारापेक्षा ३० टक्के कमी दरानं डिझेल मिळत होतं. त्यानंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणं दर वाढत गेले. मच्छीमारांना त्याचा फटका बसत होताच. पण आता तर सरकारनं कमालच केलीय. मच्छीमारांचं अनुदान तर रद्द केलंच. त्याचबरोबर त्यांना बल्क ग्राहकांच्या वर्गामध्ये टाकलं आहे. रिटेल ग्राहकांना प्रती लिटरमागे ४५ पैशांची दरवाढ, तर मच्छीमारांना ११ रुपये ६३ पैशांची दरवाढ केलीय. हा आमच्यावर अन्याय आहे, सरकारनं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी मच्छीमार बांधवांनी केलीय. खरं तर शेतकऱ्यांना ज्या सोयीसुविधा मिळतात त्याच सोयी आम्हालाही मिळाल्या पाहिजेत, पण सरकार यात दुजाभाव करतंय, अशी भावनाही त्यांच्या मनात निर्माण झालीय.

vlcsnap-2013-01-22-14h32m43s27हमी भाव द्या

पूर्वी घेतलेल्या डिझेलवर सरकार परतावाही देत होतं. प्रती लिटरमागे ८ रुपये परतावा मिळत होता. पण आता सरकारनं अनुदान बंद केल्यानं तेल कंपन्यांनी मच्छीमारांना रिटेलमधून काढून कमर्शियलमध्ये टाकलं आहे. सरकारनं आता परतावाही रद्द केला आणि मच्छीमारांना कोणत्याही प्रकारचा हमीभाव नाही. पहिल्यांदा या सरकारनं हमीभाव जाहीर करावा आणि शेतकऱ्यांप्रमाणं आम्हालाही बाजारपेठा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मच्छीमारांनी केलीय.

मासे मिळतात 25 टक्के

खरं तर सद्यपरिस्थितीत राज्यात माशांचा दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलीय. गेल्या वीस वर्षांत मासे मिळण्याच्या प्रमाणात प्रचंड घट झाली आहे. पूर्वी मिळणाऱ्या माशांच्या तुलनेत आता फक्त २५ टक्केच मासे मिळतात. जेव्हा मासे मिळायचे तेव्हा डिझेल स्वस्त होतं, पण आता मासे कमी मिळायला लागले आहेत, तर डिझेल महाग झालंय. या गंभीर प्रश्नावर उपाययोजना करण्याऐवजी सरकार फक्त दरवाढ करत आहे यापेक्षा दुर्दैव ते काय, अशा प्रतिक्रिया मच्छीमार बांधवांतून व्यक्त होतायत.

मच्छीमार भगिनीही मांडतायत व्यथा

आमच्याकडं शेती नाय, स्टॉकही नाय आणि बॅंक बॅलन्स तर नायच नाय. मच्छीमारीला जाणारे आमचे नवरे समुद्रातून परत येतील की नाही, याची शाश्वती नसते. जीवावर उदार होऊन काम केल्यानंतरही जर आम्हाला त्याचा मोबदला मिळत नसेल तर काहीच उपयोग नाही. हे मायबाप सरकार ऐका आमचं, आम्हाला देशोधडीला लावू नका, अशी आर्जवं या मासेविक्रेत्या भगिनींनी केलीय.

बंदचा इतर व्यवसायांनाही फटका

मच्छीमारांची अवस्था तर बिकट झालीच आहे, पण त्याचबरोबर त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायाचीही दुर्दशा झालीय. सध्या मासेमारी बंद असल्यामुळं बर्फ विक्रेते, भाजीवाले, चहा-वडेवाले चांगलेच अडचणीत आलेत. छोट्या बर्फ व्यावसायिकांचं तर १० ते २० हजारांचं नुकसान झालंय. त्याचबरोबर या बर्फ विक्रेत्यांकडे काम करणाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्यात. त्याचबरोबर दापोलीतल्या खवय्यांनाही स्वत:ला आवर घालावं लागणार आहे. हे जर असंच सुरू राहिलं तर पर्यटकांनाही माशांविनाच कोकण सफर करावी लागणार आहे. हॉटेल व्यावसायिकांवरही याचा परिणाम जाणवू लागलाय. त्यामुळं सरकारला डिझेल दरवाढीसंदर्भात काही तरी ठोस पावलं उचलावी लागतील, अशी परिस्थिती इथं निर्माण झालीय.

दोन कोटींची उलाढाल ठप्प

हर्णे बंदरात लहानमोठ्या हजार बोटी आहेत. त्यापैकी ७०० मोठ्या आहेत, तर तीनशे लहान बोटी आहेत. हर्णे बंदर हे लिलावासाठी पूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे. छोट्या बोटीवर ७ माणसं असतात, तर मोठ्या बोटीवर ९ माणसं असतात. त्यात तांडेल, खलाशी आणि नाखवा असतात, म्हणजेच या सर्वांचं कुटुंब मासेमारीवर अवलंबून आहे. हर्णे बंदरात ८ – १० हजार मच्छीमार बोटीवर जातात. ८ दिवस ते समुद्रात मासेमारी करतात आणि त्यानंतर हर्णे बंदरात येऊन माशांची विक्री करतात. दर दिवशी बंदरावर १५०-२०० बोटी येतात. प्रत्येक बोटीत जर एक लाखाचा मासा असेल तर एकूण उलाढाल ही दीड ते २ कोटीपर्यंत जाते. पण आता मासेमारी ठप्प झाल्यानं बंदराच्या तोंडचंच पाणी पळालंय.

Comments (3)

 • good morning
  Mushtak
  I have thanking for u. you are godest us. kolis desel problem salve in the month. I specialy thanking u.

 • गुड मॉर्निंग मुश्ताक,
  मी लेख वाचला खूप चांगला आहे. लेख वाचून एकंदरीत असे वाटले की मच्छीमारांच्या समस्या मांडणारा कोणीतरी आहे, याची जाणीव झाली.
  सांगायचे असे की ०५.०२.२०१३ रोजी संध्याकाळी ६ ते ७ Lemon news channel वर मच्छीमारांच्या समस्या बद्दल Live मुलाखत झाली. मी ज्या मच्छीमारांच्या समस्या मांडल्या त्याला लोकांचे चांगले प्रतिसाद मिळाले.
  तर मी म्हणेल आपण एकत्र येऊन संघर्ष करूया.
  माझा मोबाईल नं. 9594971467 रमण पवसे काफ परेड - कुलाबा मुंबई - ४०० 005

 • Mushtak good job. I am very thanking u. our community need strong support from media. Mushtak hats of u

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.