पुण्यात शेतकरी ते ग्राहक अशी थेट शेतमालाच्या विक्रीला सुरुवात झालीय. सध्या पुणे शहरातच वीसपेक्षा जास्त शेतमाल विक्री केंद्रं सुरू आहेत. याचप्रमाणं कृषी आणि पणन विभागाच्या सहकार्यानं राज्यात अनेक ठिकाणी शेतमाल विक्री केंद्रं सुरू केली जाणार आहेत. त्यातील ठाणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी प्राधान्यानं भाजीपाला केंद्रं चालू करण्यात येणार आहेत.
ग्राहकांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी पीक पध्दतीत आवश्यक बदल करावा आणि पिकांचं अधिक दर्जेदार उत्पादन घ्यावं यासाठी विभाग कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून ग्राहकांना थेट देण्यात येणाऱ्या शेतमालात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना आपला माल कुठंही विकण्याचा अधिकार आहे, असं आवाहन कृषी आणि पणन विभागाकडून करण्यात आलंय.
'शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री' या योजनेबाबत 'भारत4इंडिया'शी बोलताना महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले, “स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशात शेतकऱ्यांच्या मेहनतीनं, राजकर्त्यांच्या दूरदृष्टीनं आणि कृषी विद्यापीठांच्या संशोधनामुळं हरितक्रांती झाली. आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. पिकांची उत्पादकता वाढली. शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर आणि उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. जागतिकीकरणाची प्रक्रिया गतिमान होत असताना जागतिक बाजारपेठेचा विचार करून स्थानिक बाजारपेठेतही शेतमालाला चांगला दर मिळाला पाहिजे. आता शेतकऱ्यांसमोर उत्पादन खर्च कमी करण्याचं मोठं आवाहन आहे. वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्याची वाढणारी मागणी याचा ताळमेळ घालण्यासाठी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. ग्राहकांना योग्य किमतीत दर्जेदार माल मिळायला हवा, यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीस राज्य शासन प्रोत्साहन देणार आहे. यामुळं उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये समतोल राहून दोघांचंही हित जपलं जावं आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधला जावा यासाठी कृषी आणि पणन विभागानं पुढाकार घेतला आहे.
“सध्या शेतकऱ्यांचा माल ग्राहकाला मिळण्यापर्यंत मध्यस्थांची मोठी साखळी आहे. ग्राहकांना शेतकऱ्याला मिळणाऱ्या दराच्या तुलनेत चार पट्टीनं जास्त पैसा मोजावा लागतो. या थेट योजनेमुळं शेतकऱ्यांच्या गटाला फायदा होतो. ग्राहकापर्यंत भाजीपाला पोहोचवण्याची व्यवस्था करण्यासाठी कृषी आणि पणन विभाग सहकार्य करतं. या योजनेला शेतकरी आणि ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळं शेतकरी आणि ग्राहकांचे डायरेक्ट हितसंबंध प्रस्थापित होतात. शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो, तर ग्राहकांना योग्य दरात गुणवत्तापूर्ण शेतमाल मिळतो,” असं कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितलं.
असा होणार फायदा...
- उत्पादकांच्या शेतमालाला योग्य मोबदला
- मध्यस्थ-दलालांची साखळी तुटणार
- ग्राहकांना वाजवी दरात चांगल्या क्वालिटीचा माल मिळणार
- शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून वाहतूक आणि विक्रीव्यवस्था
- मार्केटिंगच्या खर्चात बचत
- भाजीपाल्याची नासाडी टळणार
- कृषी आणि पणन विभागाचं सहकार्य
शेतमाल ग्राहकांना थेट विकण्यासाठी संपर्क-
अ) आपल्या गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा आपला तालुका कृषी अधिकारी. वेबसाईट- www.mahaagri.gov.in, किसान कॉल सेंटर - टोल फ्री नं. - 18001801551
ब) आपल्या शहरात शेतमाल केंद्रं सुरू करण्यासाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
Comments
- No comments found