टॉप न्यूज

नितीन गडकरींचा राजीनामा

रणधीर कांबळे, मुंबई
भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अखेर अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडत आपला राजीनामा दिला. नितीन गडकरी पुन्हा अध्यक्ष होतील अशी अटकळ बांधली जात होती. त्याच वेळी आपल्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीतून क्लिनचीट मिळेपर्यंत आपण हे पद स्विकारणार नाही, असं सांगत त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.

nitin-gadkari bharat4india.comखरं तर नितीन गडकरी यांच्या नावाला लालकृष्ण अडवाणी यांचा असणारा विरोध मावळला आहे, अशा बातम्या आल्या होत्या. त्यानंतर मुंबईत रामभाऊ म्हाळगीच्या त्रिदशकपूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं अडवाणी-गडकरी एका व्यासपीठावर होते. त्यामुळं आता गडकरींच्या अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे, असं वातावरण होतं. पण हा कार्यक्रम संपल्यानंतर तासाभराच्या अंतरातच गडकरींनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

खरं तर म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अखेर आपण राजीनामा देतो, मात्र राजनाथसिंह यांना अध्यक्ष करावं, अशी सूचना गडकरींनी केली. तर यशवंत सिन्हा यांचं नाव अडवाणी यांनी सुचवलं होतं. त्या बैठकीच्या वेळी संघाचे ज्येष्ठ नेते भैय्या जोशीही उपस्थित असल्याचं बोललं जातंय. २००९ डिसेंबर मध्ये अतिशय नाट्यमयरित्या गडकरी अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. मात्र संघाच्या समर्थनाच्या जोरावर गडकरी या पदापर्यंत पोहोचले होते.

महाराष्ट्रात मुंडे-महाजन यांची पक्षावर पकड असतानाच्या काळात गडकरी जरी पक्षात बाजूला पडले असले, तरी त्यांनी आपल्या कामाचा झपाटा कायम ठेवला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी मुंबईतले उड्डाणपूल, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे अशी लक्षात राहतील, अशी कामं केली. महाजनांनंतर गडकरींचं पक्षातील स्थान अधिक बळकट झालं आणि ते पक्षातल्या सर्वोच्च पदावर जाऊन बसले. गडकरी अध्यक्ष झाल्यानंतर केंद्रातल्या काँग्रेस आघा़डीच्या सरकारचे २जी, कोळसा, असे मोठे घोटाळे निघाले. त्याचा फायदा पक्ष अधिक आक्रमक करण्यासाठी गडकरी यांनी केला. गडकरी यांच्या कामाचा झपाटा जरी वाढला असला, तरी त्यांच्या नावाला सुरुवातीलाच विरोध करणारे अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि व्यंकय्या नायडू सारखे नेते होते. त्यामुळंच गडकरींच्या मागे पक्षातला एक मोठा गट नव्हता, हेही स्पष्ट होते. तरीही गडकरी यांनी आपलं काम नेटानं चालू ठेवलं होतं. मात्र केजरीवाल यांच्या आरोपापासून गडकरी यांची नाव डगमगू लागली, त्यात मग पक्षातूनच त्याला हवा दिली गेल्याची चर्चाही सुरू झाली. शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरच्या माणसावर भ्रष्टाचारासारखे आरोप असता कामा नयेत, असं सांगितल्यानं गडकरींची वाट खडतर असल्याचं स्पष्ट झालं होतं. केजरीवाल यांनी गडकरींनी आत्महत्याग्रस्त विदर्भातलं शेतकऱ्यांचं पाणी आणि जमीन पळवल्याचा आरोप करत रान उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राम जेठमलानी यांनीही गडकरी यांच्यासारखा माणूस पक्षाध्यक्ष असण्याला जाहीरपणे आक्षेप
घेतला. त्यामुळंच मग भाजपातली एक फळी गडकरींच्या विरोधाचं काम करत असल्याचं स्पष्ट झालं. अडवाणी, जेठमलानीसारखे नेते बरोबर नसतानाही गडकरींसाठी पक्षाच्या घटनेत बदल करुन तेच अध्यक्ष राहतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळं गडकरींना हटवलं जाणार नाही, असं वातावरण निर्माण करण्यात गडकरींचे समर्थक यशस्वी झाले होते. मात्र पक्षातंर्गत विरोधाची धारच एवढी वाढली असावी की, गडकरी यांना जाणं भाग पडलं.

फेब्रुवारी २०१० मध्ये भाजपच्या इंदोरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गडकरी यांनी गाणं म्हटलं होतं, 'जिंदगी कैसी है ये पहेली हाय, कभी ये हसाये कभी ये रुलाये... ' या गाण्याचा खरा अनुभव गडकरी यांनी घेतला असेल.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.