'भारत4इंडिया'नं दुष्काळी भागातल्या शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या या ड्रॅगन फ्रूट पिकाची यशोगाथा प्रसिद्ध केली होती. सोलापूर जिल्ह्यातील काळमवाडी (ता.माळशिरस) येथील आनंदराव जाधव यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूट लावलंय. यशोगाथा 'भारत4इंडिया'वर प्रसिद्ध झाली होती. त्यामुळं या पिकाबाबत शेतकऱ्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली होती. ड्रॅगन पीक (dragon) डाळिंब या पिकाला पर्यायी पीक ठरू शकतं, अशी भूमिका 'भारत4इंडिया'नं मांडली होती. त्याला कृषी खात्यानं प्रतिसाद दिलाय. त्याबाबत राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले, ``महाराष्ट्र राज्याचे कृषी हवामानावर आधारित 9 विभाग पडतात. राज्यात 50 टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, धुळे, जळगाव या जिल्ह्यांत पर्जन्यमान कमी आहे. तिथं 750 मिमीपेक्षा कमी पाऊस पडतो. या कमी पाण्याच्या प्रदेशात ड्रॅगन फ्रूटचं पीक चांगलं येऊ शकतं. तसंच याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आत्मा योजनेमधून मदत केली जाईल. कृषी विद्यापीठं आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने ड्रगन फ्रूट या पिकावर अनेक कृषी हवामान विभागात संशोधन केलं जाईल.``
आनंदराव जाधव या प्रयोगशील शेतकऱ्याचं सोलापूरचे कलेक्टर गोकुळ मवारे यांनीही कौतुक केलंय. ते जाधव यांची ड्रॅगन फ्रूटची शेती पाहण्यासाठी जाणार आहेत. आत्मा योजनेंतर्गत ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी शेतकऱ्यांना विशेष मदत दिली जाणार आहे. सोलापूरसारख्या दुष्काळी आणि कोरडवाहू भागातील नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहन देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.
Comments
- No comments found