बाळासाहेबांनंतर पक्षाचं स्वरूप कसं राहील, याबाबतच्या चर्चा यापूर्वी अनेकदा झाल्या आहेत. आता उध्दवजींच्या नेतृत्वाचा कस लागेल हेही तितकंच खरं आहे. पण तो कस काही अंशी तपासला गेलाय. त्यांचं नेतृत्वही सिध्द झालंय. पण आता त्यांच्यासमोर पक्ष वाढवण्याचं आणि पक्षाकडं नव्या पिढीला आकर्षित करण्याचं काम आहे. त्यासाठी त्यांनी युवा सेनेचं नेतृत्व जाहीर केलंय. त्या नेतृत्वावरही मोठी जबाबदारी आहे.
शिवसेनशी नव्या पिढीला जोडण्य़ाचं काम युवा सेना करीलच. त्यांना किती यश मिळेल हे लवकरच दिसू लागेल. पण खरं आव्हान आहे ते सेनेतल्या अष्टप्रधान मंडळाचं. आज जे काही शिवसेनेचे सीनियर नेते आहेत त्यांचा मेळ उद्धव यांना घालावा लागणार आहे. हा मेळ घालण्यात गेल्या काही वर्षांत त्यांचं दुर्लक्ष झालंय की त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडं दुर्लक्ष केलंय, याचाही विचार करण्याची गरज आहे. ते जाणीवपूर्वक केलं म्हणावं तर त्याचा पक्ष वाढण्यासाठी काही फायदा झाल्याचं दिसलं नाही.
नारायण राणे सेनेतून बाहेर गेल्यानंतर काही सीनियर नेत्यांना कमी महत्त्व दिलं जात असल्याचं बोललं जात होतं. त्या नेत्यांनीही पक्षात शांत राहणं पसंत केलंय. अनेक नेत्यांना राज्यभर पक्षबांधणीसाठी फिरवल्याचं दिसलं नाही. त्यामुळंही सेनाप्रमुखांमुळे जो मोठा नेता वर्ग आणि पक्षातली मधली फळी टिकून होती ती इथून पुढच्या काळात अधिक सक्रिय़ करण्याची जबाबदारी उध्दवजींवर आहे.
शिवसेनाप्रमुखांचा दबदबा भाजपवर नेहमीच राहिलेला होता. पण आता भाजप विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शिवसेनेच्या पुढं गेलाय. तो प्रयत्न आता अधिकच होईल. निवडणुकीच्या राजकारणात अधिक जागा हव्यात यासाठीही तो पक्ष आक्रमक राहील. त्यामुळं शिवसेनेला सारीपटावरची रणनीती नव्यानं आखावी लागणार आहे. मनसेसारखा पक्ष वाढताना शिवसेनेची शक्ती कमी करील, असं विश्लेषण केलं जात होतं. तेही पुढं होतच राहील. पण आता आणखी एक चिंता शिवसेनेपुढं असेल ती म्हणजे एनसीपीची. अजित पवार ज्या पध्दतीनं शिवसेनेचे काही जिल्ह्यांमधले नेते आपल्याकडं खेचण्याच्या प्रयत्नात दिसताहेत, यावरून एनसीपीकडं जाणारा ओघ रोखण्यासाठी शिवसेनेला काही ठोस पावलं उचलावी लागणार आहे.
राज्य पिंजून काढण्यासाठी उध्दवजींनी आत्तापर्यंत अनेक कार्यक्रम दिले. पण आता त्यांना राज्यासमोरच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी कार्यक्रम देऊन लोकांना जोडावं लागणार आहे. प्रामुख्यानं ग्रामीण भागातला तरुण शिवसेनेकडं आकर्षित करण्यासाठी त्यांना खास कार्यक्रम द्यावा लागेल. शिवसेनाप्रमुखांना मानणारा वर्ग जरी राज्यभर होता तरी या पक्षाचा खरा वचक मुंबई-ठाणे-नाशिक आणि पुणे अशा शहरांमध्ये अधिक होता. पक्ष आता ग्रामीण भागात विस्तारलाय. आपला पक्ष सत्तेच्या दिशेनं जा जाऊ शकतो, हा विश्वास राज्यभर द्यायला हवा. तरच २०१४ची खरी परीक्षा पास होण्याच्या दिशेला उध्दव ठाकरे यांचं नेतृत्व जाईल, असं म्हणता येईल. आणि ही परीक्षा जवळच आलीये. त्यानंतरही अनेक आव्हानं असतीलच. ती पेलण्यासाठी त्यांना शुभेच्छा...!
Comments
- No comments found