टॉप न्यूज

पाण्यासाठी सतर्क राहा

मुश्ताक खान, रत्नागिरी
महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न सध्या पेटलाय. आग विझवणारं पाणी पेटलं तर लोकांनी मनं कशानं विझवायची, असा प्रश्न जलतज्ज्ञ प्रा. दिलीप महाले यांनी उपस्थित केलाय. राज्यात दृष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली तर तात्पुरती उपाय योजना केली जाते, पण नंतर दृष्काळाचा प्रश्न मागे पडतो. असं न करता कायम पाण्याच्या बाबतीत जागरुक राहणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 

jagar panyachaa 1दृष्काळ होऊच नये, असं जर वाटत असेल तर पाणलोट क्षेत्राचा विकास करणं गरजेचं बनलंय. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पडलेल्या पावसावरही सगळ्यांची तहान भागवली जाऊ शकते. पावसाच पाणी अडवलं, जिरवलं आणि मुरवून माथा ते पायथा या सिद्धांतानुसार कार्यप्रणाली आखली पाहिजे. म्हणजेच माथ्यावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे तर पायथ्यावर नाला बांध, सिमेंट नाला बांध, सलग समतोल थर, बेंच टेरीसींग केलं पाहिजे. त्यानं पाणी चांगल्या प्रकारे साठून जिरण्यास मदत होईल. ही सगळी कामं पाणलोटाच्या माध्यमातून करता येतील. त्यासाठी विविध सरकारी योजना उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून मिळत असलेल्या अनुदानामध्ये पाणलोट विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. पण दुर्दैवाने काही पाणलोटांमध्ये थोडसं काम केलं जातं आणि नंतर तो विषय अर्धवट सोडलं जातं, असं न करताना त्याचं काम पूर्णत्वाकडे नेली पाहिजे, असंही महालेंनी सांगितलं.
दृष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचा आणि त्याच्या वापराचा प्राधान्यक्रम ठरवणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. 1972 साली पडलेल्या दुष्काळात अन्नधान्याची कमतरता होती पण जनावरांसाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होतं. यंदा अन्नधान्य भरपूर आहे पण पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. त्यामुळं प्राधान्यक्रम निश्चित केला पाहिजे. प्राधान्यक्रम म्हणजे आधी माणसांना पिण्यासाठी पाणी, मग जनावरांसाठी आणि त्यानंतर शिल्लक राहिलेल्या पाण्याचा वापर ओला चारा निर्माण करण्यासाठी केला पाहिजे. त्यानंतरही जर पाणी उरलं तर फळ बागांसारख्या दिर्घकालीन झाडांसाठी वापर झाला पाहिजे. त्याबरोबर जर एखाद्या जिल्ह्यात पाणी उपलब्धच नसेल तर इतर ठिकाणच्या धरणांमधून, प्रकल्पांमधून त्यांना पाणी दिलं पाहिजे, अन्यथा अशा ठिकाणी पाणी प्रश्न पेटेल, तेच आपण सध्या राज्या-राज्यात अऩुभवतो आहोत, हेही त्यांनी आवर्जून सांगितलं.
जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी पाण्यात येणारी पीकं घेण्यावर भर देणं काळाजी गरज आहे. सध्या अभासिय पाण्याची संकल्पना पुढे येत आहे. त्यामध्ये झाडाच्या किंवा पशू वाढीच्या प्रत्येक टप्प्यात किती पाणी लागलं य़ाचा अभ्यास केला जातो. एक मजेशिर उदाहरण म्हणजे, कोणालाही विचारलं की एक कप कॉफीसाठी किती पाणी लागतं तर उत्तर येतं 150 ते 200 मिली लीटर. पण प्रत्यक्षात लागवडीपासून कॉफी आपल्या टेबलवर सर्व्ह होईपर्यंत 1 कप कॉफीला 140 लिटर पाणी लागतं. त्याचबरोबर 1 किलो मटण तयार होण्यासाठी 14 हजार लिटर पाणी लागतं. त्यामुळं आहार ठरवताना या गोष्टींची विचार करणंही आवश्यक आहे, असंही महाले यांनी सांगितलं.
पाण्य़ाचं दुर्भिक्ष जाणवू लागल्यानंतरच आपण जल साक्षरता या विषयाबद्दल चर्चा करतो. खरंतर हा विषय आपल्या जीवनाचाच एक भाग आहे. दात घासण्यासाठी आणि दाढी करताना नळ चालू न ठेवता मगने पाणी वापरलं पाहिजे. आंघोळीसाठी टबचा वापर करु नये तर बादलीचा वापर करावा. वॉशिंग मशिनमध्ये कपडे न धुता त्यासाठीही बादलीचा वापर करणे आवश्यक आहे.
दात घासण्यासाठी -
मगने अर्धा लीटर पण नळ चालू ठेवलं तर 4 लीटर
दाढी करण्यासाठी -
मगने दोन लीटर आणि नळ सुरु राहिला तर 8 लीटर
आंघोळीसाठी
बादलीनं 20 लीटर आणि टब बाथनं 80 लीटर
कपडे धुण्यासाठी -
बादलीनं 80 लीटर आणि वॉशिंग मशीनला 200 लीटर पाणी लागतं...
या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब केला तर प्रत्येक जण वैयक्तिक पातळीवर पाण्याची मोठी बचत होते.
पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनाही साक्षर करणं तितकंच गरजेचं आहे. शेतकरी म्हणतो जमिनीला पाणी द्या पण खरं तर पिकाला पाणी देणं आवश्यक आहे. पिकाला पाण्याची गरज किती हे आता शास्त्रीय पद्धतीनं काढता येतं. पिकांना गरजेनुसार पाणी दिलं तर त्यांची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगलं मिळतं. म्हणजेच चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं.
औद्योगिक पातळीवर लागणाऱ्या पाण्याचं प्रमाणही खूप आहे. त्यामधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया त्याचा वापर बागेसाठी करता येऊ शकतो. त्याने पर्यावरणाचीही हानी टाळता येईल. त्यामुळं प्रत्येक पातळीवर पाण्याबाबत साक्षर होण अत्यंत महत्त्वाचं आहे. या सगळ्या उपाय योजनांच्या माध्यमातून आपण पाण्याच्या प्रश्नावर नक्कीच मात करु शकतो, असा आशावादही प्रा. महाले यांनी व्यक्त केलाय. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.