टॉप न्यूज

खंडोबा पिवळा झाला!

शशिकांत कोरे, पाली, सातारा
माणसांची लग्नं आपण नेहमीच पाहतो, पण देवाचंबी खरंखुरं लगीन लागलं बरं का...! पौष मृग नक्षत्रावर लगीन झालं, बारा गावची वऱ्हाडी मंडळी, हत्ती, घोडं इत्यादी लव्याजम्यासह लग्नाला हजर व्हती. 12 परगण्यातून सात लाखांहून अधिक वऱ्हाडी आलं हुतं. पालीच्या खंडोबा यात्रेचा तो मुख्य दिवस होता. भंडाऱ्याची उधळण करत यळकोट घालत खंडोबा-म्हाळसाबाईच्या लग्न पार पडलं. इथून पुढं 15 दिवस ही यात्रा सुरूच राहणार आहे. तुम्हीही आवर्जून या बरं का पाकळणी-चोकाळणीला. भंडारा उधळायला. चला, येताय नव्हं पालीच्या खंडोबाच्या यात्रंला...
 

pali yatra 12खंडोबाच्या यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविकांची गर्दी असते. या गर्दीमुळं बरेच भाविक येऊ शकत नाहीत. मुख्य यात्रेला या चुकलेल्या भाविकांसाठी येता रविवार हा पाकळणीचा आणि त्यापुढील रविवार हा चोकळणीचा असतो. या दिवशी ही भाविक मंडळी देवदर्शन करून भंडारा उधळतात. यात्रेच्या शेवटच्या दिवशी जेजुरीच्या खंडोबाचा लंगर सुटतो. म्हणजे पुण्याच्या जेजुरीच्या खंडोबाच्या यात्रेची सुरुवात या दिवसापासून सुरू होते.  

महिमा देवाचा
तारळी नदीच्या तीरावर प्राचीन मल्हारी-म्हाळसादेवीचं मंदिर आहे. असं म्हणतात, पूर्वी इथं धनगर आणि गवळी लोकांच्या वस्तीत पालाई गवळण राहत होती. ही पालाई देवाच्या दर्शनास जाऊ शकत नव्हती, अखेर खंडेरायानं दृष्टांत दिला. 'ज्या ठिकाणी कपिला गाय दुधाची धार सोडेल त्या ठिकाणी स्वयंभू प्रकट होईन,' ते ठिकाण म्हणजे खंडोबाचं मंदिर. पालाई भक्तिणीच्या नावानंच 'पाल' हे  नाव प्रचलित झालंय.

देवाचे मानकरी
पूर्वी यात्रा काळात देवाचा प्रमुख मानकरी कोण, यावरून वाद झाला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी उकळत्या तेलाच्या कढईत सोन्याचं कडं टाकलं होतं, तेव्हा काळभोर पाटील यांनी ते कडं काढलं आणि हा मान घेतला. सध्या या घराण्यातील देवराज पाटील हे याचे प्रमुख मानकरी आहेत. करवडी, पांढरी आदी गावची वऱ्हाडी मंडळी यावेळी हजर असतात. यात्रेसाठी कोल्हापूर येथील राजाराम महाराजांकडून घोडा येतो, तर वर्णे येथून मानाची पालखी येते. यावेळी पिढ्यान् पिढ्या गोंधळी काम करणारे बलभीमही हजर असतात.

खंडोबा लग्नाला निघाला हत्तीवरून
देवस्थानचा हत्ती आजारी असल्यामुळं यावेळी सांगली देवस्थानचा हत्ती मागवला होता. दुपारी मानाचे मानकरी सासन काठ्या नाचवत आणि वऱ्हाडी मंडळी बैलगाडीतून मंदिराकडं आली. त्यावेळी प्रमुख मानकरी असलेल देवराज पाटील परंपरेनुसार हत्तीवरून आले. मंदिरात आरती झाली. त्यानंतर प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या पोटाला देव बांधला गेला. सर्वप्रथम पुजारी आरती, लग्नाचं सामान घेऊन पुढे आले. त्यांच्यासमोर ढोल-ताशा ही वाजत्री वाजत होती, तसंच पारंपरिक पद्धतीनं हलगी, घंटी, डमरू, पिपाणी आदी वाद्यंही वाजत होती.pali yatra 1

म्हाळसाकांताचा मोठा मुखवटा आणला गेला. सर्व मानकऱ्यांना खांद्यावर बसवून पुन्हा सन्मानपूर्वक गाड्यात बसवलं गेलं आणि पुन्हा सर्व जण पेंबर या तारळी नदीच्या वाळवंटाच्या दिशेनं जाण्यास निघाले, यावेळी मंदिराच्या बाहेर लाखो भाविक देवाची वाट पाहत होते. मानाचा घोडा बाहेर निघताच भंडारा उधळण्यास सुरुवात झाली. अनेक जण देवाला नवस बोलतात, त्या व्यक्तीच्या वजनाएवढा भंडारा खरेदी केला जातो. अनेक भाविकांच्या डोक्यावर भंडाऱ्याची पोती होती, देवाच्या लग्नाला येणारे भाविक दुकानदाराकडून पावशेर भंडारा विकत घेतात. त्यामध्ये खोबऱ्याचे बारीक तुकडे आणि हळदीचा भंडारा असतो. मग मायदाळ भंडारा उधळला जातो. जिकडे तिकडे भंडाराच भंडारा दिसतो. 'यळकोट यळकोट जय मल्हार'चा जयघोष सुरूच असतो. मंदिराकडं येणारे तिन्ही रस्ते गर्दीनं फुलून गेले होते. प्रत्येक भाविक देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. नंतर तब्बल चार तास मिरवणूक सुरू होती. विवाह मंडपात लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री खंडोबा आणि म्हाळसाबाई यांचा विवाह झाला. या प्रसंगी 'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या जयघोषात वातावरण भक्तिमय बनून गेलं होतं. उपस्थित सर्व जण भंडारा, खोबरं उधळत देवाच्या लग्नात सहभागी झाले. सायंकाऴी लग्न होतं. रुकवत आदी कार्यक्रम देवाच्या मानकऱ्यांनी पार पाडले. सकाळी देवाला नेण्यासाठी बारा बैलांची गाडी होती.

सात लाख भाविकांच्या सोबतीला सहाशे पोलीस
या यात्रेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आले होते. याशिवाय शेजारच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतूनही भाविक येतात. सुमारे पाच ते सात लाख भाविकांवर लक्ष ठेवायला आणि परिसरातील सुव्यवस्था राखण्यासाठी 25 पोलीस अधिकारी, 300 पोलीस कर्मचारी आणि 350 होमगार्ड यांची नेमणूक केली होती. सोबत 12 सीसी टीव्ही कॅमेरे, पाच मनोरे, मोबाईल जॅमर आदी यंत्रणा कार्यरत होत्या. यात्रेकरूंची वाहनं आणि इतर वाहनं मूळ ठिकाणापासून पाच किलोमीटर दूरवर थांबवण्यात आली आहेत. यात्रेनिमित्त दुकानांनाही स्वतंत्र जागा देण्यात आली आहे.

भंडाऱ्याची उलाढाल 20 लाखांची
श्री खंडोबा देवास भंडाऱ्याचा मान असतो. पूर्वी शुध्द भंडारा वापरला जात होता. आता लोकसंख्या वाढलीय, महागाई वाढलीय, त्यामुळं व्यापारीही यात्रेसाठी वेगळा भंडारा मागवतात. सुमारे पाच टन खोबरं आणि दहा टन भंडारा यात्रेत वापरला जातो. साधा भंडारा 100 ते 200 रुपये किलो दरानं गुणवत्तेनुसार विकला जातो. केवळ भंडाऱ्याची उलाढाल सुमारे 20 लाख रुपयांपर्पंत झाली.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.