टॉप न्यूज

आई काळूबाई, सांभाळ गं बाई!

शशिकांत कोरे, सातारा
काळूबाईच्या यात्रेसाठी वाईजवळचा मांढरदेव गड भक्तांनी फुलून गेलाय. आजची (रविवार) शाकंभरी पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असून तिथून पुढं 15 दिवस यात्रा सुरू राहणार आहे. 291 जणांचा जीव घेणारी दुर्घटना घडल्यानंतर आता गडावर बऱ्यापैकी विकासकामं झालीत. त्यामुळं सात वर्षांपूर्वीचा मांढरदेव आणि आताचा यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यामुळं भाविकांचीही चांगली सोय होत असली तरी दुर्घटनेचं काळं सावट काही त्यांच्या मनातून हटता हटत नाहीत.
 

mandhar225 जानेवारीचा काळा दिवस
25 जानेवारी 2005 हा दिवस मांढरदेव गडासाठी काळाकुट्ट दिवस ठरला. यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत आणि लागलेल्या आगीत 291 जणांचा बळी गेला आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला.

नेमकं काय झालंय, याचा पहिल्यांदा कोणाला पत्ताच लागला नाही. चांदण्या रात्री गडावर फक्त आग धुमसत होती. त्याची तीव्रता जसजशी वाढत गेली तसतसं घटनेचं गांभीर्य वाढत गेलं. तरीही प्रशासनानं मोठ्या कौशल्यानं परिस्थिती हाताळल्यानं तातडीनं मदत मिळून अनेकांचे प्राण वाचले.
त्यानंतर राज्य सरकारनं घटनेचं गांभीर्य ओळखून राजन कोचर यांचा न्यायालयीन चौकशी आयोग नेमला. त्या आयोगाच्या शिफारशीनुसार करोडो रुपये खर्चून गडावर सुधारणा झाल्या. त्याचा लाभ आता भाविकांना होतोय. महत्त्वाचं म्हणजे, या दुर्घटनेनंतर लाखांची यात्रा भरणाऱ्या तीर्थक्षेत्रांमध्येही सुधारणा झाल्या. तसंच सुरक्षेची नियमावलीही लागू झाल्यानं पूर्वीपेक्षा या यात्रा जास्त सुरक्षित झाल्यात.

सात वर्षांनंतरचा मांढरदेव
गडावरील यात्रेला कमालीची शिस्त आलीय. तसंच पशुहत्येवर बंदी आल्यानं या गोष्टी साध्य झाल्यात. याशिवाय रस्ते, दर्शनबारी यांचीही कामं झाल्यानं गर्दीला शिस्त आलीय. विक्रेत्यांची दुकानं रांगेत थाटलीत. मांढरदेव गडावर जाण्याचे आणि परतीचे असे दोन प्रशस्त पायऱ्यांचे रस्ते तयार झालेत. पूर्वी अरुंद रस्ते होते. छबीना मार्ग दर्शन रांगा स्वतंत्र झाल्या आहेत. त्यामुळं भाविकांना श्री मांढरदेवीचं शिस्तीत दर्शन घेता येतं. यापूर्वी कधीही न दिसलेली शिस्तही यामुळं पाहायला मिळतेय. देवस्थान ट्रस्टनं आता सुमारे दीड कोटी खर्चाचा धर्मशाळा उभारण्याचा प्रकल्प हाती घेतलाय. शिवाय छोटी स्वच्छतागृहं बाधण्याचं कामही सुरू आहे. यामुळं पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या कामालाही गती आलीय. अनिष्ट प्रथांना बंदी आल्यानं त्याला आळा बसलाय, पण तरीही तुरळक प्रमाणात काही गोष्टी घडत असतात. त्या पूर्णपणं बंद करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

वीजपुरवठा नाही
ट्रस्ट आणि शासन वीजपुरवठा करीत नसल्यानं आणि जागेवरूनचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्यानं त्याचा त्रास विक्रेत्यांना आणि काही प्रमाणात भाविकांनाही होतोय. यात्रा काळात पाणी योजना सुरू असते. ट्रस्टनं पाण्याच्या टाक्याही उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळं भाविकांना पुरेसं पाणी मिळतं, पण विक्रेत्यांना विकतचंच पाणी घ्यावं लागतं, अशी खंत सोमनाथ गुरव यांनी बोलून दाखवली. भविष्यात मंदिराच्या पश्चिम बाजूस तलाव बांधण्याचा प्रस्ताव असून तो मार्गी लागल्यास पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

यात्रेचं अर्थकारण कोलमडलं
mandhar8प्रशासनाच्या निर्बंधामुळं मांढरदेव गडावर काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ कमी झाल्यानं अर्थकारण बिघडल्याची तक्रार व्यापारी वर्गातून होतेय. दुर्घटना घडण्यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सुमारे पाच ते सहा लाख भाविक मुख्य यात्रेदिवशी गडावर हजेरी लावत असत. हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, देवीच्या प्रसादांचे, नारळांचे, ओटीच्या साहित्यांचे, ऑडिओ-व्हिडिओ सीडीची दुकानं, तसंच फिरती सिनेमागृहं, खेळण्यांची दुकानं याशिवाय लहान-मोठी दुकानं गडावर थाटली जात होती. यात्रा कालावधीत भाविकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदीचे व्यवहार चालत असल्यानं यात्रा काळात करोडो रुपयांची उलाढाल होत होती. मात्र प्रशासनाच्या कडक निर्बंधांमुळे आणि भाविकांचा ओघ कमी झाल्यामुळं आर्थिक व्यवहार कमी झाल्याची व्यापारी वर्गाची तक्रार आहे.

पुजाऱ्यांचा वाद, भाविकांच्या डोक्याला ताप
मांढरदेव देवस्थान ट्रस्ट विरुध्द मांगीरबाबा धावजी पाटील, लक्ष्मी मंदिर हा पुजाऱ्यांचा वाद सुरू आहे. यात्रा काळात छोटी मंदिरं बंद केली जातात. त्याविरोधात न्यायालयामध्ये केस सुरू आहे. त्याचा त्रास भाविकांना सोसावा लागतोय, याकडंही भाविक लक्ष वेधतायत. तरीही पूर्वीच्या मानानं लक्षवेधी सुविधा झाल्याचं भाविक मान्य करतात. त्यामुळंच काळूबाईच्या नावाचा गजर करताना भाविकांमध्ये उत्साह असून मांढरदेव गड त्यासाठी सज्ज झालाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांमुळं आता इथून पुढचे 15 दिवस गड फुलून जाणारेय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.