टॉप न्यूज

जनतेचा विश्वास मिळवा

ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली
वाढत्या भ्रष्टाचारानं आपण नैतिकता गमावलीय का? कायदेमंडळ तरुणाईचं प्रतिनिधित्व करतंय का? त्यांच्या नाराजीची दखल घेतय का? असे अनेक प्रश्न आज 64व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सत्ताधारी आणि राजकारण्यांच्या समोर उपस्थित केले.

pranab-mukherjee 1 2जनतेचा विश्वास परत मिळवा, तरुणांमध्ये खदखदत असलेली नाराजी आणि उर्जा विधायक मार्गाकडं वळवा, शासनप्रणाली अधिक गतिमान करा, असं आवाहनही त्यांनी केलंय. राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात राष्ट्रपती मुखर्जी यांनी दिल्ली बलात्काराच्या घटनेच्या अनुषंगानं टिपण्णी केली. देशाच्या राजधानीतील महिलांच्या हत्येनं सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याकडं त्यांनी लक्ष वेधलं.

समाजमनावर आघात

दिल्ली बलात्कार प्रकरणामुळं देशातल्या नागरिकांचे हृदय आणि मेंदू सुन्न झाला. आपण एक बहुमूल्य जीवन आणि एक स्वप्न हरवलं. या घटनेनं आजचा तरुण संतप्त झालाय. म्हणून आपण तरुणाईला दोषी धरायचं का? असा सवालही राष्ट्रपतींनी उपस्थित केला.
देशात अनेक कायदे आहेत. मात्र महिलांची सुरक्षितता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे जेव्हा एका महिलेला मारहाण होते, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण आपल्या देशाच्या आत्म्यावर आघात करतो.

नैतिक मुल्ये जपण्याची गरज

या देशाला आपली नैतिक मूल्ये पुनर्प्रस्थापित करण्य़ाची गरज आहे. मात्र त्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करायला हवा. आपण कुठे चूकतो आहे याचा विचार करण्यासाठी आत्मपरीक्षण करावं लागेल. चर्चा आणि वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून यावर आपल्याला उत्तर मिळेल. व्यवस्था ही अखेर जनतेच्या कल्याणासाठी आहे, यावर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. तर लोकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शासन प्रणाली अधिक गतिमान केली पाहिजे. दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात तरुणांच्या उसळलेल्या संतप्त प्रतिक्रियेवर बोलताना देशातील एक पिढी कूस बदलतेय, असं ते म्हणाले.

ग्रामीण आणि शहरी भागात पसरलेला भारताचा युवक हा खऱ्या अर्थानं या बदलाचं प्रतिनिधित्व करतोय. येणारं भविष्य त्याचंच आहे. मात्र ही तरुणाई गोंधळलेल्य़ा अवस्थेत आहे. योग्यतेनूसार मला स्थान मिळेल काय याबाबत तरुण साशंक आहे. सामर्थ्यशाली लोक आपली संधी हिरावून घेतील, असं त्याला वाटतं.

शासन प्रणाली गतीमान करा

सध्याचं कायदेमंडळ खऱ्या अर्थानं या तरुणाईचं प्रतिनीधीत्व करतंय का? की त्यामध्ये व्यापक बदलांची गरज आहे? अशा प्रश्नांची उत्तर शोधण्याची ही वेळ आहे. जनतेच्या मनातील संशयातील निराकारण करणं आता आवश्यक आहे.

भुकेल्या पोटानं तरुणाई स्वप्न बघू शकत नाही. तर त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. रोजगार मिळाल्यानंतर हे तरुण स्वत:ची आणि देशाची महत्वांकाक्षा नक्कीच पुर्ण करु शकतील असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

देशाच्या विकासाचं फळ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. केवळ काही लोकांचीच त्यावर मक्तेदारी नको, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. देशातील गोरगरीबांना दोन वेळचं पुरेसं जेवण मिळणं, दबलेल्या, पिचलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणणं हेच आपलं प्रमुख उद्दीष्ट असायला हवं याची जाणीवही त्यांनी यानिमित्तानं करुन दिली.

सरलेलं वर्ष हे आव्हानाचं वर्ष होतं. देशानं आर्थिक बदलाच्या दिशेनं वाटचाल केली. मात्र बाजार नियंत्रित अर्थव्यवस्थेतही देश टिकून राहिला पाहिजे, असं राष्ट्रपती म्हणाले.

शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा

जगातले अनेक देश श्रीमंत देश सामाजिक जबाबदारी टाळत आहेत. आपण या संस्कृतीपासून सावध आणि दूर राहिलं पाहिजे. सरकारी ध्येयधोरणाचा परिणाम हा खेडी, शेतीपासून कारखाना, शाळा आणि रुग्णालयांपर्यंत दिसलाच पाहिजे असंही राष्ट्रपतींनी बजावलं.
ज्यांना प्रत्यक्षात सरकारी योजनांचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी विकासाची आकडेवारी काय कामाची, या वास्तवाकडंही त्यांनी लक्ष वेधलं. नक्षलवादावर राजकीय उत्तर शोधण्याची गरजही त्यांनी यानिमित्तानं अधोरेखित केली. तसं न केल्यास हा प्रश्न गंभीर वळण घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

स्त्री पुरुष समानतेची गरज

भारतीय स्त्री-पुरुष समानतेची व्याखा प्रत्यक्षात आणण्याची गरज राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातच बोलून दाखवली. सरकार आणि समाजानंही यासाठी एकत्र काम केलं पाहिजे. सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, तळागाळातून वर येण्यासाठी शिक्षणाचं महत्वही त्यांनी विशद केलं. मात्र शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचलेली नाही हे वास्तवही त्यांनी बोलून दाखवलं. पण या सर्वांवर मात करुन भारत आर्थिक विकासाचा दर दुप्पट करू शकतो. देश 600 वर्षांत जेवढा बदलला नाही तेवढा गेल्या सहा दशकांत बदलेला आहे. त्यामुळं पुढच्या 10 वर्षांत हा देश गेल्या 60 वर्षांपेक्षाही जास्त बदलला असेल, याची मी खात्री देतो असा दृढविश्वास राष्ट्रपतींनी यानिमित्तानं व्यक्त केला.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.