टॉप न्यूज

नीलिमा मिश्रांना पद्मश्री

ब्युरो रिपोर्ट, जळगाव
बहादरपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा (दीदी) मिश्रा यांना त्यांच्या बचत गटामार्फत सुरू असलेल्या अर्थक्रांती आणि महिला स्वावलंबन कार्याची दाखल घेत केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारानं बोरी काठावरील बहादरपूरचं नाव पुन्हा उज्ज्वल झालंय. गावातल्या महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या दीदींना जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळं बहादरपुरात आनंद साजरा करण्यात आला. ग्रामस्थांनी आतषबाजी करून हा आनंद साजरा केला.

images 22"नीलिमाला आम्ही नीलम नावानं संबोधतो. नीलमनं तेराव्या वर्षीच अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. तिला माझा पाठिंबा अन्‌ विरोधही नव्हता. मात्र, आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याचं कळल्यावर डोळ्यातून पाणी आलं,” असं नीलिमादीदीचे वडील चंद्रशेखर गणेशप्रसाद मिश्रा म्हणाले.

नीलिमा मिश्रा यांनी 1995 ला 'एमए' केलं. पदवीनंतर त्यांनी समाजसेवा करण्याचा ध्यास घेतला. विज्ञान आश्रम पाबळ इथं डॉ. एस. एस. कलबाग यांना त्या भेटल्यावर त्यांनी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. 2000 मध्ये बहादरपूरला आल्यावर प्रथम बालवाडी सुरू केली. त्यात बालकांना कौशल्यविषयक शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी भागात काम केलं.

दीदींनी गावातच भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या संस्थेमार्फत बचत गटाची सुरुवात केली. बचत गटाच्या माध्यमातून गावातल्या महिला- पुरुषांना गृहोद्योगाचं प्रशिक्षण दिलं. त्यांना स्वावलंबी बनवण्याचं कार्य हाती घेतलं. बहादरपुरानंतर बचत गटाचं कार्य विस्तारलं आणि अकरा वर्षांत images 25तब्बल दीडशे बचत गटांचं जाळं सहा जिल्ह्यांत विणलं. आज सुमारे दोनशे गावांत बचत गटाचं कार्य सुरू आहे. याच बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी गोधडी (झावर) सातासमुद्रापार नेली. कुरडई, नागली पापड, उपवासाचे फराळ आदी विविध उद्योगांचं प्रशिक्षण देऊन त्यांनी महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यास सुरुवात केली.                                                                                                 

महिलांबरोबरच त्यांनी पुरुषांचेही बचत गट निर्माण केले. या बचत गटांना गृहोद्योगांसाठी सवलतीच्या दरात संस्थेच्या वतीनं कर्जपुरवठादेखील करून images 23दिला. त्यांच्या या कार्याची दखल दिल्ली येथील "लेटड्रीम' या संस्थेनं घेतली आणि याच संस्थेनं बहादरपूर, मालदा (ता. तळोदा) येथील ऊसतोड कामगारांना 76 लाख 60 हजार रुपयांची मदत उभी करून दिली. या कर्जातून तळोदा भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी सावकारांकडं गहाण ठेवलेल्या आपल्या शेतजमिनी सोडवून घेतल्या. या कर्जाचा लाभ 101 शेतकऱ्यांना मिळाला असून, आज ते नियमित कर्जफेड करीत आहेत. याशिवाय पर्यावरणासह विविध सामाजिक प्रश्‍न सोडवण्याच्या दृष्टीनंही नीलिमादीदींनी उल्लेखनीय काम केलंय.

सर्वसामान्य कुटुंबातील या कन्येच्या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली. पारोळा येथील साधना फाऊंडेशनतर्फे 2001 मध्ये त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्यार्थी सेनेतर्फे 2007 मध्ये "गरुड भरारी' पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं. राज्यपालांनी त्यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदीही नियुक्‍ती केली आहे. अशा कर्तृत्ववान सावित्रीच्या लेकीला आमचाही मनाचा मुजरा आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.