टॉप न्यूज

यात्रा नियंत्रणासाठी पाल पॅटर्न

शशिकांत कोरे, पाली, सातारा
खंडोबाच्या पालीच्या यात्रेचं झालेलं योग्य नियोजन आणि सुरक्षायंत्रणेनं केलेली प्रभावी कामगिरी यामुळं यात्रा नियंत्रणासाठी पाल पॅटर्नचा फंडा आता सर्वत्र पॉप्युलर होतोय. देशात होणाऱ्या यात्रांमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीत चेंगराचेंगरीमुळं माणसाच्या जीवावरही बेततं. मांढरदेव दुर्घटनेनंतर राज्य सरकारनं न्या. राजन कोचर आयोग नेमला होता. या आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारनं आपत्ती नियंत्रण समिती जिल्हास्तरावर नेमल्या. यात्रा कशा नियंत्रित कराव्यात, यासाठी हा पाल पॅटर्न उपयोगी ठरतोय.
 

pali yatra 10काठी, खोबरेवाटीवर बंदी
साताऱ्यातील पालीच्या खंडोबाच्या यात्रेत खोबऱ्याची वाटी आणि भंडारा उधळण्याची प्रथा होती. त्यामुळं अनेक जण जखमी होत होते, तसंच इथं येणाऱ्या भाविकांच्या हातात कुऱ्हाडी, काठ्या अशा वस्तू असायच्या. यात्रेतील सर्व जण अतिउत्साहात असताना थोडीशीसुद्धा धक्काबुक्की हाणामारीस कारणीभूत ठरण्याची शक्यता असते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारी मारामारी पोलीस यंत्रणेस डोकेदुखी ठरायची. अखेर प्रशासन आणि देवस्थान कमिटीची मीटिंग झाली. यात्रा काळात खोबऱ्याच्या वाटीऐवजी खोबऱ्याचे बारीक तुकडे वापरावेत, असा निर्णय झाला. लोकांच्या भावनेचा आदर राखला गेला. काठी, कुऱ्हाडीवर मात्र यात्रा काळात सक्तीनं बंदी घालण्यात आली. व्यापारी वर्गास सक्त सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही काही व्यापारी खोबऱ्याच्या वाट्या विकत होते. अशा व्यापाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सिव्हिल ड्रेसमधील पोलीस देखरेख ठेवत होते. यावेळी झालेल्या कारवाईत आठ पोती खोबऱ्याच्या वाट्या जप्त करण्यात आल्या.

चोख बंदोबस्त
या यात्रेला सुमारे पाच ते सात लाख भाविकांची गर्दी होती. या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोक्याच्या ठिकाणी 12 सीसी टीव्ही कॅमेरे गरजेनुसार बसवले होते. तसंच महत्त्वाच्या ठिकाणी मनोरे आणि मोठ्या इमारतींवर टेहळणीसाठी दुर्बिणीचा वापर केला होता. शिवाय वायरलेस यंत्रणाही वापरली होती, तसंच मंदिर परिसरात मोबाईल जामर बसवला होता. यात्रा परिसराची पाहणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केली. दोन उपअधीक्षक, 25 पोलीस सहायक निरीक्षक, 300 पोलीस कर्मचारी, 350 होमगार्ड एवढा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता.

देवस्थानचाही सहभाग
यात्रेस येणाऱ्या प्रत्येक भाविकास दर्शन मिळावं यासाठी खास दर्शन रांगांचं नियोजन केलं होतं. यात्रेच्या काळात जवळजवळ सुमारे एक किलोमीटर लांबीची दर्शन रांग होती. शिवाय येण्याजाण्याच्या स्वतंत्र रांगा होत्याच. यासाठी देवस्थान कमिटीनं आवश्यक सहकार्य केलं. यावेळी परिसरातील वाहतुकीचे पूलही मोठे करण्यात आले. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंदिर परिसरापासून पाच किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था केली होती. यात्रेत थाटण्यात येणाऱ्या दुकानांना जागा नेमून दिल्या होत्या. तसंच भाविकांना सूचना देण्यासाठी लाऊडस्पीकरची यंत्रणा राबवली होती.

यात्रेतील प्रथेबाबत मानकऱ्यांची जबाबदारी मोठी असते. भाविकांच्या जोशास पोलीस आवर घालत असताना क्षोभ होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता झाल्यास देवस्थान प्रमुखांशी चर्चा करून यावर योग्य उपाययोजना केली गेली. यात्रेची मिरवणूक अरुंद रस्त्यातून भरभर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात असताना ज्या बाजूनं रेटारेटी सुरू असते. तिथल्या भाविकांना टप्प्याटप्प्यानं सोडलं जात होतं. अशा प्रकारे तिन्ही रस्त्यांवरील गर्दी नियंत्रित केली गेली.

भाविकही समाधानी
यात्रेचा मुख्य उदेश असतो प्रथेनुसार देवाची पूजा करायला मिळणं आणि देवदर्शन करण्यास मदत होणं. लाखो भाविकांची गर्दी असली तरी योग्य नियोजनामुळं भाविकांना दर्शन घेणं सुलभ होतं. परिणामी लांबवरून येणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान असतं. सर्वांचा योग्य समन्वय असल्यामुळं यात्रा उत्साहात पार पडते.

अशा प्रकारे केलेल्या योग्य नियोजनामुळं हा पाल पॅटर्न सर्व यात्रांसाठीचा पॅटर्न बनतोय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.