टॉप न्यूज

विजयदुर्गात दुर्ग साहित्य संमेलन

मुश्ताक खान, सिंधुदुर्ग
विजयदुर्गमध्ये तिसऱ्या दुर्ग साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. देशभरातून हजारो दुर्गप्रेमी या संमेलनात सहभागी झाले आहेत. तीन दिवस असणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहेत. भारतीय लोकांना इतिहासात रुची नाही, ते इतिहासाकडून काहीच शिकत नाहीत ही देशातली सर्वात मोठी शोकांतिका आहे, अशी खंत तिसऱ्या दुर्ग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल मनोहर अवटी यांनी व्यक्त केली. आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
 

durga sahitya newप्रत्येकानं इतिहास जाणून आणि समजून घेतला पाहिजे. पण दुर्दैवानं आपले राजकारणीही इतिहासापासून चार हात लांबच आहेत. त्यामुळं पाकिस्तानच्या बाबतीत, परराष्ट्रीय धोरणात ते कायम फसले आहेत. कारण या देशाच्या राजकारण्यांना इथल्या इतिहासाची माहितीच नाही म्हणून ते इतिहासापासून शिकत नाहीत. पाकिस्तानशी झालेल्या युद्धात आपले अनेक सैनिक शहीद झाले. पण बेनझीर भुत्तो यांच्या आश्वासनानंतर इंदिरा गांधींसारख्या मुत्सद्दी पंतप्रधानानेही त्यांचे 92 हजार कैदी सोडले, जमीनही परत दिली. आपल्याला काय मिळालं तर शून्य, याचाच अर्थ असा की त्या धोरण आखण्यात कमी पडल्या. इतिहास कळत नाही तोपर्यंत दूरदृष्टी येणार नाही, असं अॅडमिरल मनोहर अवटी भरभरून बोलतात.

परदेशात प्रत्येक मुलाला त्यांच्या इतिहासाबद्दल सगळी माहिती असते, मग ते प्रथम महायुद्ध असेल किंवा व्दितीय महायुद्ध असेल. ऐतिहासिक वास्तूंबद्दल जाण असली पाहिजे. इथं असणारे दुर्ग जर विदेशात असते तर पर्यटनाच्या दृष्टीनं त्याचा कायापालट झाला असता. पण इथं या धरोहराकडं कुणाचंच लक्ष नाहीये. खरं तर लोकांनी स्वत:हून पुढं येऊन या ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण केलं पाहिजे, अशी भावनाही अवटींनी व्यक्त केली.

भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुभद्रा दुर्गप्रेमींना पाहता आली.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.