टॉप न्यूज

उमदं नेतृत्व हरपलं

रणधीर कांबळे, मुंबई
यवतमाळचे आमदार नीलेश पारवेकर यांच्या निधनामुळं उमदं नेतृत्व हरपलं असून काँग्रेसचं फार मोठं नुकसान झालंय. हाय प्रोफाईल असूनही तळागाळातील माणसांशी नाळ जोडलेला हा युवक नेता राहुल ब्रिगेडचा राज्यातील आघाडीचा आणि घाम गाळणारा कार्यकर्ता होता. उज्ज्वल भविष्यकाळ दृष्टिक्षेपात असताना त्यांना काळानं असं हिरावून नेणं म्हणूनच सर्वांच्याच जिव्हारी लागलंय.

Nileshराहुल ब्रिगेडचा शिलेदार
काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थानं राज्यात विभागा विभागात जे काही नवं नेतृत्व आहे, ज्यांच्याबद्दल आम कार्यकर्त्यांमध्ये काही अपेक्षा आहेत... अशा नव्या नेतृत्वाला आता कुठं पक्षात संधी निर्माण होऊ लागलीय. त्यातच राहुल ब्रिगेडचे पाच युवा चेहरे एकट्या महाराष्ट्रात आहेत. पण, पक्षाला काय अपशकुन झाला आणि नीलेश पारवेकर यांच्यावर काळानं झडप घातली. खरं तर राहुल गांधी यांनी पक्षाची नंबर दोनची पोझिशन अधिकृतपणानं स्वीकारल्यानंतर राहुल ब्रिगेडच्या सगळ्याच टीम सदस्यांवर पक्ष वाढवण्याच्या दिशेनं मोठी जबाबदारी येणार हे निश्चित होतं. अशा वेळी पारवेकरांचं जाणं पक्षाची हानी कधीही भरून न काढणारं आहे.

वजनदार काँग्रेस घराणं 
यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील पारवेकर हे काँग्रेसचं वजनदार घराणं. पुढच्या पिढीची जबाबदारी नीलेश पारवेकर यांच्यावर होती. गेल्या विधानसभेत दोन वेळा निवडून आलेल्या निवडणुकीत भाजपच्या मदन हिरावर यांना चीत करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. त्याच वेळी हे स्पष्ट झालं होतं की, महाराष्ट्राच्या राजकारणात नीलेश पारवेकर यांचं महत्वाचं स्थान राहणार. राहुल गांधी यांनी एनएसयुआयची अखिल भारतीय पातळीवरची जबाबदारीही त्यांच्यावर टाकली होती. समाजसेवा आणि पक्ष बळकटीकरणासाठी पायाला अक्षरश: भिंगरी लावून पारवेकर फिरत होते. तरुणांच्या मनात त्यांनी आशेचा किरण जागवत त्यांना अधिक मोठ्या संख्येनं पक्षाच्या कामाला जोडून घेतलं होतं. त्यांच्यातल्या मेहनती नेत्याची पारख राहुल गांधी यांनी केली होती. त्यामुळंच काही वर्षापूर्वी तरुणांनी क्रांती घडवत सत्तांतर केलेल्या आसामसारख्या राज्याचं प्रभारीपद त्यांच्याकडं सोपवण्यात आलं होतं. त्याशिवाय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही त्यांना स्थान मिळालं होतं. राहुल गांधी यांनी उच्चशिक्षित आणि हरहुन्नरी नेतृत्वाला नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यामुळंच नीलेश पारवेकर या अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या तरुणाची त्यांनी ब्रिगेडमध्ये निवड केली होती.

धडपडणारा नेता 
महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यासारख्या संस्थेवर संचालक म्हणून काम करताना भविष्यातल्या गरजा ओळखत त्यांनी अनेक निर्णय आग्रहपूर्वक घेतले होते. नेहमीच विकासकामाचा नाद लागलेला हा तरुण नेता यवतमाळ जिल्ह्यात नेहमीच विकास कामं खेचून आणण्यासाठी धडपडताना दिसत होता. त्यामुळंच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याही ते आवडीचे होते.

२०१४ च्या निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसला नीलेश पारवेकरांसारख्या तरुण नेत्यांची खूपच गरज होती. शिवाय राहुल गाधी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याचा हात नेहमी त्यांच्या पाठीवर असल्यानं महाराष्ट्रात त्यांना आणि पक्षाला उज्ज्वल भविष्य होतं. पण आता फक्त राहिल्या जरतरच्या गोष्टी. मात्र एक नक्की, राहुल गांधींच्या ब्रिगेडचा एक शिलेदार कमी झाला.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.