टॉप न्यूज

बाबा-आबांची आघाडीवर मोहोर

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरी वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी आता सबुरीची भूमिका घेतलीय. मुलुंडमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणं लढवतील, असं नि:संदिग्धपणं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगलीत बोलताना मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलंय. कार्यकर्त्यांमधील चलबिचल संपून एकीनं लढायला तेही तयार होतील, असा विश्वासही आर. आर. आबांनी बोलून दाखवलाय.
 

ताणायचं, पण तोडायचं नाय
ताणायचं पण तुटू द्यायचं नाही. आणि समजा... हे जरा अति होतंय म्हणजेच तुटू शकतं, असं ज्येष्ठांना वाटलं तर मग त्यांनी पुढाकार घेत, ताण कमी करायचा, असा खेळ करत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राज्यात सत्तेवर आहे. 'दादागिरी चालून घेणार नाय' तर 'बाबा काय कामच करत नाय', असे आरोपप्रत्यारोप करत आघाडीचा संसार सुरू आहे. स्वबळावर सत्ता आणायची, असं खूळ अधूनमधून जागं होतं. पण, 'अहो... येडं का खुळं तुम्ही, सत्ता आणायची हाय नव्हं' असं कुणीसं म्हटलं की परत खटका पडल्यासारखं सगळं सुतासारखं सरळ व्हतं. हा खेळ आता राज्यातील जनतेलाही नवा राहिलेला नाही. जनता जनार्दनाला आता कळून चुकलंय...आघाडीचं सोडाच वो, सत्तेसाठी काय पण, अशी स्थिती आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनीच आता खुलासा केल्यानं हलक्या कानाच्या तोंडातून होणारी 'तुटणार...तुटणार' ही पुटपू़ट बंद होईल आणि तसल्यांचं ऐकून चलबिचल कॅटॅगरीतील कार्यकर्त्यांची चुळबुळ थांबेल, असा विश्वास तुटणं शक्यच नाही, अशी पक्की खात्री असलेल्या नेतेमंडळींना वाटतोय.

Aba-babaडिझेल प्रश्न केद्रात मांडणार – मुख्यमंत्री
काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांच्या मुलुंड येथील कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रश्नांचाही ऊहापोह केला. राज्यातील मासेमारी आणि एसटीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमती कमी कराव्यात, यासाठी आपण स्वतः केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेणार असून त्यातून नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार समर्थ असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. वेळ पडलीच तर विकासकामांना कात्री लावू, पण दुष्काळग्रस्तांना मदत कमी पडू दिली जाणार नाही, याचाही मुख्यमंत्री चव्हाण यांनी पुनरुच्चार केला.
एकत्र लढण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य : आर. आर.
आगामी निवडणुका एकत्रितपणं लढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचं आबांनी स्वागत केलंय. तासगाव या त्यांच्या फडात आलेल्या आबांचं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडं लक्ष वेधलं असता त्यांनी... 'बाकी काय आसंल तरी निवडणुकीत आघाडी होतेच वो, त्यात काय एवढं,' असं अजिबात म्हटलं नाही. तर आबा म्हणाले, की राष्ट्रवादीला कमजोर समजून, काँग्रेसकडून नेहमी स्वबळाची भाषा केली जाते.
मात्र, निवडणुका जवळ आल्या की दोन्ही पक्षांची आघाडी होत असते. तरीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र लढण्याची जी भूमिका मांडली आहे, ती योग्य आहे.
राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडं आहे. रिक्त असलेलं हे पद मुख्यमंत्री भरतील, असंही त्यांनी प्रेमळपणं सांगून टाकलं. मुंबई हल्ल्यामध्ये दहशतवादी अजमल कसाब इतकाच रिचर्ड हेडली दोषी असल्यानं हेडलीला फाशीचीच शिक्षा व्हावी. फाशी देण्यासाठी अमेरिकेतून हेडलीला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडं विनंती करण्यात येईल, असा 'बाण'ही त्यांनी शेवटी सोडला.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.