टॉप न्यूज

उत्खनन बंदीविरोधी मोर्चा

मुश्ताक खान, रत्नागिरी
गौण खनिजांच्या उत्खननावर असलेली बंदी उठवली नाही तर कोकणात मंत्र्यांना लाल दिव्याच्या गाड्यांत फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेनं दिलाय. चिरे, खडी, वाळू, माती यांच्या उत्खननावर रत्नागिरी, सिंधुदुर्गात बंदी असल्यामुळं संतापलेल्या शिवसैनिकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येनं धडक मोर्चा काढला.
 

ही बंदी असल्यामुळं असंख्य गवंडी, अकुशल मजूर, चिरे काढणारे मजूर, वाळू काढणारे मजूर, वीटभट्टी आणि लाकूड व्यवसायावरही प्रचंड परिणाम झालाय. या सर्व लोकांवर सरकारनं उपासमारीची वेळ आणून ठेवलीय, असा आरोप शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी केला.

shivsena morchaकोकणचा कॅलिफोर्निया करण्याची वल्गना करणाऱ्या या सरकारनं तर रस्ते, घर, विहिरी, तळीही बांधायला बंदी आणली आहे. कॅलिफोर्निया सोडा कोकणचं 
कोकण राहिलं तरी मिळवलं, अशी खरमरीत टीकाही राऊत यांनी केली. त्याचबरोबर जशी विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली, त्याच प्रकारची वेळ आता कोकणातील या व्यावसायिकांवर, मजुरांवर आलीय, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही आम्ही भेटलो, पण तेही या प्रश्नावर गंभीर दिसत नाहीयेत, असा आरोपही त्यांनी केला.

सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या या व्यवसायाबद्दल सरकारनं जर त्वरित निर्णय घेतला नाही तर कोकणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि सरकारच जबाबदार राहील, अशी प्रतिक्रिया आमदार सूर्यकांत दळवी यांनी दिली. त्याचबरोबर शिवसेना जर एखाद्या मुद्द्यासाठी रस्त्यावर उतरली तर विषय मार्गी लावेपर्यंत माघार घेत नाही, हेही दळवी यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेच्या या मोर्चामध्ये वृद्धांपासून लहान मुलं, महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. 'शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब जिंदाबाद'च्या घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी निवेदनाद्वारे लवकरात लवकर ही बंदी उठवण्याची मागणी केली.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.