विठ्ठलवाडीत राहणाऱ्या दरंदले कुटुंबातले रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश दरंदले आाणि पोपट विश्वनाथ दरंदले हे तिघं भाऊ आणि त्यांचे दोघं साथीदार संदीप कुऱ्हे आणि अशोक नवगिरे यांना या प्रकरणी अटक करण्यात आलीय.
गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केल्याचा आरोप होतोय.
माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या. समाजकल्याण खात्यानं अनुसूचित जातींवरील अत्याचारांच्या नियमांतर्गत देण्यात येणारी सरकारी मदत आताशी, एक महिन्यानंतर देऊ केलीय, जी तातडीनं आठवड्याभरात देणं अपेक्षित होतं. पण आता आरोपींची नार्को टेस्ट करा, अशी मागणी लोक अधिकार आंदोलन आणि मानवी हक्क अभियानच्या कार्यकर्त्यांनी केलीय. त्याचबरोबर या केसमध्ये उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून बोलवा, तरच पीडितांना न्याय मिळेल, अशीही आग्रही मागणी पीडितांच्या वतीनं संघटनांनी केलीय.
बुलडाणा, भुसावळ आणि मध्य प्रदेशातील खांडवा इथले हे तरुण आहेत. ते तिघंही सफाई कामगार होते. नेवासे फाटा इथल्या घाडगे-पाटील कॉलेजमध्ये सफाई कामगार म्हणून ते कामाच्या शोधात आले होते. त्यांना विठ्ठलवाडीतल्या दरंदले कुटुंबानं संडासाच्या टाकीच्या साफसफाईसाठी बोलवून घेतलं. पण कामाला बोलावण्याच्या बहाण्यानं, प्लॅन करून सचिन घारू याचे हात-पाय तोडले आणि डोकं उडवून त्याला ठार करण्यात आलं. इतर दोघं, राहुल कंडारे आणि संदीप थनवार यांनाही ठार करण्यात आलं. अमानुष पद्धतीनं आणि कडबा कापण्याच्या अडकित्त्यानं हे हत्याकांड घडवण्यात आलं. त्यानंतर हे मृतदेह संडासाच्या टाकीत आणि विहिरीत टाकण्यात आले. 1 जानेवारीला घडलेल्या या घटनेनंतर, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी याचा उलगडा झाला आणि पोलिसांनी 302, 201, 34 आणि 120 (ब) कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय. अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर मागासवर्गीय संघटनांनी आणखी आवाज उठवला. मालेगाव, बीड, अहमदनगर आणि भुसावळला मोर्चे निघाले. आरोपींना तातडीनं अटक करून, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा आणि अमानुष पद्धतीनं हे हत्याकांड घडवणाऱ्यांना फाशीच द्या, असा आवाज उठला.
पोलीस दबावाखाली तपास करतायत, त्यांच्यावर राजकीय दबाव आहे. सरकारी पातळीवर, जिल्हा स्तरावरच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळं आम्हाला न्याय मिळणार तरी कधी, असा उव्दिग्न सवाल संदीप थनवार या मृताच्या नातेवाईकानं केलाय. संदीपचा भाऊ पंकज थनवार हा सैन्य दलात आहे. "मोठ्या कष्टानं लष्करी सेवेत दाखल झालो. देशाचं रक्षण प्राणपणानं करतो, पण इथं माझं घरच सुरक्षित नाही, हा अन्याय आहे,” अशी जळजळीत प्रतिक्रिया पंकजनं दिलीय.
विठ्ठलवाडीत सध्या नेहमीचे व्यवहार सुरू असले, तरी वातावरण तणावपूर्ण आहे. या हत्याकांडामागचं निश्चित कारण काय, याचा उलगडा झालेला नाही. प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधाचा मुद्दा यामागे आहे का, याचाही पोलीस तपास करतायत.
आरोपी सवर्ण समाजाचे तर ज्यांची हत्या झाली, ते मेहतर समाजाचे आहेत. राज्यात वर्षानुवर्षांपासून त्यांचीच सत्ता आहे. त्यामुळं हे तिहेरी खून प्रकरण दाबण्यात येतंय, असा आरोप अनेक पुरोगामी संघटनांनी केलाय. ऑनर किलिंगचा वास या प्रकरणाला येत असला, तरी एक महिना उलटून गेल्यानंतरही कुठल्याही राजकीय नेत्यानं किंवा मंत्र्यानं पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं साधं सांत्वन करण्याचीही तसदी घेतलेली नाही. एकीकडं फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावानं घसा ताणून घोषणा द्यायच्या, दुसरीकडं मात्र पिढ्यानपिढ्या पिचलेल्या समाजाकडं लक्षही द्यायचं नाही, एवढं भीषण हत्याकांड होऊन तिकडं फिरकायचंही नाही, असा ढोंगीबाज नराधमपणा या राजकारण्यांनी दाखवलाय. त्याचीच चीड राज्यभरातून व्यक्त होतेय.
Comments
- No comments found