टॉप न्यूज

धक्का देण्यासाठी मच्छीमार सज्ज

मुश्ताक खान, हर्णे, रत्नागिरी
डिझेल दरवाढीच्या विरोधात मच्छीमारांनी सुरू केलेला एल्गार तीव्र झाला आहे. राज्यभरातील मच्छीमार बांधव आता एकवटला असून सरकारला धक्का देण्यासाठी सज्ज झालाय. केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करत मच्छीमारांनी मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर शनिवारी आंदोलन केलं. हर्णे बंदरासह कोकणातील प्रमुख बंदरांवरील मच्छीमारांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय.
 

डिझेलचा भुर्दंड

केंद्र सरकारनं मच्छीमारांना घाऊक म्हणजेच बल्क वर्गात टाकल्यानं डिझेलला लिटरमागे ११ रुपये ६३ पैसे जादा मोजावे लागतायत. याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर मच्छीमारांना घाऊक वर्गातून किरकोळ वर्गात समाविष्ट करण्यात आल्याची घोषणा झाली असली तरी त्यासंदर्भात अधिकृत माहिती कुणाकडंच उपलब्ध नाही. परिणामी वाढीव दराचा भुर्दंड कायम आहे.

किरकोळ कपात Harne bandar Intro Image

कोकणात गेल्या १७ दिवसांपासून मच्छीमारांचं आंदोलन सुरू आहे. मासेमारी बंद आंदोलनाची तातडीनं दखल घेऊन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन दिल्लीत धडक मारली. पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांना प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मच्छीमारांना घाऊक वर्गातून किरकोळ वर्गात समाविष्ट करून केवळ सात रुपयांची कपात करण्याची घोषणा केली. मुळात ही किरकोळ कपात म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप मच्छीमार संघटनांनी केलाय. महत्त्वाचं म्हणजे, पेट्रोलियम मंत्रालयाकडून नेमकी माहितीही मिळत नसल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे.

मच्छीमारांचा आता... दे धक्का!

अखेर पेचात सापडलेल्या या मच्छीमार बांधवांनी मोर्चाचं हत्यार उपसलंय. जोपर्यंत डिझेलचे दर पूर्ववत होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार असून, मासेमारी बंद राहणार आहे, असं महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं जाहीर केलंय. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक दीपक पांडे यांनी मोर्चामुळं जिल्ह्याच्या शांततेला बाधा येणार नाही, या अटीवर मोर्चा काढण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळं आता सोमवारी (४ फेब्रुवारी) मच्छीमार जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर धडक देणार आहे.

कपातीनंतरही ४ रुपये ६२ पैशांचा भुर्दंड

केंद्र सरकारनं इंधनाच्या दरात ११ रुपये ६२ पैसे वाढ केली आहे. मुळात मोठ्या कंपन्यांना लावण्यात येणारा दर मच्छीमार सहकारी संस्थांनाही लावण्यात आला आहे. हा दर वगळता उर्वरितांसाठी करण्यात आलेली ४५ पैशांचीच वाढ मच्छीमारांसाठी करण्यात यावी, अशी मागणी आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दरवाढीतील ७ रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्हाला तो मान्य नाही. कारण सरतेशेवटी आम्हाला ४ रुपये ६२ पैशांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. परिणामी मच्छीमारांचं यामध्ये नुकसान आहे, असे मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी म्हटलंय.

  • मासेमारी होणार ठप्प
  • राज्यात सुमारे एक लाख मच्छीमार असून सुमारे ८ लाख कुटुंबांचं पोट मासेमारीवर अवलंबून
  • आंदोलनामुळं राज्यातील २२ हजार बोटी बंद राहणार
  • राज्यात एकूण दोनशे मच्छीमार सहकारी संस्था
  • राज्यातून दरवर्षी २ हजार कोटी रुपयांच्या मासळीची निर्यात
  • राज्याचं मासळीचं उत्पादन वर्षाला साडेतीन लाख मेट्रिक टन

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.