टॉप न्यूज

खडकीला जलसंधारण पुरस्कार

ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली
महाराष्ट्राने देशाला दिलेल्या रोजगार हमी योजनेच्या यशस्वी अमलबजावणीसाठी देश पातळीवरच्या यशस्वी प्रयोगांना शनिवारी नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या खडकी गावाचा समावेश आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत (मनरेगा) जलसंधारणाच्या कार्यासाठी खडकीसह देशभरातील 11 ग्रामपंचायतींना गौरवण्यात आलं आहे.

Khadakiकेंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या विशेष अभियानाला आज आठ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं ‘महात्मा गांधी नरेगा’ दिनाचे औचित्य साधून येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेसाठी विशेष कार्य करणारे देशभरातील अधिकारी, पदाधिकारी आणि प्रत्यक्ष सहभागी झालेले निवडक मजूर या कार्क्रमासाठी आले होते.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश, राज्यमंत्री प्रदीप जैन, लालचंद कटारिया आदी मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्याचे रोहयो आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत, प्रधान सचिव रोहयो व्ही. गिरीराज, यांच्यासह महाराष्ट्राची 60 लोकांची टीम या पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थित होती.

यावेळी नितीन राऊत म्हणाले, ‘रोजगार हमी योजनेचा जन्म महाराष्ट्रात झाला असून 2005 पासून केंद्राव्दारे ही योजना राबविली जात आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. यंदा राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी जलसंधारण व जलसंवर्धनाच्या कामांवर भर दिला जात आहे.’

खडकी गावाचे सरपंच बाळासाहेब गुणवारे हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘अत्यंत नियोजनबद्धरित्या आम्ही गावात या योजनेची आखणी केली होती. 5 हजार 619 इतकी लोकसंख्या असलेल्या या गावातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला रोजगार मिळावा, असा आमचा प्रयत्न होता.’ सरपंच गुणवारे यांना सोनिया गांधींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील टपाल विभागाचे कर्मचारी मधुकर गोविंद हमरे यांना यावेळी योजनेच्या टपाल सेवा अंतर्गत सर्वोत्कृष्ट सेवेकरिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी 27 हजार 112 मजुरांना 1 कोटी 82 लाख 59 हजार 225 रूपये रक्कम वितरीत केली आहे.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.