टॉप न्यूज

अपंगांसाठी 'प्रहार'ची पालखी

ब्युरो रिपोर्ट, पुणे
राज्यातील अपंग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेतलाय. उद्या चार फेब्रुवारीपासून त्यांच्या प्रहार संघटनेमार्फत तुकोबारायांचं देहू ते मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान अशी अपंगांची पालखी यात्रा काढण्यात येणार आहे.
 
यात्रेपूर्वी प्रहार संघटनेनं नऊ जानेवारीपासून राज्यभरात अपंगांच्या सभा घेण्यास सुरुवात केलीय. प्रत्येक जिल्ह्यात सभेनंतर रक्तदान शिबीर घेण्यात येतंय. आत्तापर्यंत अपंग बांधवांनी दोन हजार बाटल्या रक्त जमा केलंय.

अपंगांसाठी धोरण नाही
bachhuसंत तुकारामांच्या 'जे का रंजले गांजले' या अभंगानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षीच्या बजेटची सुरुवात केली खरी मात्र प्रत्यक्ष बजेटमध्ये अपंगांसाठी काहीच तरतूदी केल्या नाहीत. राज्यात कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांचा पगार वाढतोय. मात्र ज्याला हात, पाय नाही अशा अपंगांसाठी काहीच धोरण नाही. 1995मध्ये अपंग पुनर्वसन कायदा पास झाला. मात्र आजतागायत या कायद्याची अमलबजावणी झालेली नाही, याकडं बच्चू कडू यांनी लक्ष वेधलंय. तीन टक्के निधी अपंगांसाठी खर्च करावा, अशी सरकारी तरतूद आहे. मात्र ग्रामपंचायतीपासून ते जिल्हापरिषदेपर्यंत कुणीही प्रत्यक्षात हा खर्च करत नसल्याचं बच्चू कडूंचं म्हणणं आहे.

अपंग कायम दुर्लक्षित
अपंग राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित आहे. त्यांची वोटबँक नाही त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष त्यांची दखल घेत नाही. विधानसभेतही या प्रश्नावर कधीच चर्चा होत नाही. गाडगेबाबांनी सांगितल्याप्रमाणं देव मंदिरात नाही, मशिदीत नाही तो माणुसकीत आहे. या भावनेतूनच आम्ही हे आंदोलन उभारल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय.

चार फेब्रुवारीला देहूपासून सात ते आठ हजार अपंगांसह पालखी यात्रा मुंबईकडं रवाना होईल. हे सगळे कार्यकर्ते मुख्यमंत्र्याच्या मुंबईतल्या वर्षा निवासस्थानावर थडकतील. सरकारनं मोर्चेकऱ्यांवर दडपशाही केली तर 'प्रहार स्टाईल'नं उत्तर देण्याचा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी दिलाय.

प्रमुख मागण्या

 • प्रत्येक जिल्ह्यात एक अपंग भवन, तसंच अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारणे
 • अपंगांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अपंग कला अकादमीची स्थापना
 • सरकारी हॉस्पिटल्समध्ये गतीमंद व्यक्तींसाठी निवासी सुश्रुषागृहे उभी करावीत. इतर अपंगांकरिता तहहयात कायमस्वरूपी निवासी आश्रम उभारण्यात यावेत
 • आंतरजातीय विवाहासाठी अपंगांना सहाय्य करावं
 • अपंगांना व्यवसायासाठी जागा आणि गाऴे देण्याच्या सरकारी निर्णय़ात बदल करून सुलभता आणावी. जेणेकरुन अंपगांना व्यवसायासाठी सुलभतेनं गाळे उपलब्ध होतील
 • अपंगांच्या गृहनिर्माण संस्थेकरिता सरकारी जमीन विनामूल्य आणि विनाअट पुरविण्यात यावी
 • अपंगासाठी असलेल्या योजनांचा लाभ अपंगांना विनाअट मिळण्यासाठी धोरणात बदल करणे
 • सरसकट सर्व अपंगांना विनाअट घरकुल देण्यासाठी इंदिरा आवास योजना अथवा सामाजिक न्याय विभागातर्फे नवीन योजना आखावी
 • अपंग कल्याण विभाग सामाजिक न्याय विभागातून काढून स्वतंत्र अपंग विभाग निर्माण करावा.
 • स्वतंत्र अपंग कल्याण मंत्रालयाचा जिल्हा आणि तालुका स्तरावर विस्तार करावा
 • मूकबधीर आणि अपंग कर्मचाऱ्यांना सरकारी, निम सरकारी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलती मिलव्यात. उदा. व्यवसाय करात सूट, वाहन भत्ता इत्यादी
 • अपंगांसाठी विशेष अपंग विमा योजनेची सुरुवात करावी
 • अपंग पुनर्वसन कायदा 1995चे निकष समोर ठेवून अपंगांच्या शाळांचे नूतनीकरण धोरण ठरविण्यात यावे
 • मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे अपंग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं धोरण निश्चित करावे
 • अपंग पुर्नवसनाशी संबधीत जिल्हा समित्यावर अपंगाना प्रतिनिधीत्व देण्यात यावे
 • अपंगांचे लघुउद्योग उभारण्यासाठी विशेष मोहीम आखावी
 • जन्म-मृत्यूच्या नोंदणीप्रमाणे अपगांची नोंदणी अनिवार्य करावी
 • मुंबईत अपंगाना साडेचार हजार टेलिफोन बूथ दिले होते. मात्र मोबाईलमुळे बूथ बंद पडले आहेत. त्यामुळे या बूथमध्येच जनरल स्टोअर्स किंवा तत्सम प्रकारची दुकाने चालवण्यास मान्यता द्यावी
 • सर्व अऩाथ मुलांचा वेगऴा प्रवर्ग निर्माण करावा

Comments (2)

 • मा.आ.बच्‍चूभाऊ सारखा आमदार या महाराष्‍ट्रात पहिला पाहतो आहे. राज्‍यातील सर्व अपंग बाधवांनी बच्‍चूभाऊ यांना आशिर्वाद देवून राज्‍याच्‍या मंत्रीमंडळात स्‍थान मिळावे यासाठी प्रार्थना करा म्‍हणजे राज्‍यातील अपंगाची एकही समस्‍या शिल्‍लक राहणार नाही याची मला खात्री आहे कारण आम्‍ही एवढी वर्ष अपंग संघटनेचे काम करतो असा आमदार कोणीही नाही
  रामदास खोत , सांगली

  अध्‍यक्ष , प्रहार अपंग क्रांन्‍ती आंदोलन , जिव्‍हाळा अपंग पूनर्वसन संस्‍था सांगली

 • असा कुणीतरी आवाज उठविणारा नेता पाहिजे.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.