टॉप न्यूज

कशासाठी...बायकोसाठी!

विवेक राजूरकर, औरंगाबाद
तुम्ही 'अभिमान' हा चित्रपट पाहिलाय ना? पती-पत्नीच्या नात्यात डोकावणारा पुरुषी अहंकार हा विषय नवीन नाही. बायकोच्या चांगल्या गोष्टींबद्दल अभिमान वाटण्याऐवजी ही आपली बायको वरचढ तर ठरणार नाही ना, अशा शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली की समजायंच...पुरुषी अहंकार जागा झालाय! पण, पुरुषी अहंकारातून मुक्त होतं बायकांना प्रोत्साहन देणारे चांगले पुरुषही समाजात असतात. बायकोला पीएच. डी. करता यावी, यासाठी चक्क वॉचमन झालेल्या भीमरावांची कहाणी.
 

स्वत:ऐवजी पत्नीला दिली संधी
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील ममदापूर येथील भीमराव गायकवाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पेपर छाननीचे काम करीत. ते करतानाच त्यांनी इतिहासात एम. ए. केलं. याच दरम्यान त्यांची वर्गात शिकत असलेल्या वसमतच्या वंदना कांबळे यांच्याशी ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर लग्नही. दोघंही अभ्यासात हुशार आणि दोघांनाही नेट-सेट, एम फिल, डॉक्टरेट मिळविण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी दोन वर्षे प्रयत्नही केले. मात्र, त्यात यश आलं नाही. भीमरावांना आपल्या पत्नीच्या बुद्धिमतेवर विश्वास होता. शेवटी पीएचडीसाठी दोघेही पुण्याला गेले. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळं ते औरंगाबादला परतले. अशातच त्यांची भेट विद्यापीठात काम करणारे हसन इनामदार यांच्याशी झाली. या दोघांची शिक्षणांची तळमळ पाहून त्यांनी त्यांची ओळख डॉ. झाकेर पठाण यांच्याशी करून दिली. मात्र, काही तांत्रिक आणि पैशांच्या अडचणीमुळे या दोघांपैकी एकालाच पीएच. डी. करण शक्य होतं. यावेळी माझ्याऐवजी माझ्या पत्नीलाच पीएच. डी.साठी प्रवेश द्यावा, अशी विनंती भीमरावांनी डॉ. पठाण यांना केली. त्यावर अनेकांनी त्यांना मुर्खात काढले. नको ते सल्लेही दिले. परंतु आपल्या मतावर ठाम राहत त्यांनी पत्नी वंदनाला डॉक्टरेट मिळवून देण्याची जिद्द बाळगली.
मेहनत कारणी लागली
पीएच. डी. म्हटलं की शोधप्रबंधासाठी खर्च हा आलाच. मात्र दोघांचीही परिस्थिती अतिशय हालाखीची होती. शहरात भावसिंगपूरा इथं भाड्यानं दोन रूमच्या खोलीत या दाम्पत्याचा संसार सुरू होता. पदरी जुळी अपत्य होतं. त्यातच बाळंतपणामुळं लासूर येथील नोकरी वंदना यांना सोडावी लागली. त्यामुळं पोटापाण्याचाच प्रश्न त्यांच्यापुढं उभा राहिला. तरीही उमेद न हरता भीमरावांनी विद्यापीठात सुरक्षारक्षक एजन्सीमार्फेत वॉचमनची नोकरी धरली. त्यातून पुरेसे पैसे मिळत नव्हते मग महिन्यातून पंधरा दिवस ओव्हरटाईम काम करू लागले. पत्नीला अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून बाळाचं पालनपोषण करत. नोटस काढायला मदत करत. असं करत २००८ साली सुरू झालेलं पत्नीचं संशोधन शेवटी डिंसेबर २०१२ ला पूर्ण झालं. अथक मेहनत करून वंदना यांनी “ भारतीय स्वांतत्र्य आंदोलनातील महाराष्ट्रीय स्त्रिंयांचे योगदान- (१८५७-ते-१९४७)” या विषयात शोधनिबंध सादर करून पीएच.डी. संपादित केली.
पतीनं दिलेल्या भरभक्कम साथीमुळंच डॉक्टरेट पदवी मिळालं, असं डॉ. वंदना गायकवाड आवर्जुन सांगतात. तसंच आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधानही भीमरावांच्या चेह-यावर दिसंत. प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते, असं आपण नेहमी म्हणतो. पण काळ बदलतोय. यशस्वी स्त्रीच्या पाठीमागंही एक पुरूष असतो, हेही तेवढंच खरं.


Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.