टॉप न्यूज

महिला प्रबोधनासाठी रांगोळी

विवेक राजूरकर, औरंगाबाद
'ती'ची नजर नेहमीच नाविन्याचा शोध घेत असते. रस्त्यानं जात असतानाही इतर स्त्रियांकडं ती पाहत असते. वेषभूषा, केशभूषा याशिवाय काय, काय दागिने घातलेत, घरासमोर कसली रांगोळी आहे, अशा अनेक गोष्टीचं निरिक्षण 'ती' करत असते. हिच गोष्ट हेरुन औरंगाबादच्या दोघींनी ज्यांच्या घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असेल त्यांच्या घरासमोर जाऊन महिला सबलीकरणाचा संदेश देणारी रांगोळी काढण्याचा उपक्रम हाती घेतलाय. या त्यांच्या प्रयत्नांना सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतोय.
 

प्रबोधनासाठी दारी रांगोळी
रांगोळी हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रांगोळी ही केवळ अंगणाची शोभा वाढवणारी गोष्ट नाही. तर अवघं घर आणि तिथली माणंस यांचं जणू ते प्रतिबिंब असंत. रांगोळीचं रेखाटन म्हणजे घरी येणाऱ्यांच मन प्रसन्न करण्यासाठी केलेलं अबोल स्वगतंच असंत. तर अशी ही रांगोळी...त्यामुळंच घर बैठं असो, फ्लट असो किंवा झोपडी असो. प्रत्येक घरासमोर रांगोळी काढलीच जाते. नेमकी हीच गोष्ट हेरुन कुमारी दिव्या दिवटे हिला एक कल्पना सुचली. तिनं आपली मैत्रिण कांचन सिससीकर हिला सोबत घेत परिसरातील अनेक सोसायटीतील हळदी-कुंकंवाच्या कार्यक्रमांची यादी तयार केली. यादीनुसार प्रत्येक सोसायटीच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासमोर स्वत:हून रांगोळी काढण्याचा उपक्रम सुरू केला. रांगोळीच्या माध्यमातून या दोघींनी महिलांना महिला सुरक्षेविषयी संदेश द्यायला सुरूवात केली. स्वरक्षण ही काळाची गरज, महिला अत्याचाराविरूध्द एकत्रित व्हा, स्वरक्षणासाठी प्रशिक्षण घ्या, महिलांसाठी आता महिलांनीच पुढाकार घ्यावा, असे अनेक संदेश त्यांनी रांगोळीतून दिले. अनेक महिलांनी त्यांच्या या कार्याचं कौतुक करत पाठिंबाही दिला. अनेक मुली या प्रबोधनामुळं जागं होवून वेळात वेळ काढून स्वरक्षणाचे धडे घेतायत.
महिला एकवटल्यात
दिल्लीत झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यातून तमाम महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. त्यामुळंच आता देशभर महिलांचा एल्गार सुरु झालाय. शिवसेनेनं आपल्या पदाधिकारी महिलांना चाकूचं वाटप केलं. तर महिलांना कराटेचं प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकारंन पुढाकार घेतलाय. औरंगाबादच्या या दोघींचा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे. महिला जागृतीच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं त्यामुळंच सर्वच स्तरातून स्वागत होतंय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.