टॉप न्यूज

...पुन्हा माहेरी आले परदेशी पक्षी!

ब्युरो रिपोर्ट, गोंदिया
एकेकाळी परदेशी पक्ष्यांचं माहेरघर असलेला नवेगाव बांध तलाव बेशरमच्या झुडपांनी वेढला गेला. त्यामुळं खाद्य संपुष्टात आल्यानं हे माहेर या पक्ष्यांना पोरकं झालं. नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी श्रमदानानं तलावाचा परिसर बेशरममुक्त केल्यानं आता इथं परदेशी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालाय. पुढच्या वर्षी येणाऱ्या पक्ष्यांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास पक्षीतज्ज्ञ व्यक्त करतायत.
 

बेशरमनं केला वांदा
विपुल वनसंपदेनं वेढलेला नवेगाव बांधचा तलाव गेल्या कित्येक वर्षांपासून परदेशी पक्ष्यांचं माहेरघर होतं. या तलाव परिसरात देवधान आणि खस जातीचं गवत मोठ्या प्रमाणात उगवतं. या गवतावर हे पक्षी आपली घरटी बनवतात. शिवाय गवतावरील किडे हे त्यांचं आवडतं खाद्य आहे. विपुल गवतामुळं त्यांना इथं मनसोक्त खाद्य मिळत होतंच. प्रजोत्पादनासाठी अनुकूल वातावरण होतं. त्यामुळं या माहेरपणच्या काळात ते आपली बाळंतपण उरकून पिलाबाळांचा कबिला सोबत घेऊनच मायदेशी परतत होते.
पण झालं असं... तलावाच्या परिसरात बेशरमची झुडपं वाढली. त्यामुळं इथल्या दलदलीत वाढणारे किडे-मकोडेंचं प्रमाण कमी झालं. त्याचा विपरीत परिणाम या पक्ष्यांना मिळणाऱ्या खाद्यावर झाला आणि हळूहळू त्यांचं येणं थांबलं. या बदलाचा वेध घेताना पक्षीतज्ज्ञांना बेशरमचा अडथळा गवसला.

navegaonएनएसएसचा पुढाकार  
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तलावाच्या संपूर्ण परिसरात सलग चार दिवस श्रमदान केलं. हे शिबिरार्थी दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत यासाठी झटले. या चार दिवसांत त्यांनी तब्बल दीड एकरातील बेशरमांची झाडं मुळासकट उखडून फेकली. शिवाय पुन्हा इथं बेशरमाची झुडपं फोफावणार नाहीत याची काळजी घेतली. तब्बल 150 विद्यार्थ्यांनी केलेल्या चार दिवसीय श्रमदानातून नवेगाव बांध हा बेशरममुक्त झालाय. वन विभागानं यासाठी तब्बल 2 लाखांचा निधी राखून ठेवला होता. तो वाचला. त्यामुळं विद्यापीठ, तसंच वन विभाग या विद्यार्थ्यांवर चांगलाच खूश आहे.

पुन्हा तलाव गजबजला
साधारणतः थंडीच्या मोसमात रशिया, युरोप आणि इतर थंड हवामानाच्या प्रदेशात कडाक्याची थंडी पडते. काही ठिकाणी बर्फही पडतो. यापासून आपला बचाव करण्याकरता, हे पाहुणे भारतभूमीकडं रवाना होतात. यात विशेषकरून रेड क्रिटेड पोचार्ड, पारी बौलर, टफटेद, पोचार कॉमनटील, ग्रेलेग्स यांसारख्या पक्ष्यांचा यात अंतर्भाव असतो. विद्यार्थ्यांच्या या अभिनव श्रमदानामुळं या पक्ष्यांचं आवडतं खाद्य असलेलं हे गवत वाढण्यास मदत होतेय. खाद्य मिळतंय. त्यामुळं हा तलाव पाहुण्या पक्ष्यांनी पुन्हा गजबजू लागलाय. आता त्यांची इथं बाळंतपणं होतील आणि पिलाबाळांना घेऊन ते मायदेशी रवाना होतील.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.