टॉप न्यूज

गावकऱ्यांनी उभारलंय बांबूचं बन

ब्युरो रिपोर्ट, गोंदिया
गाव करील ते राव काय करील, अशी म्हण आहे. तिरोडा तालुक्यातील चोरखमारा इथल्या गावकऱ्यांनी बांबूचं अनोखं बन उभारून ही म्हण सिद्ध करून दाखवलीय. बांबूच्या सुमारे साडेसोळा हजार रोपांनी बहरलेली ही रोपवाटिका पर्यटनस्थळ झालंय.


bambu story image 7चोरखमारा ग्रामस्थांचा पुढाकार 

विपुल वनसंपदा असलेला गोंदिया हा आदिवासी जिल्हा. निसर्गाची लूट करून नव्हे तर एकरूप होऊन इथला आदिवासी जगत असतो. त्यांची ही जगण्याची मूलभूत प्रेरणा लक्षात घेऊन वन खात्यानं 'वन व्यवस्थापन समिती'चा अभिनव उपक्रम राबवलाय. गावासभोवताली असणाऱ्या वनसंपदेचं संवर्धन कसं होईल आणि त्यासाठी काय करायचं, याचे सर्व अधिकार या समितीला बहाल करण्यात आलेत. तिरोडा तालुक्यातील चोरखमारा इथल्या 'वन व्यवस्थापन समिती'नं याचाच फायदा घेत ही बांबूची रोपवाटिका उभारलीय.

 बांबूच्या बनात...

 बांबूची उपयोगिता सांगावी लागत नाही. तिरडी बांधण्यापासून ते अनेक गृहोपयोगी वस्तू तयार करण्यासाठी बांबूचा उपयोग होतो. हीच गोष्ट लक्षात घेत चोरखमारा ग्रामस्थांनी श्रमदानातून बांबूची रोपवाटिका तयार करण्याचा निर्धार करून त्याची अंमलबजावणी केली. चोरखमारालगतच नागझिरा अभयारण्य आहे. राष्ट्रीय बांबू मिशनअंतर्गत या गावातील वन व्यवस्थापन समितीला २०१२ला तब्बल १४ लाखांची मदत वन विभागाकडून मिळाली. महिला बचत गटाच्या प्रमुख कविता कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली मे २०१२मध्ये नागपूरवरून गावकऱ्यांनी रोपांची बीजं आणली आणि त्याच दरम्यान एक एकरच्या क्षेत्रात तब्बल हजारांवर बीजांची लागवड केली. सध्या हे बांबूच्या रोपांचं पीक १० महिन्यांचं झालंय. नदीकाठावरील सुपीक माती, शेणखताचा वापर यामुळं अवघी बांबूशेती बहरलीय. आजमितीला या रोपवाटिकेत हजारांवर बांबूंची लहान रोपं गावकऱ्यांनी तयार केली आहेत, तसंच इतर १६ हजार ५०० झाडांची लागवड केलीय. यातून आता दोन पैसेही मिळू लागले असून गावातील गोरगरीब आदिवासी बांधवांना हातभार लागतोय.

 इतर वृक्षांचीही लागवड

 बांबूची रोपवाटिका उभारून गावकरी थांबलेले नाहीत. त्यांनी वन व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनीवरसुद्धा स्वयंमस्फूर्तीनं इतर रोपांची लागवड केलीय. वन विभागानं या गावातील वन व्यवस्थापन समितीला १५ हेक्टरची जमीन दिलीय. या ठिकांणी त्यांनी सागवान, आवळा तसंच करंजीसारख्या पर्यावरणाला मदत करणाऱ्या झाडांची लागवड केलीय. सुरुवातीला जंगल परिसर लागूनच असल्यानं गावातील लोक जंगलात जाऊन बांबूचं झाड तोडून आणत असत. मात्र या प्रयोगामुळं तेच आता या बांबूचे मालक झाल्यामुळं ते त्याचा वापर करू शकतील आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास विशेष मदत होईल, असा विश्वास वनाधिकारी एस. व्ही. रामाराव यांनी बोलून दाखवला.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.