टॉप न्यूज

मुंडेंनी फुंकलं रणशिंग

ब्युरो रिपोर्ट, सांगली
ज्यांनी मंत्रालय जाळलं त्यांची पुन्हा सत्तेत येण्याची मनीषा मी जाळल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.
 
मिरज पूर्व भागातल्या 17 गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळावं म्हणून भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी नुकतंच जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं. त्याची दखल घेत सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानिमित्त मिरज तालुक्यातील भोसे इथं भाजपनं आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार सुरेश खाडे, आमदार संभाजी पवार, आमदार प्रकाश शेंडगे, भाजपचे प्रदेश संघटन मंत्री सुनील कर्जतकर, भाजप महिला आघाडीच्या नीताताई केळकर आदींसह भाजप, शिवसेनेचे स्थानिक नेते उपस्थित होते.
 

मंत्रालय आगीकडं वेधलं लक्ष

येत्या विधानसभा निवडणुकीत मंत्रालयाला लागलेल्या आगीचा मुद्दा कशा पद्धतीनं ऐरणीवर येऊ शकतो, याची चुणूक मुंडेंच्या भाषणातून मिळाली. कसलंही काम घेऊन जा, उत्तर ठरलेलं असतं... फाईल जळाली, असा आरोप करून ज्यांनी मंत्रालय जाळलं, अशा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेची लंका येत्या निवडणुकीत मी पेटवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात मुंडे यांनी आपला निर्धार बोलून दाखवला. उपस्थितांनीही त्याला टाळ्या वाजवून जोरदार साथ दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारचं हे शेवटचंच वर्ष आहे. त्यामुळं त्यांना विकासापेक्षा पैसे खाण्यात अधिक इंटरेस्ट आहे आणि तेच ते करतायत, असा आरोपही त्यांनी केला.

 

माढाकडं तेवढं लक्ष, बाकीच्या दुष्काळाकडं दुर्लक्ष

राज्यात भीषण दुष्काळ असताना माढा मतदारसंघ सोडून (राष्ट्रवादीचे अध्यक्ष कृषिमंत्री शरद पवार हे या मतदारसंघातून निवडून गेलेत.) इतरत्र सरकार दुर्लक्ष करतंय, असा आरोपही मुंडे यांनी केला.
एकट्या माढा लोकसभा मतदारसंघात दुष्काळावर ४८० कोटी खर्च झाले, त्यावेळी इतर जिल्ह्यांतील मंत्री काय करत होते, असा सवालही मुंडे यांनी केला. सांगली जिल्ह्यातही भीषण परिस्थिती आहे, मग नेहमी बोलणारे गृहमंत्री आबा गेले कुठं, असा प्रश्न करून आबांचं ऐकून घेणार तरी कोण, अशी फिरकीही त्यांनी घेतली. दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या सरकारला जनता निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असंही मुंडे म्हणाले. 

 

सिंचन घोटाळ्याचं करायचं काय?

महाराष्ट्रातील पाटबंधारे विभागाचा भ्रष्टाचार इतका मोठा आहे, की जगाच्या पाठीवर कुठंही एवढा मोठा भ्रष्टाचार झाला नसेल. सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च होऊनही सिंचन वाढलं ते फक्त एक टक्का, असं मुंडे म्हणाले आणि उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना एक टक्का नव्हे केवळ पॉईंट एकनं सिंचन वाढल्याचं सांगितलं. त्यावर शेतकऱ्यांनी एवढी बारकाईनं माहिती ठेवल्याकडं लक्ष वेधत आता सरकारचं काही खरं नाही, अशी कोटी मुंडे यांनी केली. युतीचं सरकार सत्तेवर आल्यास सिंचनाच्या नावाखाली 70 हजार कोटी घशात घालणाऱ्यांना आम्ही जेलमध्ये पाठवू, असंही ते म्हणाले. इथल्या शेतकऱ्यांनी आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली पाण्याची लढाई जिंकली असली तरी ही लढाई इथंच थांबवू नका. राज्यात परिवर्तन करायला सज्ज व्हा, असं आवाहनही मुंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.