राज्यभरातील नदीपात्रातील वाळू खरवडून झाल्यानं आता तसं पाहिलं तर वाळूचाही दुष्काळच आहे. त्यामुळंच जी थोडीफार वाळू उपलब्ध होते ती सोन्याच्या भावानं विकली जातेय. यावर आता क्रशिंग करून वाळू तयार करण्याचा उपायही पुढं येतोय. जी वाळू उपलब्ध होते ती अक्षरशः खरवडून काढली जात असल्यानं गाळ कुठला आणि वाळू कुठली, हेच मुळात ओळखू येत नाही. यावर वाळूमाफियांनी शक्कल लढवलीय ती म्हणजे चक्क वाळू धुवायची. त्यामुळं त्यातला गाळ निघून जाऊन वाळू तेवढी शिल्लक राहते. शिवाय धुतल्यानं वाळूपण शुद्ध होऊन बांधकाम भक्कम होतं. त्यामुळंच ही वाळू म्हणजे सध्या बांधकाम व्यवसायात शुद्ध सोनं असल्यासारखी आहे भाऊ!
वाळू धुण्यासाठी हजारो लिटर पाण्याचा वाटप
पुणे जिल्ह्यात भीमा आणि नीरा नदीच्या पात्रात वाळूचे लिलाव झाले आहेत. ज्यांनी हे लिलाव घेतलेत ते आता यांत्रिक पद्धतीनं नदीचं पात्र खरवडतायत. खरवडून निघालेली वाळू ट्रकमध्ये भरल्यानंतर मग पंपानं विहिरीतील पाणी उपसून त्यानं ही वाळू धुतली जातेय. ज्या-ज्या ठिकाणी अशी वाळू धुतली जाते, तिथल्या रस्त्यांवर दुष्काळ असला तरी पाण्याचे लोट वाहताना दिसतायत. विशेष म्हणजे, ज्या गावाजवळ हे घडतंय तिथल्या गावकऱ्यांनाही पिण्यासाठी पुरेसं पाणी मिळत नाहीये. हे केवळ पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात जिथं-जिथं वाळूउपसा होतोय तिथं-तिथं असंच चित्र आहे.
वाळू धुण्याचा व्यवसाय तेजीत
एक वाळूचा ट्रक धुण्यासाठी पाणी देणाऱ्या शेतकऱ्याला ४०० ते ५०० रुपये मिळतायत. त्यामुळंच आता वाळू धुऊन देण्याचा नवीनच उद्योग सुरू झाल्यासारखी परिस्थिती आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर इंदापूर परिसरात १० ते १५ ठिकाणी अहोरात्र हे वाळू धुऊन देण्याचं काम चालतंय. रोज या महामार्गावरून ३०० ते ५०० वाळू वाहतूक करणारे ट्रक जातात. त्यामधील सर्व वाळू धुण्यासाठी किती पाणी वाया जात असेल, याचा नुसता विचार केला तरी या प्रश्नाचं गांभीर्य कुणाच्याही लक्षात येईल.
.....................................
वाळू
खडकाचं वाळूमध्ये रूपांतर होतं
0.06mm-2mm पर्यंत जाडी असलेली वाळू चांगली
वाळूमध्ये सिलिका (Si02) हा महत्त्वाचा कंपोनंट
बांधकामासाठी महत्त्वाचं मटेरियल
सध्या शहरात-खेड्यात मोठ्या प्रमाणात बिल्डिंग होत असल्यानं वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी
नदीपात्रातील वाळूला चांगली मागणी
धुतलेली वाळू बांधकामासाठी चांगली स्ट्रेंथ देते
धुतलेली वाळू मऊ लागते
Comments
- No comments found