टॉप न्यूज

अफजल गुरूला फाशी

ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली
संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला तब्बल ११ वर्षांनंतर अखेर आज (शनिवार) सकाळी आठ वाजता तिहार जेलमध्ये फासावर लटकवण्यात आलं. दरम्यान, अफजलला फाशी देण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना दिली. मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याला अलीकडंच अशाच पद्धतीनं पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलं होतं.


Afzal-Guru12अफजल गुरूच्या पत्नीनं राष्ट्रपतींकडं दाखल केलेला दया अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांनी २३ जानेवारीला फेटाळला होता. त्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाकडून ३ फेब्रुवारीला अफजलचा दया अर्ज फेटाळल्याची कागदपत्रं केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपवण्यात आली होती. अखेर आज त्याला फाशी देण्यात आलं. मूळचा काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील रहिवासी असलेला अफजल गुरू हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कट्टर दहशतवादी होता.

मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याला अशाच प्रकारे पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलं होतं. याप्रमाणेच अफजल गुरूलाही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुप्तता राखून फाशी देण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

 

संसदेवर हल्ला

पाच दहशतवाद्यांनी संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी हल्ला करून नऊ सुरक्षारक्षकांना ठार मारलं होतं. त्यानंतर उडालेल्या चकमकीत पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. या प्रकरणी अफजल गुरू दोषी आढळल्यानंतर २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याच्या पत्नीनं राष्ट्रपतींकडं दयेचा अर्ज केला होता. त्यावेळी अफजल गुरूला फाशी देण्याची मागणी देशभरातून करण्यात येत होती. अखेर अकरा वर्षांनंतर त्याला फासावर लटकवण्यात आलं.

 

कारागृहातच दफन

अफजल गुरूचा मृतदेह कारागृहातच दफन करण्यात येणार असल्याचं, केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी सांगितलं. सुरक्षेच्या दृष्टीनं अफजलला फाशी देण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. कायद्यानं आपलं काम केलं आहे. त्याच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडं ३ फेब्रुवारीला राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळल्याची कागदपत्रं आली होती, अशी माहितीही गृहसचिव सिंह यांनी दिली.

 

न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढेल - आर. आर. पाटील

 संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार महंमद अफजल गुरू याला फाशी देण्यात उशीर झाला हे खरं असलं तरी, आज (शनिवार, 9 फेब्रुवारी 13) त्याला फाशी देण्यात आल्यानं नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचं, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय.

 

संसदेवरील हल्ल्याचा घटनाक्रम -

 • 13 डिसेंबर 2001 - संसदेवर अतिरेक्‍यांचा हल्ला
 • 18 डिसेंबर 2002 - महंमद अफजल गुरू, एस. आर. गिलानी, अफसान गुरू आणि शौकत गुरू यांना विशेष पोटा न्यायालयाकडून फाशीची शिक्षा
 • 29 ऑक्‍टोबर 2003 - महंमद अफजल गुरू आणि शौकत गुरूची फाशी कायम; पण गिलानी आणि अफसान गुरू यांची उच्च न्यायालयाकडून मुक्तता
 • 5 सप्टेंबर 2005 - महंमद अफजल गुरूची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम, शौकतला दहा वर्षांची सक्तमजुरी
 • 26 सप्टेंबर 2006 - अफजलला 20 ऑक्‍टोबर 2006 रोजी फाशी देण्याचा न्यायालयाचा आदेश; अफजल गुरूकडून दयेचा अर्ज दाखल
 • 6 मे 2010 - अफजल गुरू याच्या दयेच्या अर्जासंबंधीची फाईल दिल्ली सरकारनं चार वर्षांनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडं पाठवली. "अफजल गुरूला फाशी द्या; पण या शिक्षेमुळं कायदा सुव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घ्यायला हवा,' अशी शिफारस शीला दीक्षित सरकारनं केली
 • 24 जून 2010 - अफजल गुरूचा दयायाचनेचा अर्ज फेटाळावा, अशी शिफारस केंद्र सरकारनं राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना केली
 • 23 जानेवारी 2013 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अफजलचा दया अर्ज फेटाळला
 • 3 फेब्रुवारी 2013 - राष्ट्रपती कार्यालयाकडून अफजलच्या फाशीबाबत सर्व कागदपत्रं केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपवण्यात आली
 • 9 फेब्रुवारी 2013 - अफजलला तिहार कारागृहात सकाळी आठ वाजता फाशी देण्यात आली

Comments

 • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.