टॉप न्यूज

बिबट्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, पुणे
पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव खडकी इथं दोन बिबट्यांचा कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. हे दोन्ही बिबटे एकमेकांशी भांडण करत असताना या विहिरीत पडल्याचं सांगण्यात येतंय. विहिरीतल्या 40 फूट खोल पाण्यात कसलाच आधार न मिळाल्यानं त्यांना आपला जीव गमवावा लागला असावा, असा अंदाज घोडेगाव वनक्षेत्रपाल सुहास साळोखे यांनी व्यक्त केला.
 

पिंपळगावच्या पूर्वेला गव्हाळी मळ्यानजीक असलेल्या वाघाचा माथा इथं राजेंद्र पोखरकर यांच्या विहिरीत सध्या 40 फूट पाणी आहे. या विहिरीला कृषिपंपही आहे. हा पंप चालू केला असता पाणी का खेचलं जात नाही हे पाहण्यासाठी त्यांनी विहिरीत डोकावलं, त्यावेळी त्यांना या दोन्ही बिबट्यांची शव पाण्यावर तरंगताना दिसली. ही खबर गावात पसरताच गावकऱ्यांनी ताबडतोब ही माहिती वन विभागाला दिली आणि या बिबट्यांना बाहेर काढण्यास मदत केली.

 1

एका बिबट्याचं वजन 50 किलो, तर दुसऱ्या 10 वर्षांच्या बिबट्याचं वजन 60 किलो होतं. पाण्यात पडल्यावर त्यांनी वाचण्यासाठी पंपाच्या रबरी पाईपचा आसरा घेण्याचा प्रयत्न केल्याचं त्या पाईपवरील दातांच्या व्रणावरून लक्षात येतं. परंतु त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानं शेवटी त्यांना आपला जीव गमवावा लागला.

 

या भागात मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याचं गावकरी सांगतात. वाढत्या शहरीकरणामुळं जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळं या जंगली प्राण्यांचा निवाराच नष्ट होऊ लागलाय. याचा परिणाम म्हणून त्यांचा मनुष्यवस्तीत संचार होऊ लागलाय. शेवटी मग त्यांना अन्नाच्या शोधात म्हणा वा आसऱ्यासाठी जवळच असलेल्या गावात घुसण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही असंच दिसून येतंय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.