टॉप न्यूज

आष्टगाव न्हाला गझलेत...

प्रवीण मनोहर, आष्टगाव, अमरावती
मराठी साहित्याचं दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलच्या सातव्या अखिल भारतीय गझल संमेलनाला अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव (ता. मोर्शी) इथं ग्रामीण थाटात सुरूवात झालीय. ग्वालियरहून आलेले ज्येष्ठ शायर नसीम रिफअत यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.  संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनोवणे, गझलनवाज भीमराव पांचाळे, प्रा. वसंत आबाजी डहाके, न्यायमूर्ती मदन जोशी, संदीप कडवे हे यावेळी उपस्थित होते.
 

Gazal udghtan photoवऱ्हाडी थाटात पाहुण्यांचं स्वागत

 

अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातील भीमराव पांचाळे यांच्या जन्मगावी आष्टगावला नवचैतन्य अनुभवायला मिळतंय. गझल सागर प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या सातव्या गझल संमेलनाचा मान आष्टगावला मिळालाय. त्यामुळं संमेलनाचं यजमानपद मिळाल्यानं पाहुण्यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी चांगलीच तयारी केली. अगदी ग्रामीण थाटात सजवलेल्या बैलांच्या संगतीनं दमणीत ग्रंथदिंडी निघाली. या दमणीत ग्रंथसंपदा आणि सुरेश भट यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. नटलेल्या विद्यार्थ्यांचं लेझीम पथक दिंडीची शोभा वाढवत होतं. घरापुढं सडा, रांगोळी काढून सजलेल्या महिलांनी पाहुण्याचं ओवाळून स्वागत केलं. 

 

स्वप्नपूर्ती झाली...

 

'श्वास गझल, नि:श्वास गझल' मानणाऱ्या गझलनवाज भीमाराव पांचाळे यांच्या गावी भरलेलं हे संमेलन म्हणजे आपली स्वप्नपूर्ती असल्याचं पांचाळे म्हणाले. उद्घाटनाच्या संमारंभात भीमराव पांचाळे यांनी हे संमेलन गावातच घेण्यामागची भूमिका विषद केली. ज्या गावानं आपल्याला लहानाचं मोठं होतांना पाहिलं. त्यांना आपलं गायन कधी प्रत्यक्षात अनुभवता आलं नाही, म्हणून यंदा गावकऱ्यांसाठी संमेलन खास गावात आयोजित करण्यात आलंय, असंही भीमराव पांचाळे म्हणाले.

 

दिवसभर झडले मुशायरे


Gazal udghtan photo 4

काल सकाळी 11 वाजता संमेलनाचं उद्घाटन झालं. त्यानंतर 'ग्रामीण जीवन आणि गझल' या विषयावर
रंगलेल्या परिसंवादातून वेगवेगळी मतं गावकऱ्यांना ऐकायला मिळाली. दुपारी रंगलेल्या पहिल्या मुशायऱ्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली. त्यानंतर विदर्भाची लोकधारा एक झलक, हा कार्यक्रम. यात महादेवाची गाणी, नागोबाची बारी, गोंडी नृत्यगायन, अवधुती भजन, भुलाबाईची गाणी, गवळण, बहीरमबोवाची गाणी (डायका) इत्यादी अभिजात लोककलांची झलक यावेळी पेश करण्यात आली.

 

आजचे कार्यक्रम 

 

आज रविवार दि. १० फेब्रुवारी सकाळच्या पहिल्या सत्रात गझलसंबंधी विविध विषयांवर मुक्तांगण हा परिसंवाद. 
आधुनिक तंत्रज्ञान आणि गझल, स्त्री गजलकारांचं भावविश्व, गझलच्या भावी वाटचालीची दिशा इत्यादी विषयांवर मुक्तचर्चा.
सकाळी ११.३० वाजता - गझल गायन मैफिल 
दुपारी २.३० वाजता - दुसरा गजल मुशायरा
सायंकाळी ५ वाजता - समारोप सोहळा. गझलनवाज भीमराव पांचाळे यांचं गझल गायन

 

दोन दिवसीय या संमेलनात गझलचा जागर होणार आहे. गझलच्या निमित्तानं मातीतल्या माणसांना गझल सारखा काव्याचा प्रकार आपल्या माणसांकडून ऐकायला मिळणार आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.