टॉप न्यूज

मुलांनो लिहिते व्हा...

प्रवीण मनोहर, आष्टगाव, अमरावती
गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या आष्टगावी सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाची रंगत वाढते आहे. संमेलनाच्या आजच्या (10 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात झालेला 'ग्रामीण गझल आणि जीवन' या विषयावरील परिसंवादही कसदार झाला. शेतकऱ्यांच्या मुलांनो लिहिते व्हा...अशी साद सहभागी वक्त्यांनी घातली.      
 

ज्येष्ठ विचारवंत अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात प्रा. सिद्धार्थ भगत, शिवाजी गजरे-जवरे यांनी भक्कमपणे विषयाची मांडणी केली. शेतकऱ्यांच्या मुलांनी लिहितं झालं पाहिजे. आपली दुःखं, भावना लेखणीतून व्यक्त केल्या पाहिजेत. एक तरी गझल शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत करू शकली पाहिजे, अशी अपेक्षा अमर हबीब यांनी बोलून दाखवली.

 

गझल शेतकऱ्यासोबतच

सिद्धार्थ भगत यांनी या परिसंवादात गझल शेतकऱ्याच्या सोबत असल्याचं सांगत गझलमधून शेतकऱ्यांच्या जगण्याचा एकेक पदर उलगडला. शेतकऱ्याचा जगण्यातील आणि नागरीकरणातील वाढत चाललेली तफावत त्यांनी निदर्शनास आणून दिली. शिवाजी जवरे यांच्या गझलेचा संदर्भ देत ग्रामीण जीवन आणि नागरी जीवनातील फरक मांडला 'जीवापाड लोचे उसा कापसाचे, किती लाड ह्या नर्सरीच्या फुलाचा' अशा शब्दात त्यांनी व्यवस्थेल प्रश्नही केला.

 

शेतकऱ्याच्या पिळवणुकीवर भाष्य

निसर्गाचा लहरीपणा, शासनाचं उदासीन धोरण आणि दलालांची चढाओढ, यात शेतकरी कसा पिळला जातोय हे सांगताना सुनंदा शेळके यांच्या गझलेतील

कोण रानाचे भले ह्या चिंतितो
फक्त नेता हळहळाया लागला
कर्ज माफी न मिळाली कधीही
फास गर्दन आवळायला लागला


या ओळी शिवाजी जवरे यांनी सादर केल्या. शेती करणं किती जोखमीची बाब झाली आहे, कुणी नव्यानं शेती करायला निघालं तर जग त्याकडं कस पाहतं, हे मांडत असताना पाण्याच्या एका थेंबासाठी शेतकरी तगमग करतो. आपल्या या जगाला साबणांच्या गीतातून फुरसत मिळत नसल्याची भूमिका त्यांनी खालील शब्दात मांडली.


कारभाफऱ्यांनी कराव्या घोषणा दावे किती
राबनाऱ्यांनी दगेधोके खावे किती
या विहिरी कोरड्या अन् कोरड्या ह्या घागरी
जागजागी साबनांचे गीत ऐकावे किती 

उपस्थितांमधून याला वाहवा मिळाली नसती तरच नवलं!

 

परिसंवादाचे अध्यक्ष अमर हबीब यांनी अगोदरच्या वक्त्यांनी व्यक्त केलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांना लिहितं होण्याची साद घातली. दलित गावातून शहरात आला, पण त्यांनी त्याची लेखणी झिरपत ठेवली. मात्र, शेतकरी गावातून शहरात आला की शेती विसरतो, अशी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना गझलच्या माध्यमातून समाजापुढं आल्या पाहिजेत. असा शेर लिहिला गेला पाहिजे, ज्यामुळं फासाकडं जाणारी शेतकऱ्यांची पावलं थबकतील, शेतकरी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होईल, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.

 

आकर्षण भीमरावांच्या गायकीचं
संमेलनाचा समारोप संध्याकाळी गजलनवाझ भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनानं होणार आहे. गझल गायन क्षेत्रात नाव कमावून सातासमुद्रापार पोहोचलेल्या आपल्या या गाववाल्याला गाताना पाहण्याची संधी आष्टगावकऱ्यांना मिळणार आहे. साहजिकच त्यांना आस लागलीय ती भीमरावांच्या गायनाची.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.