वैभव घाडगेची व्यथा
22 जानेवारी... वैभव घाडगे हा पत्नीसह कुळकजाईजवळच्या सीतामाई डोंगरावर फिरावयास गेला होता. वैभवनं मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून उच्च पदवी संपादन केलीय. त्याची पत्नीही उच्चशिक्षित आहे. दलित समाजातील घाडगे कुटंबाची होत असलेली प्रगती डोळ्यात खुपत असल्यानं नवनाथ कापसे आणि त्याच्या साथीदारांनी डोंगरावरच त्याच्यावर हल्ला केला. पत्नीलाही बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील 88 हजारांचा ऐवजही लुटला. त्यानंतर दोघांना डोंगराच्या पठारावरील दरीत फेकून दिलं. वैभवच्या डोक्याला जखम होऊन तो बेशुध्द पडला. काही काळानंतर जखमी अवस्थेतील त्याच्या पत्नीनं त्याला ओढत वर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. अखेर ती दरी चढून वर आली. शेजारच्या लोकवस्तीतील एका व्यक्तीचा फोन घेऊन भावाला फोन केला. त्यानंतर नातेवाईक मित्रमंडळींनी वैभवला दरीतून वर काढून वडूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु, डोक्याला मोठी जखम असल्यामुळं नंतर त्याला सातारा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पूर्ववैमनस्याची किनारही या प्रकरणाला आहे. वैभवचे चुलते मधुकर घाडगे यांचा विहीर खोदण्याच्या कारणावरून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा फिर्यादी वैभव होता.
अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
हा एवढा प्रकार होऊनही जुजबी गुन्हा नोंद करून पोलीस सुस्त होते. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्याशी आरोपींचे निकटचे संबंध असल्यानं पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतोय. त्यानंतर वैभवची टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील मित्रमंडळी एकत्र आली. त्यांनी मारेक-यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. माध्यमांनी आवाज उठवला. तरीही अॅट्रॉसिटी अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. अखेर 2 जानेवारीला दलित संघटना एकवटल्या आणि त्यांनी सातारा जिल्ह्याचं पोलीस मुख्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढला. 'उपरा'कार लक्ष्मण माने, मानवी हक्क अभियानच्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ आव्हाड आदी नेत्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर बसकण मारण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्यानंतर तातडीनं हालचाल करत पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
तपास सुरू आहे...
रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनीही कुळकजाई इथं भेट दिली. वैभवनं केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. के. थुल यांना जबाब सादर केलाय. त्यामुळं माध्यमांसह दिल्लीस्थित संस्थांची या प्रकरणावर बारीक नजर आहे. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन आता आठवडा लोटला. तपास सुरू आहे... एवढंच उत्तर पोलीस देतायत.
Comments
- No comments found